मालवणीत तरुणीचे अपहरण,आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न?; विनयभंग केल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 02:49 AM2018-01-24T02:49:57+5:302018-01-24T02:50:19+5:30

एका १९ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिचा विनयभंग करण्याचा प्रकार मालवणीत रविवारी घडला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या दखलपात्र गुन्ह्यात (एफआयआरमध्ये) अपहरणाचे कलम लावण्यात आलेले नाही.

Kidnapping of a woman in Malvani, trying to save the accused ?; Accused of molestation | मालवणीत तरुणीचे अपहरण,आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न?; विनयभंग केल्याचा आरोप

मालवणीत तरुणीचे अपहरण,आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न?; विनयभंग केल्याचा आरोप

Next

मुंबई : एका १९ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिचा विनयभंग करण्याचा प्रकार मालवणीत रविवारी घडला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या दखलपात्र गुन्ह्यात (एफआयआरमध्ये) अपहरणाचे कलम लावण्यात आलेले नाही. त्यामुळे संशयित आरोपीला पोलीस पाठीशी घालत असल्याचे पीडित तरुणीचे म्हणणे आहे.
सोनी (नावात बदल) ही तरुणी मालवणीतील भाबरेकरनगर परिसरात तिच्या भावाच्या घरी राहते. तिच्यासोबत भाऊ, भाचा आणि अन्य कुटुंबीय राहतात. त्यांच्या घरात स्वच्छतागृह नसल्याने त्यांना घराच्या बाहेर असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो. त्यानुसार रविवारी सकाळी साडेचारच्या सुमारास सोनी स्वच्छतागृहात जाण्यासाठी निघाली. ती जशी बाहेर आली तसे तिच्या शेजारी राहणारा सुनील सहानी नामक इसम तिच्यामागून आला. त्याने सोनीचे तोंड दाबून तिला बळजबरी स्वत:च्या घरात नेले. त्यानंतर तिच्या ओढणीने तिचे तोंड तसेच हाथ, पायही बांधले. त्यानंतर लग्न करण्याची गळ तो घालू लागला. तोंड बांधले असल्याने तिने त्याच अवस्थेत त्याला मान हलवत नकार दिला. त्यानंतर त्याचे दोन मित्र तिच्याजवळ आले आणि त्यांनीदेखील तिला दोन महिन्यांसाठी ठाण्याला घेऊन जाऊ, असे इतर मित्रांना सांगितले. सहानीच्या घरातील मागच्या खिडकीतून तिला पळवून घेऊन जाण्याचा त्यांचा कट होता. मात्र, खिडकी वेळेवर न उघडल्याने त्यांना तसे करता आले नाही.
सोनीच्या घरच्यांनी तिला शोधण्यास सुरुवात केली हे समजताच त्याचे दोन मित्र निघून गेले. मात्र, सोनीला सहानीने दुपारी बारा वाजेपर्यंत स्वत:च्या घरात कोंडून ठेवले. त्याच्याही घराचा दरवाजा स्थानिकांनी आणि सोनीच्या घरच्यांनी ठोठावला. तेव्हा सहानीने दरवाजा उघडून तो पसार झाला. स्थानिकांनी सोनीला सोडविले आणि नंतर या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पोलिसांनी यात अपहरणाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे सहानी आणि त्याच्या मित्रांना पोलीस वाचवत असल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या प्रकरणी मालवणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Web Title: Kidnapping of a woman in Malvani, trying to save the accused ?; Accused of molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.