'ती' जागा सुरक्षितच; पडले असते तरी लागलं नसतं- अमृता फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 08:12 AM2018-10-22T08:12:09+5:302018-10-22T08:27:19+5:30

क्रूझच्या टोकावरील धोकादायक सेल्फीवर सौ. फडणवीसांचं स्पष्टीकरण

it was a safe place amruta fadnavis clarification on selfie at angriya cruise | 'ती' जागा सुरक्षितच; पडले असते तरी लागलं नसतं- अमृता फडणवीस

'ती' जागा सुरक्षितच; पडले असते तरी लागलं नसतं- अमृता फडणवीस

Next

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आंग्रिया क्रूझवरील सेल्फीबद्दल पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे. मी तिथं सेल्फीसाठी गेले नव्हते. तर ताजी हवा एन्जॉय करायला गेले होते, असं अमृता यांनी म्हटलं आहे. मी ज्या जागेवर बसले होते, ती जागा सुरक्षितच होती, असा दावादेखील त्यांनी केला. माझ्यावर कारवाई केल्यानं एखाद्या माणसाचं जरी भलं होत असेल, तर कारवाई करण्यात यावी, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. 

संपूर्ण भारतीय बनावटीची पहिला क्रूझ असलेल्या आंग्रियाचं उद्घाटन शनिवारी झालं. या कार्यक्रमाला केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. यावेळी अमृता फडणवीस यांनी क्रूझच्या टोकाला बसून सेल्फी काढला. विशेष म्हणजे, पोलीस यंत्रणांसह इतरही अधिकारी सौ. फडणवीसांचा सेल्फी स्टंट पाहात असल्याचे व्हिडीओत दिसून आलं. यावरुन अमृता फडणवीस सोशल मीडियावर ट्रोल झाल्या. मात्र सेल्फी काढलेली जागा पूर्णपणे सुरक्षित होती, असा दावा अमृता फडणवीस यांनी केला आहे. 



मी शुद्ध हवेचा आनंद घेण्यासाठी त्या जागी बसले होते. ती जागा असुरक्षित नव्हती, असा दावा त्यांनी केला. 'ती ज्या ठिकाणी बसले होते, ती जागा धोकादायक नव्हती. मी जिथे बसले होते, त्याच्या खालील भागात पायऱ्या होत्या. तिकडे अजून एक बाल्कनी होती. त्यामुळे ती जागा अजिबात धोकादायक नव्हती. मला सेल्फी घ्यायला तिकडे जायचं नव्हतं. मी शुद्ध हवेचा आनंद घ्यायला गेले होते. त्यात मी सेल्फी घेतला असेल. पण ती जागा सुरक्षितच होती,' असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. 

Video: अमृता फडणवीस यांचा सेल्फी स्टंट, मुख्यमंत्री-गडकरीही पाहातच राहिले!

अमृता फडणवीस क्रूझच्या टोकाला बसून सेल्फी काढत असताना तिथे पोलीस अधिकारी उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या पत्नींना काय सांगावं, असा प्रश्न त्यांना पडला. त्यावर पोलीस अधिकारी मला उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी बोलवत होते, असं मिसेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. याशिवाय कोणीही सेल्फीसाठी जीव धोक्यात घालू नये, असं आवाहन त्यांनी केलं. 'सेल्फीसाठी कोणीही जीव धोक्यात घालू नये, असं मला वाटतं. मीही जीव धोक्यात घातला नव्हता. तिकडे उतरल्यावर लगेच शिडी होती. त्यामुळे मी पडले असते, तरी मला मला लागलं नसतं. कारण ते क्रूझचं टोक नव्हतं,' असं त्या म्हणाल्या. 

Web Title: it was a safe place amruta fadnavis clarification on selfie at angriya cruise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.