विक्रोळीतील दुर्घटनेची पालिकेमार्फत चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 06:13 AM2019-04-22T06:13:41+5:302019-04-22T06:13:52+5:30

ट्रकखाली चिरडून मृत्यूचे प्रकरण; गटाराचे झाकण तुटल्यामुळे अपघात

Inquiry from Vikhroli crashes | विक्रोळीतील दुर्घटनेची पालिकेमार्फत चौकशी

विक्रोळीतील दुर्घटनेची पालिकेमार्फत चौकशी

Next

मुंबई : उघडी गटारे, मॅनहोल्स यामध्ये पडून पादचारी जखमी होण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. मुंबईतील पोटविकार तज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा दोन वर्षांपूर्वी उघड्या गटारात पडून मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर, सर्व मॅनहोल्स बंद करणे, गटारांना झाकण लावण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. मात्र, विक्रोळी येथे बुधवारी गटाराचे झाकूण तुटून ट्रक उलटल्यामुळे चार तरुणांचा नाहक बळी गेला. या प्रकरणाची पालिकेमार्फत चौकशी करण्यात येणार आहे.

२०१७ मध्ये आॅगस्ट महिन्यातील मुसळधार पावसात एका उघड्या गटरात पडून डॉ. अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेने मुंबई हळहळली होती. डॉ. अमरापूरकर यांचा मृतदेह गटरातून वाहून थेट समुद्रात सापडला होता. या घटनेची दखल घेत, मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला त्वरित उपाययोजना आखण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, महापालिकेने मुंबईतील सर्व मॅनहोल्सवर झाकण लावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्याप अशा दुर्घटना सुरूच असल्याचे समोर आले आहे.

विक्रोळी येथे बुधवारी रात्री गटाराचे झाकण तुटून ट्रक उलटला होता. या दुर्घटनेत त्या ठिकाणी उभ्या असलेल्या चार स्थानिक तरुणांना नाहक जिवाला मुकावे लागले. यामुळे संपूर्ण विक्रोळी परिसर हळहळला. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत पर्जन्यजल वाहिन्या विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. संबंधित घटनेची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती एका पालिका अधिकाऱ्याने दिली.

अर्थसंकल्पात तीन कोटींची अतिरिक्त तरतूद
पूर्व उपनगरात ९१ हजार ९९८ तर पश्चिम उपनगरात दोन लाख ४३ हजार १८० मॅनहोल्स पर्जन्य वाहिन्यांची मनुष्य प्रवेशिका आहेत. सन २०१९-२० या वर्षाकरिता अर्थसंकल्पात या कामांसाठी तीन कोटी १२ लाख १८ हजार रुपयांची अतिरिक्त तरतूद केली आहे. शहर विभागात ४७ वर्तुळाकार आणि २९५ आयताकृती मनुष्य प्रवेशिकांवर लोखंडी जाळ्या लावण्यात येणार आहेत.

Web Title: Inquiry from Vikhroli crashes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात