लोकसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढणार ? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 03:51 PM2019-03-14T15:51:26+5:302019-03-14T16:19:09+5:30

येत्या काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांची सभा घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मनसेची भूमिका स्पष्ट करतील. मनसेचे पदाधिकारी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.

Lok Sabha elections 2019 - MNS will contest independent in upcoming elections | लोकसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढणार ? 

लोकसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढणार ? 

Next

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र मनसेची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. लोकसभा निवडणूक लढणार की नाही याबाबतही मनसेने सस्पेन्स कायम ठेवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांची सभा घेऊन मनसेची भूमिका स्पष्ट करतील. मनसेचे पदाधिकारी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या या शहरांवर मनसेचे लक्ष आहे. निवडणुका लढवायचं ठरलं की याठिकाणी मनसे उमेदवार उभी करु शकते. 

पुढील आठवडाभरात राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत लढवणार की नाही याबाबत घोषणा करणार आहे. सध्या शिवसेना-भाजपा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भूमिकेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे लक्ष ठेवून आहेत. मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही होते. मात्र काँग्रेसने मनसेला आघाडीत घेण्यासाठी विरोध केला. मनसेला आघाडीत घेतल्यावर त्याचा फटका उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत काँग्रेसला बसू शकतो अशी शक्यता काँग्रेसकडून वर्तवली जात आहे. 

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत मनसे आमदाराच्या शिवसेना प्रवेशावर भाष्य करताना पवार म्हणाले होते की, कोणताही आमदार अथवा व्यक्ती पक्ष सोडून गेल्याने तो पक्ष संपत नसतो, मनसेची ताकद राज्यात आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ही ताकद दिसू शकते असं वक्तव्य शरद पवारांनी केले होतं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातून बाबाजी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मनसे कल्याण आणि ईशान्य मुंबई या लोकसभा मतदारसंघासाठी जागांसाठी आग्रही होतं. त्यामुळे मनसे-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याची शक्यता मावळली आहे. मात्र काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस मनसेला छुपा पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. 

मनसेच्या 13 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करतील असं सांगण्यात येत होतं. मात्र राज ठाकरेंनी निवडणुकांबाबत आचारसंहिता लागल्यानंतर मनसेची भूमिका स्पष्ट करु असं सांगितलं होतं. 
येत्या आठवड्यात राज ठाकरे मनसेची भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्ष नेत्यांच्या बैठकीदेखील सुरु आहे. मागील 2 महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी पश्चिम विदर्भ, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग असे दौरे देखील केलेले आहे. मोदी लाटेतही ज्या ठिकाणी मनसेला मतदान झालं या मतदारसंघाचा आढावा घेण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळासोबत मनसेच्या कार्यकर्त्यांचेही लक्ष लागून राहिलं आहे.  
 

Web Title: Lok Sabha elections 2019 - MNS will contest independent in upcoming elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.