सुशांत माळवदेवर झालेला हल्ला मी कधीच विसरणार नाही, राज ठाकरेंचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 08:47 PM2017-11-04T20:47:53+5:302017-11-04T21:42:44+5:30

सुशांत माळवदेवर झालेला हल्ला मी कधीच विसरणार नाही. म्हणून रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. प्रत्येक गोष्ट बोलून व्यक्त करायची नसते. चहा थंड करुन प्यायला तरी तो चहाच असतो. सर्वांनी सतर्क रहा', असं आवाहन करत राज ठाकरेंनी सूचक इशारा दिला आहे.

I will never forget the attack on Sushant Malwade says Raj Thackeray | सुशांत माळवदेवर झालेला हल्ला मी कधीच विसरणार नाही, राज ठाकरेंचा सूचक इशारा

सुशांत माळवदेवर झालेला हल्ला मी कधीच विसरणार नाही, राज ठाकरेंचा सूचक इशारा

googlenewsNext

मुंबई - 'सुशांत माळवदेवर झालेला हल्ला मी कधीच विसरणार नाही. म्हणून रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. प्रत्येक गोष्ट बोलून व्यक्त करायची नसते. चहा थंड करुन प्यायला तरी तो चहाच असतो. सर्वांनी सतर्क रहा', असं आवाहन करत राज ठाकरेंनी सूचक इशारा दिला आहे. रंगशारदा सभागृहात पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी फेरीवाल्यांची बाजू घेतल्याबद्दल अभिनेते नाना पाटेकरांचाही समाचार घेतला.

नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बद करावा अशी सणसणीत टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नव्हती, तेव्हा नाना पाटेकर बोलल्याचं आठवत नाही असा टोला यावेळी राज ठाकरे यांनी लगावला आहे. 'महात्मा नाना पाटेकर आज काहीतरी बोललेत ? नाना पाटेकर बोलताना 80 वर्षाच्या आजोबांचा एक टोन असतो', अशी टीका करताना राज ठाकरेंनी नाना पाटेकरांची नक्कलही करुन दाखवली. 'वेलकममध्ये भाजा विकत होता ना, त्यामुळे फेरीवाल्यांचा पुळका आहे', अशी उपहासात्मक टीका राज ठाकरे यांनी केली.

'नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बद करावं. नाना पाटेकर मराठीतला उत्तम कलावंत आहे, तुमचे चित्रपट बघू...पण नको त्या गोष्टीत पडू नका', असं राज ठाकरे बोलले आहेत. 

यावेळी राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांना नाम संस्था सुरु करण्यावरुन प्रश्न विचारले. 'महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्नही सरकारने सोडवायचा आहे, मग कशाला संस्था काढली. संस्था काढण्यापेक्षा सरकारकडे जायला पाहिजे होतं. जिथे सरकारला जमत नाही, तिथे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला ना मग आम्हाला शिकवायचं नाही', असं राज ठाकरे बोलले आहेत. 

आम्ही तुझं अभिनंदन केलं पाहिजे तिथे संजय निरुपम कौतुक करतो असं सांगत राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. यावेळी राज ठाकरेंनी दाक्षिणात्य नेते आणि अभिनेत्यांचं पुन्हा एकदा उदाहरण दिलं. पहा ते कसे एकत्र येतात. तुम्हाला यायचं नाही तर येऊ नका, पण चोमडेपणा कशाला करता. महाराष्ट्रात आमचंच कुंपण शेत खातय असा टोला राज ठाकरेंनी लगावला. 

भाषणाची सुरुवात करतानाच राज ठाकरे यांनी आंदोलनात ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, ज्यांच्यावर केसेस पडल्या, त्या सर्वांचं अभिनंदन केलं. मराठी माणसांसाठी आम्ही कितीही केसेस घेऊ असं राज ठाकरेंनी सांगितलं. पोलिसांनी आमचं संरक्षण करायचं, तर आमची मुलं जाऊन पोलिसांचं संरक्षण करत आहेत. आम्ही नेहमी पोलिसांची बाजू घेतली आहे, आणि घेत राहू. पण त्यांनीही कधीतरी आम्हाला डोळा मारावा असं सांगत राज ठाकरेंनी पोलिसांनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. 

फेरीवाल्यांच्या मुद्यावर बोलताना बसण्याचा पहिला अधिकार मराठी माणसाचा आहे. बाहेर आलेल्यांचा पुळका कशासाठी ? असा सवाल विचारला. 'फेरीवाला जर गरिब असेल तर रोज रेल्वेने प्रवास करणारे 60-70 लाख लोक गरिब नाहीत का ? तो देखील पैसे कमावतो. फेरीवाल्याप्रमाणे आमचा नोकरी करणारा माणूस 100 रुपये हफ्ता देऊ शकतो का ? असे सवाल राज ठाकरेंनी विचारले. 

आम्ही पहिलं सरकारला सांगितलं, महापालिका आयुक्तांना सांगितलं....पण कारवाई होत नसेल तर आमचा हात उठणारच आहे असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. 'आमचा गिरणी कामगार घरासाठी झगडत राहणार आणि बाहेरुन येणा-यांचा झोपडपट्ट्यांना एक कोटी रुपये देणार आणि घरही देणार. प्रत्येक राज्य आपल्या लोकांसाठी काम करत असतं, पण आपल्याकडे सगळ्यांचे हात दगडाखाली आहेत. आम्ही जेव्हा जाब विचारतो तेव्हा आम्हाला तुम्ही शिव्या घालता', असं राज ठाकरे बोलले आहेत. 

यावेळी राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांसंबंधी दिलेल्या निर्णयावरुन उच्च न्यायालयाचं अभिनंदन केलं. त्यांनी पदाधिका-यांना आवाहन केलं आहे की, माझं पत्र आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत घेऊन प्रत्येक पोलीस स्टेशन, वॉर्ड ऑफिसर आणि रेल्वे मास्तरकडे द्यायचं. परत तर तिथे फेरीवाले बसले तर या अधिका-यांवर न्यायालयाचा अवमान केल्याची केस टाकणार. 

'महाराष्ट्रासाठी जागता पहारा देणं आमचं काम आहे. आज हात जोडून बोलतोय, हात सोडायला लावू नये', असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. अनधिकृत बसणा-या फेरीवाल्यांकडून भाजी घेणं बंद करा असं आवाहनही राज ठाकरेंनी लोकांना केलं आहे. 

राज ठाकरेंनी यावेळी परप्रांतीयांचा मुद्दाही उपस्थित केला.  'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनेही शहरात लोंढे वाढल्याचं मान्य केलं आहे. महाराष्ट्रात यूपी-बिहारकडून दिवसाला 48 ट्रेन येतात, भरुन येतात आणि रिकाम्या जातात.  कोण कुठून येतं, कुठे राहतं माहिती नाही, बॉम्बस्फोटसारख्या घटना झाल्यावर चार दिवसांसाठी जाग येते. टॅक्सी अधिकृत आहे की अनधिकृत आहे  हेदेखील लोकांना माहित नाही. मराठी अधिकारी जे विष पोसत आहेत ते भविष्यासाठी घातक आहे', असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलतात बाहेरुन येणाऱ्याला कानडी शिकावीच लागेल, आपल्या मुख्यमंत्र्यांची हिंमत आहे का? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी विचारला. 

Web Title: I will never forget the attack on Sushant Malwade says Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.