'पद्म' पुरस्कार आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार याचा संबंध नाही, तरीही CMचं चुकलंच!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 02:27 PM2019-01-03T14:27:16+5:302019-01-03T14:27:56+5:30

आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्यानं सर्वसामान्यांमध्ये नाराजी

many cricket fans disappoints after state funeral not given to legendary coach ramakanat acharekar | 'पद्म' पुरस्कार आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार याचा संबंध नाही, तरीही CMचं चुकलंच!

'पद्म' पुरस्कार आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार याचा संबंध नाही, तरीही CMचं चुकलंच!

Next

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना घडवणाऱ्या रमाकांत आचरेकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आचरेकर सरांचे शिष्य उपस्थित होते. आपली कारकीर्द घडवणाऱ्या सरांना अखेरचा निरोप देताना सर्व शिष्यांना अश्रू अनावर झाले. अतिशय शोकाकुल वातावरणात आचरेकर सरांवर अंत्यसंस्कार झाले. मात्र देशाला अनेक चांगले क्रिकेटपटू देणाऱ्या आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का करण्यात आले नाहीत, असा प्रश्न यावेळी अनेकांना पडला.

क्रिकेट आचरेकर सरांच्या श्वासात होते. अखेरपर्यंत ते क्रिकेटसाठीच जगले. क्रिकेटसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव पद्मश्री पुरस्कारानं करण्यात आला होता. मात्र तरीही त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का झाले नाहीत, असा सवाल क्रिकेट रसिकांसह सर्वसामान्यांनादेखील पडला. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये श्रीदेवी यांच्या निधनानंतर असाच प्रश्न निर्माण झाला होता. दुबईत मृत पावलेल्या श्रीदेवी यांच्यावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले होते. त्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या असल्यानं त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. मात्र पद्मश्री पुरस्कार आणि शासकीय इतमामात होणारे अंत्यसंस्कार यांचा संबंध नसल्याची माहिती त्यावेळी आरटीआयमधून समोर आली होती. 

कोणत्या व्यक्तींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करायचे, याचे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात. त्यामुळे अनेक दिग्गज क्रिकेटपटू घडवणाऱ्या आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का दिले नाहीत?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आचरेकर यांच्या निधनानं एक श्रेष्ठ प्रशिक्षक हरपल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती. सरांनी अनेक क्रिकेटपटू घडवले. त्यांचं क्रिकेट प्रशिक्षणातील योगदान असामान्य आहे, अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी सरांना आदरांजली वाहिली होती. मग असामान्य योगदान देणाऱ्या सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी का दिले नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. मुख्यमंत्र्यांचं चुकलंच अशीही भावना लोकांमधून व्यक्त आहे.

शासकीय इतमामातील अंत्यसंस्कारांबद्दल सरकारनं काय माहिती दिली होती?
श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगलींनी राज्य सरकारकडे अर्ज केला होता. कोणत्या व्यक्तींवर शासकीय इतिमामात अंत्यसंस्कार करायचे, याचा निर्णय कोणाकडून घेतला जातो, याबद्दलची माहिती गलगली यांनी मागितली होती. हा अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याची माहिती गलगली यांना शासनाकडून देण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार श्रीदेवीचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेल्याची बाब स्पष्ट झाली होती. 22 जून 2012 ते 26 मार्च 2018 पर्यंत महाराष्ट्रात 40 व्यक्तींवर अशा प्रकारे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्याची माहितीदेखील त्यावेळी शासनानं दिली होती.

दिनांक 22 जून, 2012 ते दिनांक 26 मार्च, 2018 पर्यंत श्रीदेवीं व्यतिरिक्त एकूण 40 मान्यवरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. 
- श्रीमती मृणाल गोरे, माजी खासदार ( 17/07/2012),
- विलासराव देशमुख,  माजी केंद्रिय मंत्री व माजी मुख्यमंत्री ( 14/08/2012),
- प्रभाकर कुंटे, माजी मंत्री (15/08/2012),
- कृष्णराव देसाई ऊर्फ बाबासाहेब कुपेकर, माजी विधानसभा अध्यक्ष (26/09/2012),
- शंकरराव देवराम काळे, माजी राज्यमंत्री (05/11/2012), 
- बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख (17/11/2012),
- लक्ष्मण रंगनाथ हातणकर, माजी राज्यमंत्री (22/11/2012),
- शंकरराव जगताप, माजी विधानसभा अध्यक्ष (10/12/2012 ),
- दिनकर बाळू पाटील, माजी खासदार  ( 24/06/2013),
- सहकार महर्षी छत्रपाल उर्फ बाबासाहेब आनंदराव केदार, माजी राज्यमंत्री (02/08/2013),
- रजनी रॉय, माजी नायब राज्यपाल, पाँडेचरी (29/08/2013),
- सत्यनारायण गोएंका, विपश्यना गुरुजी (29/09/2013),
- मोहन धारिया, माजी केंद्रीय मंत्री (14/10/2013),
- सुभाष झनक, माजी मंत्री (28/10/2013),
- सय्यदना मोहम्मद बुऱ्हानुद्दीन, बोहरा धर्मगुरु ( 17/01/2014),
- दत्तात्रय नारायण पाटील, माजी आमदार (28/02/2014) ,
- अ.र.अंतुले, केंद्रिय मंत्री व माजी मुख्यमंत्री ( 02/12/2014),
- आर.आर. पाटील, माजी उप मुख्यमंत्री ( 16/02/2015  ),
- गोविंदराव वामनराव आदिक, माजी मंत्री, (07/06/2015 ),
- डॉ. सय्यद अहमद, राज्यपाल, मणिपूर ( 27/09/2015) ,
- रामभाऊ कापसे,अंदमान व निकोबारचे माजी नायब राज्यपाल ( 29/09/2015), 
- मदन विश्वनाथ पाटील, माजी कॅबिनेट मंत्री (16/10/2015),
- प्रमोदबाबू भाऊरावजी शेंडे, माजी विधानसभा उपाध्यक्ष (14/11/2015 ),
- शरद जोशी, माजी खासदार व शेतकरी संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष  (12/12/2015),
- मंगेश पाडगावकर, ज्येष्ठ कवीवर्य (30/12/2015),
- डॉ.दौलतराव आहेर, माजी आरोग्यमंत्री (19/01/2016), 
- डॉ. भवरलाल जैन, जैन इरिगेशन समूहाचे संस्थापक (25/02/2016), 
- निहाल मौलवी मो. उस्मान अहमद  माजी मंत्री (29/02/2016),
- निवृत्त नामदेव ऊर्फ बापूसाहेब थिटे,माजी खासदार व राज्याचे गृह राज्यमंत्री (19/03/2016), 
- बाबूराव महादेव भारस्कर, माजी समाजकल्याण मंत्री (01/05/2016),
- मनोहर ऊर्फ बाबासाहेब गोपले, मातंग समाजाचे नेते (21/08/2016),
-  श्रीमती जयवंतीबेन मेहता, माजी केंद्रीय राज्यमंत्री (07/11/2016 ),
- मधुकरराव किंमतकर, माजी अर्थ राज्यमंत्री ( 03/01/2018 ),
- वसंत डावखरे, विधानपरिषदेचे माजी सभापती (05/01/2018), 
- प्रा. नारायण सदाशिव फरांदे, विधानपरिषदेचे माजी सभापती(16/01/2018),
- ॲड. चिंतामण वनगा, लोकसभा सदस्य (30/01/2018), 
- मुझफ्फर हुसेन, ज्येष्ठ पत्रकार (13/02/2018), 
- डॉ. बी. के. गोयल, पद्मविभूषण (20/02/2018)
- डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री। (09/03/2018)

Web Title: many cricket fans disappoints after state funeral not given to legendary coach ramakanat acharekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.