ठळक मुद्दे रामनगर तिकिट खिडकीसमोरुन शुभारंभ सभापती संजय पावशेंनी घेतली दखल

डोंबिवली: शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून परिवहनची बस सुटत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल घेत ‘लोकमत’ने २ नोव्हेंबर, ‘गुरुवारी डोंबिवली स्टेशनपासून बससेवा कधी’? या मथळयाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत कल्याण-डोंबिवली परिवहनचे सभापती संजय पावशे यांनी बुधवारपासून रेल्वे स्थानकातून बस सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार पहिली मिडि बस संध्याकाळी ६.१५ च्या सुमारास रामनगर भागातील रेल्वे तिकिट खिडकीसमोरुन लोढा भागात जाण्यासाठी धावली.

रामनगर येथून ती बस सुटली, डॉ. राथ रोड मार्गे पाटकर रोड आणि त्यानंतर मानपाडा मार्गे ती बस धावली. त्यावेळी सभागृह नेते राजेश मोरे, नगसेवक दिपेश म्हात्रे, डोंबिवली वाहतूक पोलिस निरिक्षक गोविंद गंभीरे यांच्यासह परिवहन समितीचे सदस्य आदी उपस्थित होते. ही बस सुटल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले असून अशाच पद्धतीने शहराच्या एमआयडीसी, नांदिवली, स्टार कॉलनी, ठाकुर्ली, तसेच आयरेगाव आदी परिसरातही बस सुविधा द्यावी अशी मागणी करण्यात आली. पूर्वेप्रमाणेच पश्चिमेलाही बंद असलेल्या मार्गांवर पुन्हा बस सुरु होणार असल्याचे यावेळी पावेशंनी सांगितले. लोढा भागासाठी सुटलेली पहिल्याच बसला प्रवाशांनी भरभरुन प्रतिसाद दिला. महापौर राजेंद्र देवळेकर यांनी त्याबद्दल डोंबिवलीकरांचे अभिनंदन केले. तर पावशे, मोरेंनी नागरिकांसाठी सुविधा दिली, त्यामुळे त्याबद्दल समाधान व्यक्त केले. मोरे म्हणाले की, ‘लोकमत’ने सातत्याने वृत्त दिले होते, त्यामुळे ही सुविधा देण्यासाठी पाठपुरावा करावा लागला, सतर्क माध्यमांमुळेही नागरिकांच्या समस्या सुटत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.