Jet Airways Flight : नुकसान भरपाई म्हणून प्रवाशाची जेट एअरवेजकडे 30 लाख रुपयांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 12:01 PM2018-09-21T12:01:09+5:302018-09-21T12:17:40+5:30

Jet Airways Flight : प्रवाशानं एअरलाइन्सकडे 30 लाख रुपये नुकसान भरपाई आणि 100 अपग्रेड वाऊचर्स देण्याची मागणी केली आहे. 

Jet Airways Flight :jet passenger wants 30 lakh in compensation 100 business class upgrades who fell ill on Thursday | Jet Airways Flight : नुकसान भरपाई म्हणून प्रवाशाची जेट एअरवेजकडे 30 लाख रुपयांची मागणी

Jet Airways Flight : नुकसान भरपाई म्हणून प्रवाशाची जेट एअरवेजकडे 30 लाख रुपयांची मागणी

googlenewsNext

मुंबई : मुंबईहून जयपूरला जाणाऱ्या जेट एअरवेजच्याविमानातील हवेचा दाब प्रवासादरम्यान वाढल्यानं १६६ प्रवासी आणि पाच कर्मचा-यांचा जीव धोक्यात आला होता. गुरुवारी (20 सप्टेंबर) सकाळी हा सर्व प्रकार घडला. 30 प्रवाशांच्या कान आणि नाकातून रक्तस्राव सुरू झाल्याने वैमानिकाने विमान माघारी वळवून पुन्हा मुंबईत उतरवले. यातील 5 प्रवाशांना  सीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, यातील एका प्रवाशानं एअरलाइन्सकडे 30 लाख रुपये नुकसान भरपाई आणि 100 अपग्रेड वाऊचर्स देण्याची मागणी केल्याचे वृत्त समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरलाइन्सकडून प्रवाशांच्या सोयी-सुविधा पाहण्यात, प्रवाशांच्या काळजी घेण्यामध्ये कमतरता जाणवली, असा आरोपही या प्रवाशानं केला आहे. शिवाय, उड्डाणादरम्यान घडलेल्या घटनेचा व्हिडीओदेखील शेअर करण्याची धमकी दिली आहे.  

दरम्यान, गुरुवारी घडलेल्या प्रकाराबाबत हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आणि महिनाभरात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. जेट प्रशासनाने या घटनेची चौकशी होईपर्यंत या विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन आशिष शर्मा, फर्स्ट आॅफिसर अहमर खान यांच्याकडील विमान उड्डाणाची जबाबदारी काढून घेतली असून त्यांना तळावरील काम दिले आहे. डीजीसीए या प्रकरणाची चौकशी करत असून त्यात वैमानिक दोषी आढळल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे कंपनीने जाहीर केले.

(विमानातील हवेचा दाब घटल्याने १६६ प्रवाशांचे प्राण आले कंठाशी)

नेमके काय घडले विमानात?

जयपूरला जाणा-या ९ डब्ल्यू ६९७ या विमानाने सकाळी ५.५५ वाजता उड्डाण केल्यानंतर काही काळातच आधी विमानातील वातानुकूलन यंत्रणा बंद झाली. प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. हवेचा दाब अनियंत्रित होऊ लागला आणि प्रवाशांना गुदमरल्यासारखा त्रास होऊ लागला. नंतर त्वरित आॅक्सिजन मास्क खाली आले. पण प्रवासी घाबरले. तोवर काही प्रवाशांच्या नाकातून व कानातून रक्त येऊ लागल्याने परिस्थिती गंभीर बनली. विमानात गोंधळ उडाला. या वेळी विमान ११ हजार फूट उंचीवर होते आणि त्याचा वेग ताशी किमान ७०० किमी होता. विमानातील ही परिस्थिती लक्षात येताच ते तातडीने परत मुंबई विमानतळाकडे वळवण्यात आले. तोवर ते उमरगावपर्यंत गेले होते. तेथून ते दमण, वापीच्या हवाई हद्दीतून सिल्वासामार्गे पुन्हा मुंबईत सकाळी ७.१० वाजता परतले. विमानातील परिस्थितीची कल्पना आधीच देण्यात आल्याने विमानतळावर वैद्यकीय उपचारांची सोय करण्यात आली होती. ज्या पाच प्रवाशांना सर्वाधिक त्रास झाला, त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विमान जसजसे हवेत उंच जाऊ लागते, तेव्हा आतील हवेचा दाब कमी होऊ लागतो. तो नियंत्रित राहावा आणि श्वसनासाठी योग्य परिस्थिती राहावी यासाठी ((केबिन प्रेशर) दाब नियंत्रणाची विशिष्ट प्रणाली सुरू करावी लागते. नेमकी तीच सुरू नसल्याने १६६ प्रवाशांचा जीव गुदमरला. तेव्हा तत्काळ आॅक्सिजन मास्क सुरू नसते, तर ती गंभीर परिस्थिती झाली असती, असे म्हणणे प्रवाशांनी मांडले. मात्र हवेचा दाब कमी-जास्त होणे ही कंपनीची किंवा वैमानिकांची चूक नसून ती नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असलेली बाब आहे, असा दावा जेटने केला.

(जेट एअरवेजला दंड करा, प्रवाशांना नुकसानभरपाई द्या, प्रवासी संघटनेची मागणी)
दरम्यान, सरकारने या प्रकरणी चौकशी जाहीर केली असली तरी ही चौकशी अत्यंत निष्पक्ष व पारदर्शक प्रकारे व्हावी व या प्रकाराला जबाबदार असलेल्या जेट एअरवेजला दंड आकारण्यात यावा, अशी मागणी एअर पॅसेंजर असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर रेड्डी यांनी केली आहे. डीजीसीएने ही चौकशी लवकर करावी व चौकशी झाल्यावर येणारा अहवाल जाहीर करावा जेणेकरून यासाठी जबाबदार असलेल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी दबाव राहील. या घटनेमुळे १६६ प्रवाशांचा जीव जाण्याची वेळ आली होती. त्यामुळे सरकारने जेट एअरवेजला शिक्षा करावी, अशा परिस्थितीत नेमकी कोणती पावले उचलावीत यासाठी डीजीसीएने हवाई वाहतूक क्षेत्रातील केबिन क्रूसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत, प्रवाशांना झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक हानीबाबत नुकसानभरपाई देण्यात यावी अशा मागण्या रेड्डी यांनी केल्या आहेत. आणीबाणीच्या प्रसंगी केबिन क्रूनी प्रवाशांना माहिती देणे व दिलासा देणे आवश्यक असताना आजच्या घटनेत असे केले नसल्याने रेड्डी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Web Title: Jet Airways Flight :jet passenger wants 30 lakh in compensation 100 business class upgrades who fell ill on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.