मराठा क्रांतीची शिस्तबद्ध ‘वाहतूक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 06:42 AM2017-08-10T06:42:55+5:302017-08-10T06:44:54+5:30

सुनियोजित अशी ओळख निर्माण केलेल्या मराठा मोर्चासाठी शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध होती. मुंबईचे प्रवेशद्वार ते थेट आझाद मैदान या मार्गावर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त होता. परिणामी, शहर उपनगरांत मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मार्गस्थ झाला.

Maratha Revolution 'Traffic' | मराठा क्रांतीची शिस्तबद्ध ‘वाहतूक’

मराठा क्रांतीची शिस्तबद्ध ‘वाहतूक’

Next

- महेश चेमटे, अक्षय चोरगे, मनोहर कुंभेजकर, गौरी टेंबकर 
मुंबई : सुनियोजित अशी ओळख निर्माण केलेल्या मराठा मोर्चासाठी शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध होती. मुंबईचे प्रवेशद्वार ते थेट आझाद मैदान या मार्गावर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त होता. परिणामी, शहर उपनगरांत मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मार्गस्थ झाला. वाहनतळ व्यवस्थेच्या चोख नियोजनामुळे मराठा क्रांती मोर्चाप्रमाणे वाहतूक व्यवस्थादेखील ‘शिस्तबद्ध’ होती.
मोर्चासाठी राज्यभरातून येणाºया वाहनांच्या नियोजनासाठी वाहनतळांची पाहणी ‘मराठा वाहतूक नियोजन आणि अत्यावश्यक सेवा’ या समितीकडून करण्यात आली. त्यानुसार मुंबई पोर्ट ट्रस्टकडून विशेष परवानगी घेण्यात आली. त्याचबरोबर संबंधित पोलीस विभागाकडून सर्व परवानग्या घेण्यात आल्या. शहराचे प्रवेशद्वार मानले जाणारे ठाणे, दहिसर, पनवेल, वाशी या ठिकाणी जिल्ह्यांनुसार वाहनतळांचे नियोजन करण्यात आले होते. परिणामी, मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील वाहनतळावर अतिरिक्त वाहनांचा बोजा कमी झाला. तसेच राज्यातून वाहन घेऊन येणाºया मोर्चेकºयांना लोकलने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार पनवेल, वाशी, दहिसर, ठाणे येथून आझाद मैदानाकडे येण्यासाठी रेल्वे मार्गाचा वापर मोर्चेकºयांकडून करण्यात आला.
मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील पाच प्लॉटमध्ये वाहनतळाची विभागणी करण्यात आली. कर्तव्य नगर (गोल्डन यार्ड), गाडीअड्डा, गाडीअड्डा ते एलबीएस रोड, सुजाला हॉटेल ते पारधीवाडा आणि सिमेंट शेड येथे वाहनतळ उभारण्यात आले होते. यात कार, टेम्पो, बस असे वर्गीकरण करण्यात आले होते.
राज्यभरातून बहुतांशी बसचा प्रवास वाशी, पनवेल येथेच संपवण्यात आला. परिणामी, बससाठी राखीव वाहनतळ मिनिबस आणि तत्सम मोठ्या गाड्यांनी व्यापले. वाहनतळापासून भायखळा जिजामाता उद्यान येथे पोहोचण्यासाठी काही मोर्चेकरी पायी निघाले. पार्किंग तळाजवळ अत्यावश्यक सेवेसाठी डॉक्टरांसह पाच रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
पश्चिम उपनगरातूनही मोठा प्रतिसाद
पश्चिम उपनगरातील मोर्चासाठीचे सर्व नियोजन स्वयंसेवकांनी केले. यासाठी लोकल वाहतुकीवर भर देण्यात आला. दहिसर, कांदिवली, बोरीवली, मालाड, गोरेगाव येथील मराठी बांधव मोठ्या संख्येने पहाटे ५ वाजल्यापासून आझाद मैदानाकडे रवाना झाले. तसेच अनेक ठिकाणी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती मराठा सेवक चंद्रकांत पारते यांनी दिली.
सकाळी ८च्या सुमारास गोरेगाव पूर्व संतोष नगर येथून खासगी बसने सुमारे पाचशे मराठा बांधव गोरेगाव रेल्वे स्थानकाकडे रवाना झाले. त्यानंतर लोकल मार्गे त्यांनी मोर्चा गाठला. गोरेगाव आणि मालाड येथून सुमारे पन्नास हजार मराठा बांधव मोर्चात सहभागी झाले होते, असा दावा संदीप जाधव यांनी केला. अंधेरी आणि जोगेश्वरी येथील सुमारे दहा हजार मराठा बांधव आणि भगिनी अंधेरी पूर्व रेल्वे स्थानकावर जमले होते. पाचशे जणांची तुकडी करून ते मोर्चात सामील झाले, असे उद्योजिका सुरक्षा घोसाळकर यांनी सांगितले.

स्वयंसेवकांची टीम सज्ज
वाहनतळावर गरजेनुसार प्रकाशव्यवस्था करण्यात आली होती. तसेच पिण्याचे पाणी, मोबाइल टॉयलेट आणि तोंड-हात धुण्यासाठी वापरायचे पाणी अशी व्यवस्था करण्यात आली होती. नाना कुटे-पाटील यांच्यासह सुभाष सुर्वे, सुहास राणे, प्रदीप काशिद, सुरेश नलावडे, संतोष सूर्यराव या स्वयंसेवकांनी वाहतूक नियोजन आणि अत्यावश्यक सेवेत मोलाची भूमिका बजावली. तसेच वाहनतळापासून रेल्वे मार्गे आणि पायी मार्गे जाण्यासाठी स्वयंसेवकांची टीम सज्ज होती.

परतीच्या प्रवासासाठी
३ हजार ५०० अधिकारी-कर्मचारी

मोर्चेकºयांच्या प्रचंड प्रतिसादानंतर परतीचा प्रवास सुरक्षित आणि वेळेवर होण्यासाठी वाहतूक विभागाने ३ हजार ५०० अधिकारी-कर्मचाºयांची फौज तैनात केली. परतीच्या प्रवासासाठी राखीव असलेली ५०० जणांची अतिरिक्त टीमही बंदोबस्तासाठी नेमण्यात आली होती. त्यामुळे शहरात वाहतूककोंडी झाली नाही.
- अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग

सुरक्षा यंत्रणाही तत्पर
लाखोंच्या संख्येने आलेल्या मोर्चेकरांच्या सुरक्षिततेसाठी यंत्रणा सज्ज होती. रेल्वे मार्गाने दाखल होणाºया प्रवाशांची संख्या उल्लेखनीय होती. परिणामी, रेल्वे मार्गावरील सुरक्षिततेची जबाबदारी रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांनी पार पाडली. जीआरपीसह आरपीएफने गर्दीची स्थानके निश्चित करून, तेथे बंदोबस्ताचे आदेश दिले होते. जीआरपीने प्रत्येक स्थानकावर १ पोलीस उपनिरीक्षक आणि ३० पोलीस कर्मचारी अशी ७ प्लॅटून तयार केली होती. आरपीएफच्या वतीने ३०० ते ४०० जवान तैनात करण्यात आले होते. राखीव १०० जवानदेखील आंदोलकांच्या परतीच्या प्रवासासाठी तैनात
करण्यात आले.

पालिकेकडून मदतीचा हात
मुंबई महापालिकेने दिवसभर चोख व्यवस्था ठेवली. दुपारच्या कडक उन्हात आंदोलन करणाºया मराठा बांधवांना पालिकेच्या पाण्याच्या टँकरने दिलासा दिला. वैद्यकीय सेवेचा तब्बल चार हजारांहून अधिक मोर्चेकºयांनी लाभ घेतला. मोर्चेकºयांच्या संख्येपुढे फिरत्या शौचालयांची सेवा तोकडी पडली. मोर्चेकरांची गैरसोय टाळण्यासाठी मोर्चाच्या मार्गात सात ठिकाणी
१५ फिरती शौचालये, आठ मोठे पिण्याच्या पाण्याचे टँकर ठिकठिकाणी ठेवण्यात आले होते. सहा ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात ठेवण्यात आली होती.
आझाद मैदानाच्या प्रवेशद्वाराबाहेरच पाण्याचा टँकर उभा करण्यात आला होता. तर १२० डॉक्टरांच्या पथकाने चार हजारांहून अधिक मोर्चेकºयांवर उपचार केले. यामध्ये काही जणांना उन्हाचा त्रास, चक्कर येणे, गर्दीमध्ये मार लागलेल्या मोर्चेकºयांवर या डॉक्टरांनी उपचार केले. दादर परिसरात सात फिरत्या शौचालयांनी मोर्चेकºयांना दिलासा दिला. मात्र, फिरती शौचालये मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर असल्याने आझाद मैदानातील मोर्चेकºयांची गैरसोय झाली. दरम्यान, मोर्चानंतर महापालिकेने सफाई केल्यानंतर सीएसटी परिसर काही मिनिटांत चकाचक होत होता.

Web Title: Maratha Revolution 'Traffic'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.