‘एक माणूस, एक झाड’, महापालिकेचा कृती आराखडा, शहर आणि उपनगरात देशी झाडे लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 03:36 AM2018-06-05T03:36:22+5:302018-06-05T03:36:22+5:30

मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाने ‘जैवविविधता समिती’च्या अध्यक्षतेखाली ‘कृती आराखडा’ हाती घेतला आहे. या कृती आराखड्यानुसार, मुंबई महापालिका मुंबई शहर आणि उपनगरात देशी झाडे लावण्याचा प्रयोग राबविणार आहे.

 'A man, a tree', the municipal action plan, the country and the suburbs will carry indigenous plants | ‘एक माणूस, एक झाड’, महापालिकेचा कृती आराखडा, शहर आणि उपनगरात देशी झाडे लावणार

‘एक माणूस, एक झाड’, महापालिकेचा कृती आराखडा, शहर आणि उपनगरात देशी झाडे लावणार

Next

- सचिन लुंगसे

मुंबई : मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाने ‘जैवविविधता समिती’च्या अध्यक्षतेखाली ‘कृती आराखडा’ हाती घेतला आहे. या कृती आराखड्यानुसार, मुंबई महापालिका मुंबई शहर आणि उपनगरात देशी झाडे लावण्याचा प्रयोग राबविणार आहे. मुळातच महापालिकेच्या धोरणांमध्ये देशी झाडे लावण्याचे निर्देश आहेत. परिणामी, महापालिकेचा देशी झाडांवर भर असून, यामध्ये प्रामुख्याने उथळ मुळे असलेली आणि अधिकाधिक सावली देतील अशा झाडांचा समावेश आहे. ‘कृती आराखड्या’नुसार मुंबई महापालिकेने आता ‘एक माणूस, एक झाड’ या संकल्पनेनुसार ९५ लाख झाडे लावण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे. यातील पहिल्या टप्प्याचा विचार करता ९५ लाखांच्या एका टक्क्यानुसार ९५ हजार झाडे लावण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे.
मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाने तयार केलेला हा ‘कृती आराखडा’ जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने म्हणजे ५ जून रोजी प्रत्येक वॉर्ड आॅफिसमध्ये सादर केला जाणार आहे. शिक्षण विभाग, उद्यान विभाग आणि वॉर्ड आॅफिसर अशी तीन स्तरावरची फळी ‘कृती आराखड्या’वर काम करत असून, ‘कृती आराखड्या’च्या नियोजनानुसार पावसाळ्यात म्हणजे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. ‘एक माणूस, एक झाड’ या उद्देशानुसार महापालिकेने डोळ्यांसमोर तब्बल ९५ लाख झाडांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिला टप्पा हाती घेण्यात आल्यानंतर या योजनेनुसार एक टक्क काम करायचे झाले तरी महापालिकेला ९५ हजार वृक्षांचे रोपण करावे लागणार आहे. ही योजना अथवा हा कार्यक्रम एका दमात पूर्ण होणार नाही. कारण ९५ लाख झाडे लावण्यासाठी मोठे काम करावे लागणार आहे. मुळात ही झाडे लावताना येथील जमीन, माती आणि हवामानाचा प्रामुख्याने विचार केला जात आहे. सीताफळ, डाळींब, कडीपत्ता यासारख्या झाडांचा विचार करतानाच वड आणि पिंपळ अशा मोठ्या झाडांचाही विचार केला जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे रुग्णालय आणि रस्ता दुभाजकावरही झाडे लावण्याचा यशस्वी प्रयोग राबविण्यात येणार आहे. रस्त्यावर म्हणजे दुभाजकावर झाडे लावण्यामागे उद्देश हा आहे की, येथे झाडे लावली तरी रस्त्यावरील धूळ अथवा प्रदूषण ही झाडे कमी करतील. आणि रुग्णालय परिसरात ही झाडे लावली तरी येथील ‘ध्वनिप्रदूषण’ कमी होईल, असा विश्वास महापालिकेला आहे. दरम्यान, या उपक्रमाचा विचार करता आणि याची आर्थिक बाजू विचारात घेता हा प्रयोग ‘सीएसआर’ म्हणजेच ‘सामाजिक उत्तरदायित्वा’नुसार राबविण्याचा विचारही महापालिका करत आहे; कारण असे केले तर समाजातील सर्व घटक या उपक्रमात सहभागी होतील.

वॉर्ड आॅफिससह शाळा, महाविद्यालये सहभागी...
महापालिकेच्या या उपक्रमात वॉर्ड आॅफिससह शाळा, महाविद्यालयांना सहभागी करून घेतले जाणार आहे. शाळेसह महाविद्यालयाच्या आवारात आणि वॉर्ड आॅफिसच्या आवारात झाडे लावली जाणार आहेत. महाविद्यालये आणि शाळांत हा उपक्रम राबविताना ‘एक विद्यार्थी, एक झाड’ अशी संकल्पना मांडण्यात आली आहे. एका विद्यार्थ्याने लावलेले झाड त्यानेच एक वर्ष जोपासायचे, अशी ही संकल्पना आहे.

डम्पिंग ग्राउंडचा विचार करता देवनार, मुलुंड आणि गोराई येथेही महापालिका झाडे लावण्याचा कार्यक्रम यशस्वी करणार आहे. कारण येथे झाडे लावली तर येथील हवा शुद्ध राहण्यास मदत होईल, असा विश्वास महापालिकेला आहे.
मुंबईची एकूण लोकसंख्या सुमारे १ कोटी २६ लाख ८९ हजार ६४४ असून, सध्या अस्तित्वात असलेल्या वृक्षांची संख्या सुमारे ३१ लाख ८२ हजार ७७६ आहे. त्यामुळे ‘एक माणूस, एक झाड’ ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी ९५ लाख झाडे लावण्याची गरज असून, तेच लक्ष्य कृती आराखड्यात डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे.

- ८ मे २००८ रोजी ‘लोकमत’ने ‘पाच मुंबईकरांमागे एकच वृक्ष’ अशा मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. महत्त्वाचे म्हणजे मुंबई महापालिकेने ‘लोकमत’च्या या वृत्ताची दखल घेतली. नुसती दखल घेतली नाही, तर खरच वस्तुस्थिती अशी आहे का? हेही तपासले. थोड्याफार फरकाने का होईना; वस्तुस्थिती तशीच असल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबई महापालिकेने वृक्ष लागवडीसाठी ‘कृती आराखडा’ हाती घेतला असून, आता ‘एक माणूस, एक झाड’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरत आहे.

Web Title:  'A man, a tree', the municipal action plan, the country and the suburbs will carry indigenous plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.