अपयशी ठरलो असतो, तर निवृत्ती घेतली असती - यतिंदर सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 07:13 AM2017-11-30T07:13:27+5:302017-11-30T07:13:43+5:30

‘प्रत्येक स्पर्धेसाठी मेहनतीमध्ये मी कोणतीही कसर ठेवत नाही. पण एक मात्र नक्की की, जर मी या स्पर्धेत जेतेपद पटकावले नसते, तर निवृत्त होऊन यापुढे कोणत्याही स्पर्धेत न खेळण्याचे ठरविले होते,’

 If I had failed, I would have retired - Yatinar Singh | अपयशी ठरलो असतो, तर निवृत्ती घेतली असती - यतिंदर सिंग

अपयशी ठरलो असतो, तर निवृत्ती घेतली असती - यतिंदर सिंग

Next

- रोहित नाईक
मुंबई : ‘प्रत्येक स्पर्धेसाठी मेहनतीमध्ये मी कोणतीही कसर ठेवत नाही. पण एक मात्र नक्की की, जर मी या स्पर्धेत जेतेपद पटकावले नसते, तर निवृत्त होऊन यापुढे कोणत्याही स्पर्धेत न खेळण्याचे ठरविले होते,’ अशी भावनिक प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचा शरीरसौष्ठवपटू यतिंदर सिंग याने ‘लोकमत’ला दिली. मंगळवारी रात्री प्रतिष्ठेची तळवलकर्स क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकल्यानंतर यतिंदर ‘लोकमत’शी बोलत होता.
माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये झालेल्या या दिमाखदार स्पर्धेत यतिंदरने सलग दोन वेळा ‘भारत श्री’ ठरलेल्या महाराष्ट्राच्या सुनित जाधवचे तगडे आव्हान परतावत बाजी मारली. प्रेक्षकांचा सर्वाधिक पाठिंबा ‘लोकल बॉय’ सुनितला मिळाला खरा, पण त्याचे कोणतेही दडपण न घेता यतिंदरने अप्रतिम शरीरयष्टीचे प्रदर्शन करत जेतेपदाला गवसणी घातली. इंडियन बॉडीबिल्डर फेडरेशनच्या (आयबीबीएफ) मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत देशभरातील अव्वल ३० शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते. यतिंदरने जेतेपदासह ६ लाख रुपयांच्या रोख पारितोषिकावर कब्जाही केला, तर उपविजेत्या सुनितला ३ लाख रुपयांवर समाधान मानावे लागले.
जेतेपद पटकावल्यानंतर यतिंदर म्हणाला, ‘या स्पर्धेसाठी मी खूप गोष्टींचा त्याग केला आहे. मला कोणत्याही परिस्थितीत बाजी मारायची होती. गेल्या वर्षी याच स्पर्धेत मी उपविजेता ठरलो होतो आणि ती कसर मला भरून काढायची होती. त्यामुळेच, मी जर अपयशी ठरलो असतो, तर पुन्हा कधी स्पर्धा खेळायची नाही असे ठरविले होते. मी माझ्या ज्युनिअर खेळाडूंना प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी जागा रिक्त केली असती. पण हा दिवस माझा होता.’
संभाव्य विजेत्या सुनितला प्रेक्षकांचा खूप मोठा पाठिंबा लाभला होता. याचे दडपण होते का, असे विचारले असता यतिंदर म्हणाला, ‘सुनितसाठी हे घरचे मैदान असल्याने साहजिकच त्याला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळणार. प्रेक्षक नेहमीच आपल्या आवडत्या खेळाडूला पाठिंबा देतात, पण असे असले तरी यापुढे ते माझ्यावरही प्रेम करतील.’
तसेच, ‘गेल्याच आठवड्यात मी उत्तर भारत अजिंक्यपद पटकावले आणि त्यानंतर तळवलकर्स क्लासिक स्पर्धा जिंकली. त्यामुळे यंदाच्या मोसमाची माझ्यासाठी खूप चांगली सुरुवात झाली. हेच सातत्य मला आगामी १५ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या सतीश सुगर क्लासिक स्पर्धेत कायम ठेवायचे आहे,’ असेही यतिंदरने या वेळी म्हटले.

महाराष्ट्राचा दबदबा
एकूण ३० खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची अंतिम फेरी १० खेळाडूंमध्ये रंगली. यामध्ये महाराष्ट्राच्या ६ खेळाडूंनी स्थान मिळवत स्पर्धेवर आपला दबदबा राखला. यासह भारतीय रेल्वेचे २, तर उत्तर प्रदेश आणि सेनादलाचा प्रत्येकी एक खेळाडू अंतिम फेरीत होता.

स्पर्धेतील
अव्वल १० खेळाडू :
१. यतिंदर सिंग (उत्तर प्रदेश),
२. सुनीत जाधव (महाराष्ट्र),
३. बॉबी सिंग (भारतीय रेल्वे),
४. सागर कातुर्डे (महाराष्ट्र),
५. महेंद्र चव्हाण (महाराष्ट्र),
६. सर्बो सिंग (भारतीय रेल्वे),
७. अक्षय मोगरकर (महाराष्ट्र),
८. रोहित शेट्टी (महाराष्ट्र),
९. दयानंद सिंग (सेनादल),
१०. झुबेर शेख (महाराष्ट्र).
 

Web Title:  If I had failed, I would have retired - Yatinar Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई