चारकोप-मालाड मेट्रोलाही खो, वृक्षतोडीला विरोध, भाजपाची पुन्हा कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 06:11 AM2017-11-25T06:11:59+5:302017-11-25T06:12:10+5:30

मुंबई : गोरेगाव पूर्व, आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर शिवसेनेने आता मेट्रो स्थानकांचा प्रस्तावही रोखला आहे.

Lack of Charkop-Malad metro, Opposition to tree, Resignation of BJP again | चारकोप-मालाड मेट्रोलाही खो, वृक्षतोडीला विरोध, भाजपाची पुन्हा कोंडी

चारकोप-मालाड मेट्रोलाही खो, वृक्षतोडीला विरोध, भाजपाची पुन्हा कोंडी

Next

मुंबई : गोरेगाव पूर्व, आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर शिवसेनेने आता मेट्रो स्थानकांचा प्रस्तावही रोखला आहे. मुंबईतील विविध विकासकामांमध्ये बाधित ठरणारे एक हजार वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. यामध्ये चारकोप-मालाड येथील मेट्रो २-अ चारकोप डेपो व वर्कशॉपच्या बांधकामात अडथळा ठरणाºया ४१० वृक्षांच्या छाटणीच्या प्रस्तावाचा समावेश होता. मात्र कोणत्याही वृक्षतोडीला परवानगी देण्यापूर्वी त्या परिसराची पाहणी होणे आवश्यक असल्याची भूमिका घेत शिवसेनेने वृक्ष प्राधिकरणाची बैठक शुक्रवारी तहकूब केली. यामुळे भाजपाचा हा प्रकल्प लांबणीवर पडणार आहे.
भाजपाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेट्रोला शिवसेनेने सुरुवातीपासून विरोध केला आहे. आरे कॉलनीत मेट्रो कारशेडच्या प्रस्तावानंतर मेट्रो ३ प्रकल्पाच्या इलेक्ट्रिक सब स्टेशनसाठी अंधेरी येथे मलनिस्सारण प्रकिया केंद्राकरिता राखीव असलेला भूखंड देण्याचा सुधार समितीच्या पटलावरील प्रस्ताव शिवसेनेने फेटाळून लावला होता. मेट्रोच्या स्थानकांसाठी गोरेगाव विभागात ३८ आणि चारकोप-मालाड येथील मेट्रो २-अ, चारकोप डेपो व वर्कशॉपच्या बांधकामासाठी ३७२ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत शुक्रवारी मंजुरीसाठी आला होता. मात्र मेट्रोच्या अन्य तीन प्रस्तावांप्रमाणे हा प्रस्तावही रखडण्याची चिन्हे आहेत.
वृक्ष प्राधिकरणाच्या अजेंड्यावर एकूण एक हजार वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव शुक्रवारी मांडण्यात आला. यामध्ये मेट्रोच्या प्रस्तावांबरोबरच कांदिवली, बोरीवली येथील नाला रुंदीकरणात दोनशे झाडे, पश्चिम रेल्वेच्या सहाव्या मार्गिकेच्या कामांमध्ये बाधित झाडे तोडण्याचाही प्रस्ताव होता. या प्रस्तावानुसार ७५ झाडे तोडून त्या ऐवजी दीडशे झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार होते. मात्र विकासकामांच्या नावाखाली सर्रास कत्तल होत असल्याचा आक्षेप सभागृह नेते यशवंत जाधव यांनी या बैठकीत घेतला.
या वृक्षांच्या छाटणीची गरज
आहे का? याची खात्री करण्यासाठी या ठिकाणांची पाहणी करण्याची मागणी जाधव यांनी केली. त्यामुळे कोणतेही प्रस्ताव मंजूर न करताच बैठक तहकूब करण्यात आली.
>प्रत्येक प्रस्तावापूर्वी पाहणी सक्तीची
वृक्ष प्राधिकरणाच्या पटलावर वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव येण्यापूर्वी त्या ठिकाणाची पाहणी करण्यात येत असे. मात्र ही प्रथा कालांतराने बंद पडली.
२५ वृक्षांपर्यंतच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे अधिकार आयुक्तांना मिळाल्याने वृक्ष तोडण्याचे प्रस्ताव थेट बैठकीत मंजुरीसाठी येऊ लागले होते.
मात्र यापुढे प्रत्येक प्रस्तावापूर्वी त्या ठिकाणाची पाहणी करून वृक्ष छाटणीची आवश्यकता आहे का, याची खात्री करून घेण्यात येणार आहे, अशी ठरावाची सूचना सभागृह नेते यशवंत जाधव यांनी मांडली आहे.
>असे आहेत वृक्ष तोडण्याचे प्रस्ताव
वांद्रे पूर्व येथील बीकेसीमधील भारतनगर रोड ते वाल्मीकीनगर ते पोलीस बीट चौकीपर्यंतच्या नियोजित रस्त्याच्या बांधकामात तसेच पर्जन्य जलवाहिनीच्या कामात अडथळा ठरणारे ५४ वृक्ष तोडणार, यापैकी ३२ वृक्षांचे पुनर्रोपण होणार आहे.
मुंबई मेट्रो स्थानकाच्या विकासासाठी ३८ वृक्ष तोडणार, २३ वृक्षांचे
पुनर्रोपण
चारकोप-मालाड येथील मेट्रो २-अ चारकोप डेपो व वर्कशॉपच्या बांधकामात अडथळा ठरणारे ३७२ वृक्ष तोडणार, २२ वृक्षांचे पुनर्रोपण
कांदिवली पूर्व येथील मार्गिकेच्या प्रस्तावित बांधकामात अडथळा ठरणारे १६८ वृक्ष तोडणार, ११० वृक्षांचे पुनर्रोपण बोरीवली पश्चिम येथील चंदावरकर नाल्याच्या सुधारणा व बांधकाम करण्याच्या कामात अडथळा ठरणारे १३५ वृक्ष तोडणार, ८५ वृक्षांचे पुनर्रोपण कांदिवली पूर्व येथील गौतमनगर नाल्याच्या बांधकामात बाधित १६९ वृक्ष तोडणार, ३५ वृक्षांचे पुनर्रोपण बोरीवली पूर्व येथील बीसीटी-बीव्हीआय मार्गिकेमधील प्रस्तावित पुलाच्या बांधकामात अडथळा ठरणारे ६९ वृक्ष तोडणार, ५२ वृक्षांचे पुनर्रोपण

Web Title: Lack of Charkop-Malad metro, Opposition to tree, Resignation of BJP again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.