मुंबई -  दरवर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (13 जानेवारी), संक्रांती (14 जानेवारी) व किंक्रांती (15 जानेवारी) अशी नावे आहेत.  संक्रांत म्हणजे काय? आणि या संक्रांतीला 'मकर संक्रांत' असं का म्हणतात. संक्रांत म्हणजे संक्रमण, मार्ग क्रमून जाणे किंवा ओलांडून जाणे. तसं म्हटलं तर प्रत्येक महिन्यांतच संक्रांत येत असते. म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसर्‍या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो.
संक्रांतीलाही तिळगूळ वाटून नात्यांमधील गोडवा आणखी वाढवा, यासाठी 'तिळगूळ घ्या अन् गोड गोड बोला' असा संदेश लहान-थोरामोठ्यांना दिला जातो. 'माणसं तोडू नका तर माणसं जोडत जा' हाच संदेश हा सणाच्या माध्यमातून दिला जातो.

1. फिणी  (मिठाई )
मैदा, मक्याचे पीठ, तूप, साखर, तळण्यासाठी तेल, वेलची पावडर.   

2. शेंगदाण्याची चिक्की
शेंगदाणे,  गूळ आणि तूप यांपासून शेंगदाण्याची चिक्की बनवली जाते. शेंगदाण्याच्या चिक्कीमध्ये प्रथिनं व लोह भरपूर प्रमाणात असतं. 

3. गुळाची पोळी
गूळ, तिळ, भाजणीचे चण्याचे पीठ, वेलची पावडर, दाण्याचा कुट, खसखस, खोबरे.

4. चुरमु-याचे लाडू
चुरमुरे, चिक्कीचा गूळ हे मुख्य साहित्य आहे.
पातेल्यात चिक्कीच्या गूळ घालावा. गुळाचा पाक होऊन उकळायला लागला की लगेच त्यात चुरमुरे घालून ढवळावे. मिश्रण गरम असतानाच लाडू वळावेत.

5. तिळाचे लाडू 
पांढरे तीळ, चिक्कीचा गूळ, शेंगदाणे, खोबर्‍याचा किस, वेलची पूड. तिळाचे लाडू शरीरासाठी पोषक असे असतात.  

काळ्या वस्त्रांचे महत्त्व
संक्रांतीच्या दिवशी काळ्या वस्त्रांना महत्त्व दिले जाते. कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. म्हणून काळ्या रंगाची साडी, काळी झबली अशी वस्त्रे संक्रांतीच्या सुमारास कापड बाजारात दिसू लागतात.
 
नवविवाहित मुलींसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. लग्नानंतरच्या प्रथम येणा-या संक्रांतीला नवविवाहित मुलींसाठी खास काळ्या रंगाच्या वस्त्रांची खरेदी केली जाते. त्यांना हलव्याचे दागिने घालतात व सुवासिनींना हळदीकुंकू समारंभासाठी बोलावले जाते. त्यांना तिळगुळाच्या वड्या किंवा तीळ आणि साखरेपासून बनवलेला हलवा देतात. एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते. त्याला 'आवा लुटणे' असे म्हणतात.

लहान मुलांचे 'बोर न्हाण' 
संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी लहान मुलांचे 'बोर न्हाण' केले जाते. यावेळी लहान मुलांना भोवताली बसवून बाळाला सर्वांच्यामध्ये पाटावर  बसवतात. त्याला काळं झबलं, अंगावर हलव्याचे दागिने, डोक्यावर मुकुट, मुरली या अन् अशा अनेक प्रकारच्या हलव्याच्या दागिन्यांची बाळाला सजवतात.  त्याच्या डोक्यावरून कुरमुरे, बोरं, चॉकलेट, गोळ्या या सारख्या मुलांना आवडणार्‍या पदार्थांचा अभिषेक केला जातो.  

पतंगोत्सव
मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचीही प्रथा आहे. यामागे एक विशिष्ट अर्थ आहे. सामान्यपणे पतंग उडवण्यासाठी घराच्या छतावर किंवा मैदानात जावे लागते. यामुळे सहजच आपण कोवळ्या उन्हाचाही आनंद मिळतो. संक्रांतीच्या दिवशी ज्या प्रकारे आकाशात लाल, पिवळ्या, निळ्या रंगांची पतंग उडताना दिसतात.