हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कलला हिरवळीचा साज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 06:07 AM2019-06-09T06:07:32+5:302019-06-09T06:11:56+5:30

झाडे लावून दिला पर्यावरण जतनाचा संदेश । स्वच्छतेसाठीची घोषवाक्ये प्रवाशांसाठी प्रबोधनात्मक

King's Circle on Harbor Road | हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कलला हिरवळीचा साज

हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कलला हिरवळीचा साज

Next

मुंबई : हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कल स्थानकाला नवे रूप मिळाले आहे. झाडे लावून स्थानकाला हिरवळीचा साज चढवण्यात आला आहे. किंग्ज सर्कल स्थानकाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. स्थानकाच्या परिसरात झाडे, झुडपे, विविध फुलांची रोपे लावण्यात आली आहेत. जेथे कचराकुंडी होती तेथे आता छोटीशी बाग तयार करण्यात आली आहे. स्थानकाच्या भिंतीवर आकर्षक कार्टून काढण्यात आले आहेत.

ओसंडून वाहणारी कचराकुंडी, अस्वच्छ पायऱ्या, थुंकून लाल झालेल्या भिंती असे काहीसे चित्र पूर्वी किंग्ज सर्कल स्थानकाचे होते. यावर उपाय म्हणून स्टेशन प्रबंधक एन.के. सिन्हा यांनी येथील सर्व कचरा साफ करण्याचे ठरविले. त्यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने अस्वच्छता दूर होण्यास मदत झाली. त्यानंतर भिंतींवर आकर्षक कार्टून काढण्यात आले. तसेच ‘मुलगा आईला सांगतो, आई कचरावाला आला. तर आई त्याला उत्तर देते, कचरावाले तर आपण आहोत, तो सफाईवाला आहे,’ अशा आशयाचे संदेश, विविध घोषवाक्येही चित्ररूपात साकारण्यात आले.

स्वच्छता हेच ध्येय
अस्वच्छ स्थानक स्वच्छ, सुंदर करणे हेच आमचे ध्येय होते. त्यामुळेच आताचे किंग्ज सर्कल अधिक सुंदर झाले आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे करत आहोत. किंग्ज सर्कलमध्ये सकारात्मक बदल केल्यामुळे मुंबई विभागाच्या व्यवस्थापकांकडून आम्हाला पारितोषिकही मिळाले आहे.
- एन.के. सिन्हा, स्टेशन प्रबंधक

विद्यार्थ्यांचाही पुढाकार
स्थानकाच्या परिसरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि स्वयंसेवकांनी हरित स्थानकासाठी पुढाकार घेतला. त्यामुळेच मुंबईतील इतर स्थानकांपैकी किंग्ज सर्कल स्थानक अधिक स्वच्छ आणि सुंदर असल्याची प्रतिक्रिया प्रवासी राजेश असरानी यांच्यासह येथून प्रवास करणाºया अनेक प्रवाशांनी दिली. प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकाला नवीन झळाळी देण्यात आली आहे. झाडे लावून पर्यावरणाचे संवर्धन करण्यास हातभार लावला जात आहे, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: King's Circle on Harbor Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.