Lok sabha Election : मतदानासाठी महाराष्ट्रात 3 लाख शाईच्या बाटल्या, जाणून घ्या कुठं बनते ही शाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 06:34 PM2019-03-25T18:34:18+5:302019-03-25T18:35:19+5:30

या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकरिता महाराष्ट्रातील 48 मतदार संघांमध्ये पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

Lok sabha Election: 3 lakh ink bottles in Maharashtra for voting, Know where ink is made | Lok sabha Election : मतदानासाठी महाराष्ट्रात 3 लाख शाईच्या बाटल्या, जाणून घ्या कुठं बनते ही शाई

Lok sabha Election : मतदानासाठी महाराष्ट्रात 3 लाख शाईच्या बाटल्या, जाणून घ्या कुठं बनते ही शाई

मुंबई : लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात सुमारे 3 लाख शाईच्या बाटल्या लागणार असून त्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारा हा काळा ठिपका निवडणुकांचा अविभाज्य असा घटक बनला आहे.

या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकरिता महाराष्ट्रातील 48 मतदार संघांमध्ये पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत सुमारे 3 लाख शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली होती. या सर्व बाटल्या राज्याला प्राप्त झाल्या असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई  म्हैसूर पेंटस् कंपनीमार्फत बनवली जाते.

राज्यातील 48 मतदार संघांमध्ये सुमारे 95 हजार मतदान केंद्र असून त्यावर या शाईच्या बाटल्या त्याचबरोबर मतदानासाठी आवश्यक ते साहित्य पुढील आठवड्यात पोहोच करण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत प्रयत्न सुरु आहेत. मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी पोलींग ऑफीसर मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली नाही याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करु देत नाही ते मतदानासाठी अपात्र असल्याचे मतदान अधिकारी सांगू शकतात. जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.

Web Title: Lok sabha Election: 3 lakh ink bottles in Maharashtra for voting, Know where ink is made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.