Indrani is justifying the plight, Peter's accusation | इंद्राणी पीडितेचा आव आणत आहे, पीटरचा आरोप

मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने तिच्या पतीवरच शीनाच्या हत्येचा आरोप करून सर्वांना धक्का दिला. मात्र, तिच्या या आरोपांना पीटरने विशेष सीबीआय न्यायालयात गुरुवारी उत्तर दिले. इंद्राणीने माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यासाठी अशा प्रकारचे आरोप केले. इंद्राणी स्वत: पीडित असल्याचा आव आणून या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे, असे पीटरने विशेष न्यायालयाला गुरुवारी सांगितले.
गेल्या आठवड्यात इंद्राणी मुखर्जीने तिचा पती पीटर मुखर्जीवरच शीनाच्या हत्येचा आरोप करत न्यायालयात खळबळ उडवली. ‘पीटरने माझा ड्रायव्हर व या खटल्यातील माफीचा साक्षीदार श्यामवर राय याच्या मदतीने शीनाचे अपहरण केले. तिचा शोध लागणार नाही, याची खबरदारी घेत तिची हत्याही केली. तसेच सर्व पुरावेही नष्ट केले. यावर विश्वास ठेवण्यासाठी माझ्याकडे सबळ पुरावे आहेत,’ असा अर्ज इंद्राणीने गेल्या आठवड्यात विशेष न्यायालयात केला होता. ‘इंद्राणीने अटक केल्यानंतर एवढ्या उशिरा हा अर्ज केला. माझ्यावर हे आरोप मुद्दाम करण्यात आले आहेत,’ असे पीटरने न्यायालयाला सांगितले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.