मोदींच्या सभेवर महायुतीची मदार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 12:38 AM2019-04-26T00:38:51+5:302019-04-26T00:39:26+5:30

शुक्रवारच्या सभेची उत्सुकता; मुलुखमैदानासह सोशल मीडियावर प्रचार

Mahayuti's heart on Modi's meeting | मोदींच्या सभेवर महायुतीची मदार

मोदींच्या सभेवर महायुतीची मदार

Next

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. आता चौथ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार असून, यात मुंबईचा समावेश आहे. तत्पूर्वी महायुती आणि महाआघाडीकडून आपआपल्या उमेदवारांचा प्रचार मुलुखमैदानासह सोशल मीडियावर जोरदार सुरू असतानाच महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान आणि वाराणसी येथील भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सभा मुंबईत होणार असल्याने सर्वांचेच लक्ष त्यांच्या सभेकडे लागले आहे. विशेषत: शुक्रवारच्या सभेत मोदी नक्की काय बोलणार आणि त्यानंतर मतदार त्यांच्याकडे कसे आकर्षित होणार? ही उत्सुकता सर्वांनाच असून, या सभेवर महायुतीची मदार असणार आहे.

देशासह राज्यात आणि मुंबईत महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांमध्ये जोरदार चुरस रंगली आहे. तत्पूर्वी राज्यात पार पडलेल्या मतदानापूर्वी मोदी यांनी राज्यात सभा घेत धूरळा उडविला होता. आता शुक्रवारी मोदी मुंबईत दाखल होत आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीवाचे रान केले आहे. उद्धव ठाकरे यांनी रेसकोर्सला यापूर्वी सभा घेतली असून, देवेंद्र फडणवीस यांच्याही उत्तर मध्य मुंबईसह उत्तर पश्चिम आणि उत्तर मुंबईत सभा झाल्या आहेत. तत्पूर्वी महाआघाडीच्या उमेदवारांपैकी दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा, दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड, उत्तर पूर्व मुंबईतून संजय पाटील, उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्ता, उत्तर पश्चिममधून संजय निरुपम आणि उत्तर मुंबईतून अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांच्याशी महायुतीच्या उमेदवारांची लढत आहे.

विशेषत: महाआघाडीच्या उमेदवारांनी झोपड्या, चाळी, इमारती असे करत आपआपला मतदारसंघ पिंजून काढला आहे. प्रत्यक्ष प्रचार करतानाच या उमेदवारांचा सोशल मीडिया तेवढ्याच ताकदीने ‘ऑनलाइन’ प्रचार सुरू आहे. प्रचार रॅली आणि चौकसभा गाजत असतानाच अद्यापपर्यंत काँग्रेसचा एकही राष्ट्रीय नेता मुंबईत प्रचारासाठी दाखल झालेला नाही; ही एकमेव काँग्रेसची पडती बाजू आहे. मात्र असे असले तरीदेखील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या महाआघाडीच्या उमेदवारांकडून गल्लीबोळांत प्रचार सुरू असून, महायुतीच्या उमेदवाराला काउंटर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

महाआघाडीच्या उमेदवाराला काउंटर करतानाच महायुतीचे उमेदवारही गल्लीबोळ पिंजून काढत आहेत. सोशल मीडियावर त्यांची मदार आहे. प्रचार रॅली आणि चौकसभांद्वारे त्यांनी मतदारराजाला गळ घातली आहे. मिलिंद देवरा यांच्या प्रचारार्थ ऊर्मिला यांनी दक्षिण मुंबई गाठली असतानाच मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांनी उत्तर पूर्व मुंबई गाठली. परिणामी, आता चौथ्या टप्प्यातील प्रचार अंतिम दिशेकडे दाखल होत असतानाच नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होत आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात मोदी यांची तोफ धडाडणार असून, मोदी काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

काय बोलणार मोदी? तरुण, नवमतदारांना काय ‘भावनिक’ आवाहन?
महायुतीच्या उमेदवारांना मत देण्यासाठी मोदी मतदारांशी नेमका कसा संवाद साधणार? राष्ट्रीय आणि राज्यातील मुद्द्यांना स्पर्श करतानाच मुंबईशी संबंधित कोणत्या विषयांना मोदी स्पर्श करणार? याकडे तमाम मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
तसेच मोदी यांनी यापूर्वी जेथे जेथे सभा घेतल्या आहेत; तेथे तेथे मोदी यांनी तरुण/नवमतदारांना ‘भावनिक’ आवाहन केले आहे. परिणामी, शुक्रवारच्या सभेत मोदी मुंबईकर तरुण/नवमतदारांना कसे आणि काय अपील करतात? याकडेही मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

मोदी मराठीत बोलणार का?
नरेंद्र मोदी यांच्या जेव्हा जेव्हा मुंबईत सभा झाल्या आहेत; तेव्हा तेव्हा मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली आहे. या वेळी म्हणजे शुक्रवारच्या सभेची सुरुवात मोदी मराठीतून करणार का? याकडेही मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

कार्यकर्ते, झेंडे आणि बसगाड्या
एखाद्या मोठ्या नेत्याची सभा मुंबईत होणार म्हटले की, पक्षाकडून कार्यकर्त्यांची गोळाबेरीज केली जाते. जागोजागी झेंडे लावले जातात. भरभरून बसगाड्या सभेस्थळी दाखल केल्या जातात. नरेंद्र मोदी यांची गुरुवारी वाराणसी येथे झालेली रॅली गाजली असतानाच शुक्रवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील सभेला किती आणि कशी गर्दी जमणार? गर्दीचा रेकॉर्ड मोडला जाणार का? अशा अनेक प्रश्नांची उकल होणार आहे.

Web Title: Mahayuti's heart on Modi's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.