‘जेट’ची उड्डाणे रद्द झाल्याने पर्यटन व्यवसायाला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 06:28 AM2019-04-16T06:28:24+5:302019-04-16T06:28:35+5:30

आर्थिक अरिष्टात सापडलेल्या जेट एअरवेजची उड्डाणे अचानक रद्द होण्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना व पर्यटकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.

'Jait' canceled flights due to tourism business | ‘जेट’ची उड्डाणे रद्द झाल्याने पर्यटन व्यवसायाला फटका

‘जेट’ची उड्डाणे रद्द झाल्याने पर्यटन व्यवसायाला फटका

googlenewsNext

- खलील गिरकर
मुंबई : आर्थिक अरिष्टात सापडलेल्या जेट एअरवेजची उड्डाणे अचानक रद्द होण्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना व पर्यटकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. ‘जेट’चे सुमारे २० हजार कर्मचारी रस्त्यावर येण्याची भीती निर्माण झालेली असतानाच जेटची विमाने जमिनीवर आल्याने पर्यटन व्यवसायात किमान १० टक्क्यांपेक्षा जास्त घट होण्याची भीती कॉक्स अ‍ॅण्ड किंग्जचे विलास भांडारकर यांनी व्यक्त केली.
जेटची सेवा जवळपास बंद पडल्यात जमा आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी विमानांची उड्डाणे रद्द झाल्याचे जाहीर करण्यात येत असल्याने प्रवासी हवालदिल झाले आहेत. पर्यटनाचे बेत आखताना आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत प्रवासाचे आरक्षण काही महिने अगोदर होते. मात्र, शेवटच्या क्षणी हे तिकीट रद्द झाल्याने त्याचा फटका पर्यटकांना व पर्यटन कंपन्यांना बसला आहे. तिकीट रद्द केल्यावर जेटकडून परतावा दिला जातो. मात्र, पर्यटनाचा बेत आखून आगावू आरक्षण केलेल्या पर्यटकांना पर्यटनासाठी जाण्याकरिता वेळेवर तिकीट उपलब्ध होत नाही. तिकीट उपलब्ध न झाल्यास त्याची किंमत प्रचंड वाढलेली असल्याने आर्थिक नियोजन कोलमडते. पर्यटक कंपनीला याचा मोठा फटका बसत असल्याचे भांडारकर म्हणाले.
एप्रिल ते जून हा पर्यटनाचा हंगाम असताना नेमका याच कालावधीत हा गोंधळ सुरूझाल्याने पर्यटन व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे भांडारकर म्हणाले. सिंगापूरला जाण्यासाठी जेटचे तिकीट २७ हजारांत मिळते. मात्र, अशा परिस्थितीत एअर इंडिया व सिंगापूर एअरलाइन्सचे तिकीट शेवटच्या क्षणी तब्बल ७२ हजारांवर गेले; परिणामी दुसऱ्या कंपनीच्या विमानाने चेन्नईद्वारे प्रवास करावा लागल्याचा अनुभव त्यांनी विशद केला. सव्वापाच तासांसाठी १२ तास प्रवास करावा लागल्याची चीड त्यांनी व्यक्त केली. यामुळे अनेक पर्यटकांना बेत रद्द करावे लागल्याची माहिती त्यांनी दिली.
केसरीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश पाटील म्हणाले, जेटच्या परिस्थितीचा फटका पुढील वर्ष, दोन वर्षे पर्यटन व्यवसायावर होण्याची भीती आहे. समूहाने विमान तिकिटे आरक्षित केल्यानंतर शेवटच्या क्षणी उड्डाणे रद्द झाल्यानंतर नव्याने तिकीट काढणे खर्चीक ठरते व मोठा समूह असल्यास सर्वांना एकत्र तिकीट मिळत नाही. कंपनीची प्रतिमा कायम ठेवण्यासाठी केसरीने नुकसान भरून काढत सहल पूर्ण केली.
जेटला आर्थिक अरिष्टातून बाहेर काढण्यासाठी सरकारने मदत करणे गरजेचे असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. आमचे काही पर्यटक बँकॉकमध्ये असताना जेटने उड्डाण रद्द केले. त्यामुळे पर्यटक अडकले. आम्ही कोलंबोमार्गे त्यांना देशात आणले. सध्या जास्त रक्कम देऊन पर्यटन करावे; कारण पुढील वर्षी जास्त दराने तिकीट मिळेल, अशी माहिती पाटील यांनी दिली. (क्रमश:)
>‘आयत्या वेळी सहल पुढे ढकलणे अशक्य’
‘ जेट’ची सेवा विस्कळीत झाल्याने एकट्या केसरी समूहाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागले असल्याची माहिती केसरीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश पाटील यांनी दिली. परदेशी किंवा देशांतर्गत पर्यटनामध्ये व्हिसा, हॉटेल आरक्षण अशा विविध सेवांचे आरक्षण केलेले असते. त्यामुळे सहल पुढे ढकलता येत नाही किंवा मागे घेता येत नाही.

Web Title: 'Jait' canceled flights due to tourism business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.