भारतीय चित्रपटसृष्टीने गमावला ‘तारा’, आज मुंबईत होणार अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 06:03 AM2017-12-05T06:03:43+5:302017-12-05T06:04:40+5:30

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक राजकारणी, मंत्री तसेच हिंदी चित्रपटसृष्टीने शशी कपूर यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

Indian film industry lost its 'Tara', to commemorate the funeral in Mumbai today | भारतीय चित्रपटसृष्टीने गमावला ‘तारा’, आज मुंबईत होणार अंत्यसंस्कार

भारतीय चित्रपटसृष्टीने गमावला ‘तारा’, आज मुंबईत होणार अंत्यसंस्कार

Next

मुंबई/नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक राजकारणी, मंत्री तसेच हिंदी चित्रपटसृष्टीने शशी कपूर यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, भारतीय व आंतरराष्ट्रीय चित्रपटात ठसा उमटविणारा, असा अभिनेता होणे नाही. पंतप्रधान म्हणाले की, हिंदी चित्रपटसृष्टीच नव्हे, तर नाट्य चळवळ व भारतीय चित्रपटांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीने ‘तारा’ गमावला.
निधनाचे वृत्त समजताच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, नातू रणबीर कपूर, अभिनेत्री ऐश्वर्या राय, काजोल, राणी मुखर्जी, श्रीमती कृष्णा राज कपूर, रणधीर कपूर हे सारे संध्याकाळी रुग्णालयात पोहोचले होते. अमिताभ व शशी कपूर या जोडगोळीने एकेकाळी बॉलीवूड गाजविले होते.
दिग्दर्शक, निर्माते करण जोहर म्हणाले की, शशी कपूर हे सर्वांना प्रेमात पाडणारं व्यक्तिमत्व होतं. ग्रेट अभिनेता व जंटलमन सिनेस्टार म्हणजे शशी कपूर. त्यांचं सिनेमा आणि थिएटरसाठीचं योगदान अतुलनीय आहे. अभिनेते बोमन इरानी म्हणाले की, हँडसम अभिनेत्याच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. अभिनेता अजय देवगण म्हणाले, जे हँडसम असतात, ते हँडसमप्रमाणेच जगतात. शशी कपूर सदैव आपल्यात राहतील. आज माझ्या जीवनातील सगळ््यात दु:खद दिवस आहे. माझं सारं करिअर ज्यांच्यामुळे घडलं ती व्यक्ती म्हणजे शशी कपूर. माझ्या व्यावसायिक जीवनातील यशाचे सारे श्रेय त्यांनाच जातं. उत्सव सिनेमात रेखा यांच्यासह काम करण्याची संधी देऊन त्यांनी मला मोठी संधी दिली. जीवनातील प्रत्येक क्षणी तुमची उणीव जाणवत राहील. त्यांच्यासारखं बनण्याचं माझं स्वप्न होतं. मी पूर्णपणे कोसळलो आहे, असे अभिनेते शेखर सुमन सांगितले.
अभिनेते दिनो मौर्या यांनीही शशी कपूर यांचे वर्णन रूपेरी पडद्यावरील हँडसम व्यक्तिमत्व असेच केले. मी त्यांचा मोठा फॅन होतो आणि त्यांचे चित्रपट पाहूनच या कलासृष्टीत आलो, असेही ते म्हणाले. अर्जुन रामपाल यांनीही दु:ख व्यक्त केले. नव्वदच्या दशकात बालपणी मी किती वेळी ‘प्यार का मौसम’, ‘प्यार किये जा’ हा सिनेमा पाहिला हे मला सांगता येणार नाही, असे गायिका श्वेता पंडित म्हणाल्या.

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीवर अमिट ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर (७९) यांचे सोमवारी संध्याकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. गेली तीन आठवडे त्यांच्यावर कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही तीन मुले आहेत. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी १२ वाजता सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती रणधीर कपूर यांनी दिली.
शशी कपूर यांना फुप्फुसामध्ये जंतुसंसर्ग झाल्याचे निदान २0१४ साली झाले होते. त्याआधी त्यांची हृदय शस्त्रक्रिया झाली होती. शशी कपूर यांनी १६0 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यापैकी १२ चित्रपट इंग्रजी भाषेतील आहेत. नव्वदीच्या दशकापासून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे कमी केले होते. त्यानंतर त्यांचे फारसे चित्रपटही आले नाही.
कपूर यांच्या पत्नी जेनिफर यांचे १९८४ मध्ये कर्करोगाच्या आजाराने निधन झाल्यानंतर ते काहीसे खचले. त्यानंतर त्यांची प्रकृतीही खालावली. तेव्हापासून ते चित्रपटसृष्टीपासून दूर होते. २0११ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २0१५ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

शशी कपूर यांनी हिंदीसोबचत इंग्रजी चित्रपटांमध्येही अभिनयाचा ठसा उमटवला. इतकेच नव्हे तर निर्माते बनून त्यांनी ‘जुनून’ (१९७८), ‘कलियुग’ (१९८०), ‘३६ चौरंगी लेन’ (१९८१), ‘विजेता’ (१९८२), ‘उत्सव’ (१९८४) या नावाजलेल्या सिनेमांची निर्मिती केली. फार
कमी अभिनेते स्टार झाल्यानंतर पुन्हा नाटकाकडे वळण्याचे धारिष्ट्य दाखवतात. मात्र, पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून शशी कपूर यांनी तिथेही अमूल्य योगदान
दिले आहे.

अभिनयप्रवास
शशी कपूर यांचा जन्म १८ मार्च १९३८ रोजी कोलकाता येथे झाला. मुंबईतील मांटुग्याच्या डॉन बॉस्को शाळेत त्यांचे शिक्षण झाले. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर हे प्रख्यात अभिनेते होते. मोठे बंधू राज कपूर व शम्मी कपूर यांच्याप्रमाणेच शशी कपूर यांनी वडिलांच्या पृथ्वी थिएटरमधूनच आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांचे बालपणीचे नाव बलबीरराज असे होते. पण पुढे ते शशी या नावानेच ओळखले जाऊ लागले.हिंदी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट हिरो अशी त्यांची ओळख होती. त्या काळात ते तरुणींच्या गळ््यातील ताईत होते. पृथ्वी थिएटरच्या शकुंतला या नाटकातून ते अभिनय क्षेत्रात आले. त्यानंतर १९४५ मध्ये के.एल.सहगल आणि सुरय्या यांच्या तदबीर सिनेमात त्यांनी भूमिका साकारली. राज कपूर यांच्या आग आणि आवारा या सिनेमात त्यांनी राज कपूर यांच्या बालपणाची भूमिका साकारली.तदबीरपासून ते १९५२ च्या दानापानीपर्यंत त्यांनी बालकलाकार म्हणून ११ चित्रपटांत काम केले. त्यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेला छोटा अशोककुमार आणि छोटा राज कपूर साºयांना भावला. पुढे राज कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या श्रीमान सत्यवादी आणि दुल्हा दुल्हन या सिनेमांसाठी त्यांनी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले. शशी कपूर यांना चित्रपटात घेण्यासाठी निर्माते-दिग्दर्शकांची त्याकाळी रांग लागायची. मात्र पृथ्वी थिएटरमध्ये शेक्सपियरसारख्या भूमिका त्यांनी साकारल्या. त्यामुळे त्यांना आशयघन सिनेमा आणि भूमिकेची ओढ होती. मी अभिनेता आहे, नाचणारा डोंबारी नाही, असे ते सांगत. कथानक न आवडलेल्या चित्रपटात ते भूमिका करण्यास नकार द्यायचे.काही काळानंतर यश चोप्रा यांच्या ‘धर्मपुत्र’ सिनेमाद्वारे त्यांचा नियमित म्हणता येईल, असा बॉलिवूड प्रवास सुरू झाला. शशी कपूर यांनी अनेक रोमँटिक सिनेमात काम केले. सूरज प्रकाश दिग्दर्शित ‘जब जब फूल खिले’ या सिनेमातील नंदा आणि शशी कपूर यांच्या जोडीची चांगलीच चर्चा झाली होती. ह्यजब जब फूल खिले’ या चित्रपटाने मोठे व्यावसायिक यश मिळविले. या चित्रपटानंतर शशी कपूर यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांना या चित्रपटानंतर अनेक चित्रपटांच्या आॅफर येऊ लागल्या. त्या काळात दोन-तीन शिफ्टमध्ये काम करत.

मिजास नसलेला अभिनेता
शशी हा असा अभिनेता होता, ज्याने कधी अभिनेता असल्याची मिजास मिरविली नाही. तो नेहमी संपूर्ण युनिटला हसवायचा, खेळवायचा. त्यांचे या वयात खूपच हाल होत होते. त्यांच्याजवळ कोणीच
नव्हते. म्हणून जे झाले ते, शशीसाठी चांगलेच झाले. पण आम्हासाठी अतिशय दुख:द घटना आहे. शशी कपूर घराण्यात वजन वाढणे जणू नियमच आहे. ते वाईट आहे. आज आपल्यात ते नसले तरीही आठवणीच्या माध्यमातून
सदैव आपल्यात राहतील, असे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी सांगितले.

इंग्रजीतही ठसा
द हाऊस होल्डर, शेक्सपिअरवाला, बॉम्बे टॉकी, हिट एंड डस्ट हे त्यांचे इंग्रजी सिनेमे भारतातच नाहीतर परदेशातही गाजले. शशी कपूर यांनी जुनून, कलयुग, विजेता यांसारख्या चित्रपटांची निर्मितीही केली.
त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या मुख्य कलाकारांबरोबरच संपूर्ण टेक्निशियन टीमची फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय करत असत. कलाकार, टेक्निशियन्समध्ये भेदभाव करणे त्यांना अजिबातच आवडत नसे. या त्यांच्या स्वभावामुळे त्यांना अनेकवेळा नुकसान सहन करावे लागत असे.
जेनिफरशी यांच्याशी त्यांची १९५६ साली ओळख झाली. शशी हे पृथ्वी थिएटरमध्ये काम करत होते तर जेनिफर या वडील जॉफ्री केंडाल यांच्यासह कोलकातामध्ये नाटकाच्या ग्रुपसोबत आल्या होत्या.
ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांच्या लग्नाला कपूर कुटुंबीयांनी विरोध केला. पण शशी कपूर यांची वहिनी गीता बाली यांनी त्यांच्या लग्नाला पाठिंबा दिला आणि जुलै १९५८ मध्ये ते विवाहबद्ध झाले.
लग्नानंतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले. आपल्या नृत्यासाठी प्रसिद्ध असलेले, सतत हसतमुख असलेले शशी कपूर गेल्या अनेक वर्षांपासून व्हीलचेअरवरच होते. मोठे व्यावसायिक यश मिळवूनही ते साधेपणा जपणारे होते.

निष्ठा, बांधिलकी
वाखाणण्याजोगी - राज्यपाल
भारतीय चित्रपटसृष्टी तसेच रंगभूमीसाठी त्यांनी लक्षणीय योगदान दिले. आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांनी तीन दशकांपेक्षा अधिक काळ गाजविला. पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीप्रती आपली निष्ठा आणि बांधिलकी जपली.
- सी. विद्यासागर राव, राज्यपाल

आपल्या सशक्त अभिनयाने पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी रूपेरी पडदा गाजविला. हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. त्यांनी आपली वेगळी शैली निर्माण केली होती. भावनांचे प्रभावी सादरीकरण त्यांच्या अभिनयात होते. नाविन्य आणि उत्कटता हा त्यांच्या अभिनयाचा केवळ भाग नव्हता तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गूण होता.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

आपल्या जिवंत अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीवर वेगळा ठसा उमटविणारे अभिनेता आपण गमावला आहे. शशी कपूर यांचे नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यांपुढे येतो तो देखणा चेहरा, घरंदाज, अदबशीर आणि अगदी सज्जन व्यक्तिमत्त्व. प्रामाणिक, लाघवी, शांत, संयमी अशा विविध भूमिकेतून ते

Web Title: Indian film industry lost its 'Tara', to commemorate the funeral in Mumbai today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.