...तर राधाकृष्ण विखे पाटील यांचा पराभव झाला असता - तांबे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 05:31 PM2019-03-19T17:31:38+5:302019-03-19T17:32:54+5:30

मुंबई - अहमदनगर जिल्ह्यातील थोरात आणि विखे पाटील यांचा संघर्ष खूप पूर्वीपासूनचा आहे. 1975-76 च्या आधीपासून हा संघर्ष आहे. ...

Lok Sabha Election 2019: If Thorat had taken stand, then Vikhe Patil would have lost in 2009 assembly elections - Satyajeet Tambe | ...तर राधाकृष्ण विखे पाटील यांचा पराभव झाला असता - तांबे

...तर राधाकृष्ण विखे पाटील यांचा पराभव झाला असता - तांबे

googlenewsNext

मुंबई - अहमदनगर जिल्ह्यातील थोरात आणि विखे पाटील यांचा संघर्ष खूप पूर्वीपासूनचा आहे. 1975-76 च्या आधीपासून हा संघर्ष आहे. वसतंदादा पाटील आणि शंकरराव चव्हाण यांच्यातील गटतटाच्या राजकारणामध्ये विखे पाटील घराणं हे शंकरराव चव्हाणांच्या पाठिशी होते. त्यातून हा सत्तासंघर्ष सुरु आहे. त्याचा फटका काँग्रेस पक्षाला झाला आहे हे नाकारता येणार नाही. 2009 मध्ये विधानसभेच्या मतदारसंघात फेररचना करण्यात आली. यामध्ये बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघातील 28 गावं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात गेली. त्यावेळी थोरातांनी जर भूमिका घेतली असती तर राधाकृष्ण विखे पाटील यांचा पराभव झाला असता असा गौप्यस्फोट डॉ.सत्यजीत तांबे यांनी केला आहे. लोकमत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तांबे यांनी जनतेशी संवाद साधला.

यावेळी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले की, 2007 साली मी जिल्हा परिषदेत निवडून आलो. जिल्हा परिषदेत 33 सदस्यांपैकी 25 सदस्य माझ्यासोबत होते. त्यांनी मला जिल्हा परिषद अध्यक्ष करावं अशी मागणी केली होती. त्यावेळी वरिष्ठांच्या बैठकीत दोन्ही गटांना समान संधी दिली जावी असा निर्णय घेतला. तेव्हा शालिनी विखे पाटील आणि मी आम्हा दोघांना प्रत्येकी सव्वा वर्ष अध्यक्षपद मिळेल असं ठरवण्यात आलं होतं. मात्र सव्वा वर्षांनी शालिनीताईंनी राजीनामा दिला नाही. तेव्हा माझं वय 23 वर्षे होतं. त्यामुळे संधी असतानाही मी अध्यक्ष बनू शकलो नाही. साहजिकच तरूण असल्यामुळे माझ्या मनात तो राग होताच असा खुलासा सत्यजीत तांबे यांनी बोलताना केला.  
दरम्यान 2009 मध्ये विधानसभा मतदारसंघात फेररचना झाली त्यावेळी आम्ही राहत असलेली गावं राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात मतदारसंघात गेली. त्यामुळे थोरात-विखे पाटील संघर्ष संपावा असं नियतीला ही मान्य नसावं  2009 मध्ये मी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात काम केलं असं न म्हणता त्या निवडणुकीत मी तितक्या ताकदीने त्यांच्यासाठी काम केलं नाही. इतकचं नव्हे तर बाळासाहेब थोरातांनी भूमिका घेतली असती तर विखे पाटील 2009 विधानसभा निवडणुकीत विजयी होणं शक्य नव्हते असं सत्यजीत तांबे यांनी सांगितले.  

2009 ची विधानसभा निवडणूक ही संघर्षमय होती. अवघ्या 12 हजारच्या फरकाने ही निवडणूक विखे पाटील यांनी जिंकली होती. 2012 मध्ये पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक होती त्यावेळी बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय तेव्हा नुकताच राजकारणात आला होता, आम्ही एकत्र बसलो यापुढे संघर्ष होणार नाही असं आमच्यात ठरलं, तेव्हापासून मी माझ्यापरिने या दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे असा दावा सत्यजीत तांबे यांनी  केला. 

श्रध्दा आणि सबुरी...सुजय विखेंना दिला होता सल्ला 
डॉ. सुजय विखे हे गेली दोन-तीन वर्ष लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत होते, काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवावी अशी इच्छा त्यांची होती. मात्र ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसची होती त्यातून जो संघर्ष झाला त्यातून सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. एक मित्र म्हणून सुजय यांना मी सल्ला दिला होता.आपण साईबाबांच्या नगर जिल्ह्यातून येतो त्यामुळे श्रध्दा आणि सबुरी पाळली पाहिजे मात्र ते पुढे निघून गेले होते, त्यांचा निर्णय योग्य आहे की नाही हे अहमदनगरची जनता ठरवेल. 

तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यात प्रचार न करण्याची भूमिका घेतली आहे त्यावर बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले की, देशाच्या राजकारणात पिता-पुत्र एकमेकांच्या विरोधात लढत असल्याचं हे काही नवीन नाही, निलंगेकर यांच्या घराण्यात आजोबा-नातू यांच्यात अनेक वर्षापासून लढाई सुरु आहे. आपली लढाई वैचारिक आहे, काँग्रेसकडून त्यांनी आघाडीचा प्रचार करायला हवं असं माझं वैयक्तित मत आहे. अशोक चव्हाण, मल्लिकार्जुन खर्गे हे राधाकृष्ण विखे पाटील यांची समजूत काढण्यात यशस्वी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

पाहा व्हिडीओ 

Web Title: Lok Sabha Election 2019: If Thorat had taken stand, then Vikhe Patil would have lost in 2009 assembly elections - Satyajeet Tambe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.