If the leopard attack can be avoided, the residents claim, | ...तर बिबट्याचा हल्ला टाळता आला असता, रहिवाशांचा दावा, नानेपाडात घातला धुमाकूळ

- मनीषा म्हात्रे

मुंबई : मुलुंड पूर्व द्रुतगती महामार्गावरून जात असताना एका कारच्या समोरून बिबट्या गेल्याची माहिती दोन दिवसांपूर्वीच वनविभागाला मिळाली होती. वनविभागाने शोधही घेतला. मात्र, हाती काहीच लागले नाही. शनिवारी तोच बिबट्या मुलुंडच्या नानेपाडा वसाहतीत शिरला आणि त्याने स्थानिकांवर हल्ला चढवत धुमाकूळ घातला. वनविभागाने वेळीच दक्षता घेतली असती तर हा हल्ला टळला असता, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
वन विभागाचे मानद वन्यजीव रक्षक सुनीश सुब्रमण्यम कुंजू यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री १२च्या सुमारास पूर्व द्रुतगती महामार्गावरील एका कारसमोरून बिबट्या गेला. येथील नवघर नाल्यात उडी घेऊन तो पळाल्याची माहिती वन विभागाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. वन अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याचा शोध घेतला. मात्र, अंधारात तो पळून गेला. शनिवारी तोच बिबट्या नानेपाडामध्ये शिरल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. बिबट्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून आल्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे.

‘आता तो मला खाणारच... देवा येते रे!’
नेहमीप्रमाणे भाजी घेऊन मी घरी आले. भाजी ठेवून चहाचा कप हाती घेतला. तोच वरच्या खोलीत राहत असलेल्या भाडोत्री सुनीता सोनावणे हिची वाघ आलारे..ची हाळी कानावर पडली. मी बाहेर येऊन पाहिले तर बिबट्या येताना दिसला. एरवी चित्रपट, मालिकांमध्ये पाहिलेला बिबट्या डोळ्यांसमोर उभा असल्याचे पाहून धडकी भरली. माझ्या समोरच त्याने सुनीता आणि सविता काटे ह्यांच्यावर हल्ला चढविला. त्यानंतर तो माझ्यासमोर आला.
आमच्या दोघांच्या नजरा एकमेकांवर खिळल्या. त्याचे चमकणारे डोळे, त्यात शिकारीचे भाव.. अशात तो आता मला खाणारच.. या विचाराने मी देवाचा पुकारा सुरू केला. ‘देवा, आता येते रे..’ म्हणत मी काहींना दरवाजा उघडायला सांगितला. तो माझ्यावर झडप घेणार त्यापूर्वीच मागे धाव घेत एकाच्या घरात शिरले. जणू शिकार हातातून सुटल्यामुळे बिबट्याने जोराची डरकाळी फोडली. मी अन्य नागरिकांना सतर्क केले आणि सर्वांनांच बिबट्याची माहिती दिली, असे भाजी विक्रेत्या शारदा कडव यांनी सांगितले.

‘त्या’ पाहुण्याने झोपच उडवली...
सकाळी इस्त्रीसाठी कपडे देऊन घरी आले. तेच कपडे आणण्यासाठी दरवाजा उघडला. तोच बिबट्या समोर. अशात काही हालचाल होण्यापूर्वी तोच दरवाजा पुन्हा बंद केला; आणि मी क्षणभर दरवाजालाच पाठ लावून उभी राहिली. भीतीमुळे मी घामाघूम झाले. पती आणि मुले मला काय झालेय, असे विचारत होते. मी मात्र प्रचंड घाबरून खिडकीकडे बघत होती. त्यांनीही खिडकीतून पाहिले आणि माझ्या भीतीचे कारण त्यांना समजले, असे प्रत्यक्षदर्शी रचना गिरीश खोत यांनी सांगितले. या दरवाजातल्या पाहुण्याने त्यांच्यासह सर्वांची झोप उडवली.

सकाळी ११ च्या सुमारास बिबट्याने मातृछाया इमारतीत प्रवेश केला. बिबट्याच्या डरकाळीने तळमजल्यावरील गणेश पुजारी यांनी दरवाजा उघडला. तीच संधी साधत दरवाजाबाहेर उभ्या असलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. पुजारींनी कसेबसे मुलाला बाहेर काढत स्वत:ही पळ काढला. शेजारच्या तरुणाने बाहेरून दरवाजाला कडी लावली आणि बिबट्या घरात अडकला. अखेर वनविभागाने मोठ्या शिताफीने त्याला पकडले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह वनविभागाचे कर्मचारी तेथे आले. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने सापळा रचला. पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी बाराच्या सुमारास इंजेक्शन देऊन बिबट्याला बेशुद्ध करण्यास वनविभागाच्या कर्मचाºयांना यश आले आणि ७ तासांचा थरार संपला.

नवºयावर केला हल्ला!
सकाळी ७च्या सुमारास पती सुरेश बासुटकर शौचासाठी घराशेजारीच शौचालय आहे. मी स्वयंपाकघरात होते. बिबट्याची डरकाळी कानी पडली. मी दरवाजा उघडला. बाहेर डोकावते तर बिबट्या जाताना दिसला. क्षणभर मी त्यालाच पाहात होते. ‘‘अरे मम्मी... पप्पा बाहेर गेलेत ना?’’ असे मुलांनी विचारताच मी भानावर आले आणि शौचालयाकडे धाव घेतली. बिबट्याने माझ्या नवºयावर हल्ला केल्याचे समजले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे जखमी बासुटकर यांच्या पत्नी कविता यांनी सांगितले.

‘वाघ’च तर आलाय..!
काहींनी त्यांच्या मित्रांना फोन फिरवला. आमच्याकडे वाघ आलाय, असे सांगितले. मात्र समोरच्या व्यक्तीला वाघ आडनावाचा मित्र आल्याचे आणि मित्र आपली गंमत करत असल्याचे वाटले. ‘वाघच तर आलाय ना! असे म्हणत त्याने फोन ठेवला. त्यानंतर नानेपाडात खरोखरचा वाघ आल्याचे वृत्तवाहिनींवरून समजताच ही गंमत नसल्याचे लक्षात आले.

बिबट्या बनला सोमय्यांचा सेल्फी पॉइंट
नानेपाडामध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्यांसोबत भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी घेतलेले सेल्फीही बिबट्याइतकेच चर्चेत आले. त्यांनी हे सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केले; आणि नेटिझन्सकडून टीकेचा सूर उमटला. सोमय्या यांनी जखमींबरोबर सेल्फी काढून आपल्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडवल्याचे नेटकºयांनी म्हटले. तर दुसरीकडे खासदारांनी बिबट्याऐवजी ‘वाघ’ आल्याचे सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यामुळे ‘साहेबांना येथेही वाघ दिसतोय..’ असे म्हणत नेटिझन्सनी त्यांची खिल्ली उडविली.

पालक सभेमुळे
पत्नी वाचली...
नानेपाडा येथील मातृछाया इमारतीत गणेश पुजारी हे पत्नी सुजाता, मुलगी अनुष्का (१२), मुलगा अमित यांच्यासोबत राहतात. त्यांचा इलेक्ट्रिकल वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे. पुजारी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, मुलीला शाळेत सोडण्यासाठी पत्नी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडली. मुलाला सुटी असल्याने आम्ही दोघेच घरी होतो. मी गाढ झोपेत असताना, ‘‘बाबा उठा!’’ म्हणून मुलाने आवाज दिला. बाहेर काही गडबड सुरू असल्याचे त्याने सांगितले. अशात बिबट्याची डरकाळी कानावर पडली. काही समजण्याच्या आत मी दरवाजा उघडला. जणू माझीच वाट पाहत उभा असलेल्या बिबट्याने माझ्यावर झडप घातली. मी ती चुकवली आणि मुलासह बाहेर पळ काढला. हीच संधी साधत कोणीतरी दरवाजाला बाहेरून कडी लावली; आणि बिबट्या घरात जेरबंद झाला. मुलीच्या शाळेत नेमके पालक सभेसाठी पत्नीला थांबवून घेतले होते. जर ती घरी आली असती तर बिबट्याची शिकार ठरली असती, असे पुजारी म्हणाले.

त्याचा चेहरा डोळ्यांसमोरच...
दूध आणण्यासाठी घराबाहेर पडले. थोडी पुढे जाणार तोच समोर बिबट्या. त्याला पाहून माझी बोबडीच वळली. मी पळत पुढे गेले. मात्र त्याने माझ्या हातावर चावा घेतला. अजूनही त्याचा चेहरा नजरेसमोरून जात नसल्याचे क्रिसम्मा पल्ले यांनी सांगितले.

जखमींची प्रकृती स्थिर
सुरेश बासुटकर (५०), गणेश पुजारी (५०), सविता कुटे (३०), सुनीता सोनावणे (३५), बालाजी कामिटे (४३), क्रिसम्मा हनुमंता पल्ले (४०) अशी जखमींची नावे असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे.


Web Title: If the leopard attack can be avoided, the residents claim,
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.