मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी शोध समितीची स्थापना करण्यात आली आहे. प्रख्यात अवकाश शास्त्रज्ञ आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्त्रो’चे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समिती मुंबई विद्यापीठासाठी पात्र उमेदवारांचा शोध घेणार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी त्याबाबत आदेश जारी केले.
मुंबई विद्यापीठातील आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी गोंधळाबद्दल मंगळवारी राज्यपालांनी संजय देशमुख यांची कुलगुरूपदावरून हकालपट्टी केली. मुंबई विद्यापीठाच्या १६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या कुलगुरूवर अशी कारवाई झाली. नव्या कुलगुरूंसाठी राज्यपालांनी बुधवारी शोध समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, कस्तुरीरंगन हे मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. १९९४ ते २००३ दरम्यान त्यांनी इस्त्रोचे अध्यक्षपद सांभाळले होते. ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ या तीन नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले कस्तुरीरंगन हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. शिवाय, २००३ ते २००९ या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत. सध्या ते राष्ट्रीय शिक्षण धोरणासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत.
निकाल जाहीर करण्यास झालेला विलंब आणि संजय देशमुख यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी यावरून विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केले होते. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी तर ‘आता पुन्हा चूक नको. कुलगुरू म्हणून एखादी लायक व्यक्ती नेमावी. कार्यप्रणाली सुधारा,’ असे टिष्ट्वटही केले. मात्र, कस्तुरीरंगन यांच्यासारख्या प्रख्यात संशोधकाकडेच मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंचा शोध घेण्याची जबाबदारी राज्यपालांनी दिल्याने विरोधकांची बोलतीच बंद झाली आहे.