शिवी दिली म्हणून मित्राची हत्या; आरोपीला सोलापूरमधून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 03:27 AM2019-07-23T03:27:43+5:302019-07-23T03:27:55+5:30

मुंबई : शिवी दिली म्हणून मित्राची हत्या केल्याची घटना माटुंगा पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघड झाली आहे. टिळक पुलाखाली रक्ताच्या ...

Kill a friend as he gives a shivir; | शिवी दिली म्हणून मित्राची हत्या; आरोपीला सोलापूरमधून अटक

शिवी दिली म्हणून मित्राची हत्या; आरोपीला सोलापूरमधून अटक

Next

मुंबई : शिवी दिली म्हणून मित्राची हत्या केल्याची घटना माटुंगा पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघड झाली आहे. टिळक पुलाखाली रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या तरुणाच्या हत्याप्रकरणातून ही बाब समोर आली आहे. या प्रकरणी सोलापूरमधून मित्र वीरभद्रा मल्लीनाथ हिरेमठ (२३) याला अटक करण्यात आली आहे.

टिळक पुलाखाली २९ जून रोजी एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृतदेहाजवळ कुठल्याही स्वरूपाचे ओळखपत्र नव्हते. माटुंगा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत, शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत, अधिक तपास सुरू केला. परिसरातील हमाल, मजूर यांच्याकडे तपास पथकाने शोध सुरू केला. तपासात, दोन ते तीन हजार मजुरांकडे चौकशी केली. अखेर तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर १ जुलै रोजी त्याची ओळख पटली. त्याला एचआयव्हीची लागण झाली असल्याने कुटुंबीयांनीही त्याला नाकारले होते. त्यामुळे त्यांच्याकडून त्याच्याबाबत काही माहिती मिळाली नाही. १ जुलै रोजी ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला. दरम्यान, तपासात तो जवळपासच्या परिसरात हमालीचे काम करत असल्याचे लक्षात आले. त्याच दरम्यान हिरेमठ त्याच्यासोबत दारूपार्टी करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार, त्यांनी सोलापूरमध्ये लपून बसलेल्या हिरेमठला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

२४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
२९ जूनच्या आदल्या रात्री दोघेही नशा करत होते. त्याच दरम्यान त्यांच्यात किरकोळ वाद झाला. या दरम्यान तरुणाने त्याला शिवी दिली. याच रागात त्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करत पळ काढला. त्यानंतर तो गावी गेला. माटुंगा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने शिताफीने त्याचा शोध घेत वीरभद्राला अटक केली. स्थानिक न्यायालयाने त्याला २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Kill a friend as he gives a shivir;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून