पवारांच्या भूमिकेमुळे सुजय विखे भाजपात गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 08:11 AM2019-03-13T08:11:53+5:302019-03-13T08:13:09+5:30

ज्या गोष्टी आम्ही त्यांना विसरुन जा, मोठ्या मनाने सुजयला माफ करा, असे सांगत होतो त्याकडे लक्ष न देता शरद पवार यांनी सगळा जुना इतिहास पुन्हा समोर आणला त्यामुळे सुजयला भाजपात जाण्यावाचून पर्याय राहिला नाही, असे विखे यांच्या गोटातून सांगण्यात आले

Lok Sabha Elections 2019 - Due to Sharad pawar strategy, Sujay Vikhe Patil joined BJP | पवारांच्या भूमिकेमुळे सुजय विखे भाजपात गेले

पवारांच्या भूमिकेमुळे सुजय विखे भाजपात गेले

googlenewsNext

अतुल कुलकर्णी -

मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सोमवारी विखे-पवार परिवारातील सगळे जुने संदर्भ समोर आणले आणि आता राष्ट्रवादीत जाण्याचा कोणताही मार्गच शिल्लक राहिला नाही, त्यामुळे सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला, अशी माहिती समोर येत आहे.

यावेळी पहिल्यांदा अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते लोकसभा निवडणुकीसाठी सुजय विखे यांना जागा सोडा असे सांगत होते. तर दिल्लीतही राहुल गांधी यांनी शेवटच्या क्षणी सोमवारी सकाळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना सुजयला राष्ट्रवादीत जाण्यासाठी परवानगी दिली होती.

राहुल गांधी म्हणाले होते की, शरद पवार यांच्याशी बोलून घ्या, सुजय राष्ट्रवादीत गेले तरी आपली हरकत नाही, मात्र त्यानंतर काही वेळातच शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्याला कसे राजकारणातून संपवण्याचे डावपेच आखले होते, इथपासून ते राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असताना ही जागा का सोडायची इथपर्यंतचे संदर्भ देत तीव्र विरोध केला. ज्या गोष्टी आम्ही त्यांना विसरुन जा, मोठ्या मनाने सुजयला माफ करा, असे सांगत होतो त्याकडे लक्ष न देता शरद पवार यांनी सगळा जुना इतिहास पुन्हा समोर आणला त्यामुळे सुजयला भाजपात जाण्यावाचून पर्याय राहिला नाही, असे विखे यांच्या गोटातून सांगण्यात आले.

मात्र पहिल्या दिवशी शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेणे आणि दुसऱ्या दिवशी विरोधी पक्ष नेत्याच्या मुलानेच भाजपात प्रवेश करणे या दोन्ही गोष्टींमुळे आघाडीत टोकाची अस्वस्थता निर्माण झाली आहे. पवारांच्या माघार घेण्यामुळे राज्यभर अत्यंत चुकीचा संदेश गेला आहे, असेही एका नेत्याने बोलताना स्पष्ट केले. 

आधीच काँग्रेसकडे जालना, औरंगाबाद, सांगली, चंद्रपूर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नागपूर येथे तुल्यबळ उमेदवार नाहीत. तर राष्ट्रवादीकडे नगर दक्षिण, ठाणे, कल्याण, रावेर, बीड येथे उमेदवार नाहीत. अशावेळी दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी स्वत:च्या राजकीय महत्वाकांक्षा बाजूला ठेवून सध्याच्या परिस्थितीचे भान ठेवायला हवे होते पण ते होत नाही, त्यामुळे वातावरण चांगले असताना आम्ही आमच्या हाताने आमचेच नुकसान करुन घेत आहोत असेही राष्ट्रवादीच्या एका अस्वस्थ नेत्याने बोलून दाखवले. 

कोणत्याही परिस्थितीत दोन्ही काँग्रेसमधील जागांचे वाटप तातडीने संपवा आणि एकत्रित पत्रकार परिषद घेऊन उमेदवार जाहीर करा, अशी सूचना राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना केल्या आहेत. काँग्रेसचे नेते वंचित आघाडीच्या निर्णयासाठी थांबले होते. पण प्रकाशआंबेडकर यांनी भूमिका स्पष्ट केल्यामुळे आता लवकरात लवकर नावे अंतिम करु असा निरोप काँग्रेसने राष्ट्रवादीकडे पाठवला.

मुलाला थांबवू शकले नाहीत ते पक्ष काय वाढवणार ?
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव भाजपामध्ये गेल्यामुळे विखेंवर स्वपक्षीयांकडून टोकाची टीका सुरु झाली. आत्तापर्यंत विरोधी पक्ष नेता म्हणून विखे यांनी कधीही मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला चढवला नाही, सतत बोटचेपी भूमिका घेतली. हेच विरोधी पक्ष नेते राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत परदेश दौऱ्यावरही जायला निघाले होते. जे स्वत:च्या मुलाला पक्षात थांबवू शकत नाहीत ते जनतेला काय सांगणार अशा प्रतिक्रिया अनेक नेत्यांनी बोलून दाखवल्या. 

बाळासाहेब थोरात सगळ्यात खूष !
या सगळ्या नाट्यात अहमदनगर जिल्ह्यातील विखेंचे राजकीय प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात मात्र सगळ्यात खूप असल्याचे बोलले जात आहे. थोरात यांनी या प्रकरणी मध्यस्थी केली असती तर चित्र वेगळे झाले असते पण केंद्रीय काँग्रेस कार्यकारणीचे सदस्य असूनही त्यांनी या सगळ्या नाट्यात बघ्याची भूमिका जाणीवपूर्वक घेतली असाही सूर  होता.

राधाकृष्ण विखे यांची प्रतिक्रिया
सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशानंतर अहमदाबाद येथे असलेले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मला यावर काहीही बोलायचे नाही. मी मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा निर्णय घेण्यास तो स्वतंत्र आहे. विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देण्यास मला कोणीही सांगितलेले नाही. मी राजीनामा देणार नाही. मी काँग्रेसमध्येच राहणार आहे. पक्ष नेतृत्व जी जबाबदारी देईल ती पाळण्यास मी बांधील आहे असेही ते म्हणाले. 

Web Title: Lok Sabha Elections 2019 - Due to Sharad pawar strategy, Sujay Vikhe Patil joined BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.