कामत यांच्या लोकसभा जागेवर काँग्रेसच्या तीन नेत्यांचा डोळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 03:31 PM2019-03-11T15:31:44+5:302019-03-11T15:35:52+5:30

मुंबई काँग्रेसमध्ये सध्या एका जागेवरुन जोरदार रस्सीखेच सुरू आहे ती म्हणजे उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघ 

Lok Sabha Elections 2019 - three congress leader claims for one seat | कामत यांच्या लोकसभा जागेवर काँग्रेसच्या तीन नेत्यांचा डोळा 

कामत यांच्या लोकसभा जागेवर काँग्रेसच्या तीन नेत्यांचा डोळा 

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात 9 वेळा काँग्रेस खासदार निवडून आल्याने हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. गुरुदास कामत यांच्या निधनानंतर संजय निरुपम यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघावर दावा केला.

मुंबई - लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरु केली. मात्र मुंबईकाँग्रेसमध्ये सध्या एका जागेवरुन जोरदार रस्सीखेच सुरू आहे ती म्हणजे उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघ 

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या तीन जेष्ठ नेत्यांनी दावा केला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चर्तुवेदी आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. सध्यातरी या रस्सीखेचमध्ये संजय निरुपम यांचे पारडे जड आहे. काँग्रेस नेते गुरुदास कामत यांच्या निधनानंतर संजय निरूपम यांनी या मतदारसंघाची बांधणी केली आहे. 

उत्तर पश्चिम मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, 2014 निवडणुकीचा अपवाद वगळता या लोकसभा जागेवर काँग्रेसचा खासदार निवडून आलेला आहे. 2014 मध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार गजानन किर्तीकर यांनी काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांचा पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही या मतदारसंघातील 6 जागांवर शिवसेना-भाजपचे आमदार निवडून आले होते. त्यामुळे पुन्हा हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसला कठीण संघर्ष करावा लागणार आहे. 

प्रियंका चर्तुवेदी आणि कृपाशंकर सिंह यांच्या तुलनेत संजय निरुपम यांचा जनसंपर्क या मतदारसंघात जास्त आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा जागांपैकी एकाही जागेवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला विजय मिळवता आला नाही. नरेंद्र मोदी यांच्या लाटेत आघाडीचा एकही शिलेदार मुंबईतून निवडून आला नाही त्याचा फटका काँग्रेसला बसला होता. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज झाली आहे. 

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम असा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. गुरुदास कामत यांच्याआधी काँग्रेसचे सुनील दत्त सलग तीनवेळा या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यावेळी सुनील दत्त यांच्याविरोधात शिवसेनेकडून संजय निरुपम यांनीही या जागेवर निवडणूक लढवली होती. त्यामुळे निरूपम यांनी उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी आग्रह धरलेला आहे. 

त्यामुळे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील इच्छुक उमेदवाराबाबत महाराष्ट्र प्रदेश कमिटीने केंद्रातील काँग्रेस उमेदवार छाननी समितीकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. त्यावर या मतदारसंघासाठी राहूल गांधी कोणाला तिकीट देतात हे येणाऱ्या काळात ठरेल.  
 

Web Title: Lok Sabha Elections 2019 - three congress leader claims for one seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.