महाराष्ट्रात काँग्रेसची ७ टक्के मते घटली, १२ जागा गमावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 04:55 AM2019-05-27T04:55:03+5:302019-05-27T04:55:16+5:30

२०१४ प्रमाणेच देशभर मोदी लाट असल्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अक्षरश: पानिपत झाले.

In Maharashtra, the Congress has lost 7%, lost 12 seats | महाराष्ट्रात काँग्रेसची ७ टक्के मते घटली, १२ जागा गमावल्या

महाराष्ट्रात काँग्रेसची ७ टक्के मते घटली, १२ जागा गमावल्या

Next

नंदकिशोर पाटील 

मुंबई : २०१४ प्रमाणेच देशभर मोदी लाट असल्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अक्षरश: पानिपत झाले. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला चंद्रपूरची एकमेव जागा मिळाली. काँग्रेसच्या इतिहासातील हा सर्वात मोठा पराभव आहे. एकीकडे नव्या मतदारांना काँग्रेसचे आकर्षण नाही, तर दुसरीकडे पारंपरिक मतदारांनी साथ सोडली आहे. परिणामी, दरवेळी काँग्रेसच्या मतांचा टक्का घसरत चालला आहे. या उलट, भारतीय जनता पक्षाने (भाजप) काँग्रेसचे एकेक बालेकिल्ले उद्ध्वस्त करत त्यांच्या जागा बळकावल्या आहेत.
२००४ ते २०१९ या चार लोकसभा निवडणुकीतील पक्षनिहाय मतांची टक्केवारी आणि मिळालेल्या जागांचा लेखाजोखा मांडला असता, गेल्या पंधरा वर्षात काँग्रेसच्या मतांमध्ये ७.७४ टक्क्यांची घट झाली असून तब्बल बारा जागा त्यांनी गमावल्या आहेत. भाजपच्या मतांमध्ये पाच टक्के वाढ झाली असून, त्यांना दहा जागांचा फायदा झाल्याचे दिसून येते. २००४ साली भाजप आणि काँग्रेसला समसमान १३ जागा मिळाल्या होत्या; मात्र, दोन्हीच्या मतांमध्ये (काँग्रेस २३.७७, भाजप २२.६१) एक टक्का फरक होता.
केंद्रात संपुआचे सरकार असताना २००९ साली काँग्रेसने महाराष्ट्रात सर्वाधिक १७ जागा जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ८ जागांवर विजय मिळाला होता. राज ठाकरे यांच्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेमुळे झालेल्या मतविभागणीचा फटका भाजप-शिवसेनेला बसला होता. युतीने पाच जागा गमावल्या होत्या. २००४ च्या तुलनेत काँग्रेसच्या मतांमध्ये चार टक्क्यांची घट झाली, मात्र चार जागा वाढल्या, तर राष्टÑवादीच्या मतांमध्ये एक टक्का वाढ झाली व एक जागा गमवावी लागली होती. तेव्हा काँग्रेस-राष्टÑवादीला समसमान १९ टक्के मते मिळाली होती, मात्र तरीही काँग्रेसला १७ आणि राष्टÑवादीला ८ जागा मिळाल्या होत्या.
२०१४ आणि २०१९ या दोन निवडणुकीतील पक्षनिहाय मते आणि मिळालेल्या जागांचा विचार करता, या दोन्ही निवडणुका भाजप-शिवसेनेसाठी लाभदायी ठरल्या आहेत. दोन्ही निवडणुकांत काँग्रेसच्या मतांचा टक्का कमालीचा घसरला असून केवळ एक-दोन जागांवर त्यांना समाधान मानावे लागले. उलट, राष्टÑवादी काँग्रेसचा मत टक्का (१५.५ %) आणि जागा (४) कायम राहिल्या आहेत. भाजपला या दोन्ही निवडणुकीत सुमारे २७ टक्के मते मिळाली असून जागाही तेवढ्याच २३ मिळाल्या आहेत. २०१४ च्या तुलनेत शिवसेनेला यंदा तीन टक्के अधिक मते मिळाली आहेत. मात्र, जागांचा आकडा (१८) कायम राहिला आहे.
>या जागांवर काँग्रेसने दिली चांगली लढत
या निवडणुकीत काँग्रेसने २५ जागा लढविल्या, पैकी चंद्रपुरची एकमेव जागा जिंकता आली. असे असले तरी यवतमाळ, रामटेक, नागपूर, गडचिरोली आणि नांदेड या पाच मतदारसंघात काँग्रेसला चार लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नसते, तर काँग्रेसला या पाच जागांसह सोलापुरची जागा हमखास मिळाली असती.
>चंद्रपुरात सर्वाधिक, तर औरंगाबादेत निचांकी मते
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ चंद्रपूर मतदारसंघात पाच लाखांहून अधिक मते मिळाली. शिवसेनेतून आलेले काँग्रेसचे उमेदवार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी तब्बल ५५९५०७ (४५.१८%) मते घेत भाजपचे दिग्गज उमेदवार हंसराज अहीर यांचा पराभव केला. औरंगाबाद मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीत काँग्रेसला सर्वात कमी ९१७८९ मते मिळाली.

Web Title: In Maharashtra, the Congress has lost 7%, lost 12 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.