संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे,1 जुलैपासून नव्याने नियुक्ती करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 03:43 PM2018-06-25T15:43:07+5:302018-06-25T16:10:22+5:30

वेतनवाढीसाठी अघोषित बंद पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवरील केलेली निलंबनाची कारवाई मागे घेत प्रशासनानं कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.

Maharashtra : The suspension back of ST employees | संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे,1 जुलैपासून नव्याने नियुक्ती करण्याचे आदेश

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे,1 जुलैपासून नव्याने नियुक्ती करण्याचे आदेश

googlenewsNext

मुंबई - वेतनवाढीसाठी अघोषित बंद पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर केलेली निलंबनाची कारवाई मागे घेत प्रशासनानं कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. वेतन कराराशी संबंध नसताना संपात सहभागी झाल्याने सेवेतील तब्बल 1 हजार 10 कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासनाकडून कामावरुन कमी करण्यात आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत एसटी प्रशासनानं संपकरी कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई अखेर मागे घेतली आहे. तसंच 1 जुलैपासून त्या कर्मचाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्याचे आदेश एसटी प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहे. 

एस.टीच्या अघोषित संपात सहभागी झाल्याबद्दल एस.टीच्या स्थानिक प्रशासनाने ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला होता, त्याना पुन्हा सेवेत घेण्याचे निदेश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते. त्याप्रमाणे  अशा सर्व 1010 कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती देण्याबाबतचे आदेश महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने निर्गमित केले आहेत.  या सर्व कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2018पासून नव्याने नियुक्ती दिली जाईल.

हे रोजंदारी कर्मचारी महामंडळाच्या सेवेत मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते. या कर्मचाऱ्यांचा अघोषित संपाशी काहीही संबंध नव्हता तरी देखील हे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे एस.टीचे आर्थिक नुकसान होतांना प्रवाशांची  प्रचंड प्रमाणात गैरसोय देखील झाली. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने अशा सर्व कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली होती.

सेवा समाप्तीचा हा निर्णय मागे घेण्याबाबत प्राप्त झालेल्या विनंतीचा सकारात्मक विचार करून हा निर्णय मागे घेण्याबाबत परिवहन मंत्र्यांनी निदेश दिले होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या आदेशाचे पालन करत अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा नव्याने नियुक्ती देण्याचे निश्चित केले आहेत.

या परिपत्रकाप्रमाणे ज्या चालक तथा वाहक (कनिष्ठ) , सहाय्यक लिपिक-टंकलेखक (कनिष्ठ) यांनी 8  जून 2018  व 9 जून 2018 रोजी झालेल्या अघोषित संपात सहभाग घेतला आहे व ज्यांची सेवा विभाग/ घटक प्रमुख यांनी समाप्त केली आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2018 पासून नव्याने नियुक्ती दिली जाईल.

दरम्यान, निलंबन केलेल्या कर्मचा-यांना पुन्हा एकदा संधी देऊन त्यांना नोकरीवर रुजू करून घ्यावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केले होते. निलंबन केलेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा केली आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण हाताळावे असे सांगितले होते. हे एसटी कर्मचारी चुकले आहेत, मात्र ते आपल्याच परिवारातील आहेत. त्यांना एक संधी द्यायला हवी, असेही उद्धव ठाकरे यांनी दिवाकर रावते यांना सांगितले होते. उद्धव ठाकरे यांच्या या आवाहनाला राज्य सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. 

कधी पुकारला होता संप?
8 जूनच्या दरम्यान एसटी कर्मचा-यांनी वेतनवाढीसाठी अघोषित संप पुकारला होता. या संपामुळे राज्य सरकारचे मोठे नुकसान झाले होते. या संपामुळे सामान्य जनतेचे हाल झाले होते, तसेच कर्मचा-यांनी केलेल्या हिंसाचारामुळे जाळपोळ आणि तोडफोड करून अनेक गाड्यांचे नुकसान केले. या हिंसाचारात नव्याने रुजू झालेले अनेक कर्मचा-यांचा समावेश होता. या कर्माचा-यांवर राज्य सरकारने कारवाई केली होती. 
 

 

Web Title: Maharashtra : The suspension back of ST employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.