'मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यात आदित्य अन् शिवसेनेचेही नुकसान'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 03:03 AM2019-07-21T03:03:01+5:302019-07-21T03:03:50+5:30

चंद्रकांत पाटील यांचा सल्ला । युती नसेल तर सत्ता जाण्याचा धोका; प्रदेश कार्यकारिणीचा लवकरच विस्तार; युतीचे जागावाटप

'Loss of Aditya and Shivsena to project as CM' | 'मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यात आदित्य अन् शिवसेनेचेही नुकसान'

'मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यात आदित्य अन् शिवसेनेचेही नुकसान'

Next

यदु जोशी

मुंबई : ‘आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करणे यात आदित्य आणि शिवसेना या दोघांचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्यांनी तसे न करणेच योग्य ठरेल. असे प्रोजेक्शन केल्याने शिवसेनेतूनच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नाराजीचे सूर उमटू शकतात’, असे मत भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले.

  • केंद्रात पूर्ण बहुमत मिळालेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा अतिशय चांगली आहे. ग्रामपंचायतींपासून दमदार यश पक्षाने मिळविलेले आहे. अशावेळी विधानसभेची निवडणूक स्वबळावरच लढली पाहिजे, असा दबाव पक्षातून आपल्यावर आहे का?

तशी भावना आणि दबावदेखील आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार हे नक्की आहे. अशावेळी युती झाली नाही तर सत्ता जाण्याचा धोका आहे. त्यामुळे युती ही केलीच पाहिजे आणि शिवसेनेच्या नेत्यांनाही या धोक्याची जाणीव असणे आवश्यक आहे. युतीची गरज त्यांनाही आहे. २०१४ मध्ये चारही पक्ष वेगवेगळे लढले. तेव्हा ते एकत्र आणि आम्ही वेगळे लढलो असतो तर कदाचित सत्ता आली नसती.

  • याचा अर्थ शिवसेनेला नेहमीसाठी सोबत घ्यावेच लागणार?

कोणत्याही परिस्थितीत विजयासाठी आवश्यक मतांच्या खाली आम्ही जाणार नाही, अशी राजस्थान, मध्य प्रदेशसारखी परिस्थिती आधी महाराष्ट्रात भाजपला निर्माण करावी लागेल. आज ती जळगाव, सोलापूर अशा काही जिल्ह्यांमध्ये आहे. तसे चित्र संपूर्ण राज्यात तयार होईल त्या दिवशी स्वबळावर लढण्याचे धाडस करता येईल. २०१९ च्या विधानसभेला सामोरे जाताना तसे चित्र दिसत नाही. त्यामुळे युतीशिवाय पर्याय नाही.

  • युतीची चर्चा कधी सुरू होणार?

चर्चा सुरूच आहे. युतीच्या जागावाटपाची चौकटही निश्चित झाली आहे. ऑगस्टअखेर जागावाटप जाहीर केले जाईल.

Image result for Shivsena bjp

  • भाजपची नवीन प्रदेश कार्यकारिणी आपण करणार आहात का?

आहेत ते पदाधिकारी कायम ठेवून नव्याने काही जणांचा समावेश येत्या आठवड्यात प्रदेश कार्यकारिणीत केला जाईल. मुख्यमंत्री आणि इतर सहकाऱ्यांशी चर्चा करून तसेच जातीय व विभागीय संतुलनाचा विचार करून कार्यकारिणीचा विस्तार करणार आहे.

  • आपण प्रदेशाध्यक्ष होताच काँग्रेसमुक्त महाराष्ट्राचा नारा दिला आहे. राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र नकोय का आपल्याला?

काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र असेच मला म्हणायचे आहे. त्यांना राजकीयदृष्ट्या संपविण्याबरोबरच घराणेशाही, भ्रष्टाचार, अल्पसंख्याकांचे लांगुलचालन, बहुसंख्याकांवर अन्यायाची त्यांची प्रवृत्ती संपवायची आहे. राष्ट्रवादी तर अधिक धोकादायक आहे. काँग्रेसला निदान एक संस्कृती तरी आहे.

Image result for Shivsena bjp

  • काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपात इनकमिंग सुरूच राहील का आणि बाहेरून आलेल्यांना आमदार करीत असतील तर आम्ही वर्षानुवर्षे सतरंज्या उचलणाऱ्यांचे काय असा सवाल निष्ठावंत करताहेत त्याचे काय?

अनेक जण भाजपच्या मार्गावर आहेत. निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊनच बाहेरच्यांना प्रवेश दिला जाईल. तरीही काही ठिकाणी अन्याय होऊ शकतो पण त्यातून बंडखोरी होऊ नये आणि नाराजीही राहू नये अशी व्यवस्था आतापासूनच केली जात आहे.

  • आधीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ग्रामीण बाजाचे नेते होते. मुख्यमंत्री शहरी आहेत मग आपण?

माझ्यात दोन्हींचा मिलाफ आहे. माझं मूळ गाव बाराशे लोकवस्तीचं आहे. तेथे आजही माझे सगळे काही आहे आणि दुसरीकडे मी मुंबईत शिकलो, वाढलो. त्यामुळे शहरी प्रश्नांची मला उत्तम जाण आहे. गेली २५ वर्षे मी महाराष्ट्र फिरत आलो आहे.

आदित्य हे सध्या जन आशीर्वाद यात्रेवर आहेत आणि या निमित्ताने त्यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याचे काम काही शिवसेना नेते करीत आहेत. स्वत: आदित्य यांनी दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखविली आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘माझे वैयक्तिक मत आणि सल्ला असा आहे की, आदित्य यांना मुख्यमंत्री म्हणून समोर करून शिवसेनेतच त्यांना दुष्मन तयार केले जात आहेत. पक्षांतर्गत राजीनाराजी त्यावरून होऊ शकते. आम्ही इतकी वर्षे काम करतो, मग आमचे काय असा प्रश्न काही जणांकडून पक्षातूनच केला जाऊ शकतो. शेवटी मुख्यमंत्री कोणाचा याचा निर्णय भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील.

राजकारण्यांनी मुलांना अन्य क्षेत्रात टाकावे

  • काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका करणाºया भाजपमध्येही हल्ली घराणेशाहीचे वाढते स्तोम दिसतेय?

योग्यता असताना केवळ राजकारण्याचा मुलगा, मुलगी वा नातेवाईक म्हणून एखाद्याला संधी नाकारणे योग्य नाही पण मला वाटते की आपल्या वारसदारांना राजकारणात आणण्यापेक्षा अन्य क्षेत्रात नेत्यांनी टाकावे. शक्य असेल तर राजकारणात आणूच नये. राजकारणी काचेच्या घरात राहतात. घराणेशाही त्यांनी लादू नये.

 

Web Title: 'Loss of Aditya and Shivsena to project as CM'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.