मुंबापुरीत पर्यावरणपूरक होळी साजरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 04:51 AM2019-03-22T04:51:23+5:302019-03-22T04:51:44+5:30

रंग बरसे, भिगे चुनरवाली रंग बरसे..., बलम पिचकारी जो तुने मुझे मारी..., आली होळीच्या दिसाला दुपाराला, कुठं निघाली तू आज बाजाराला... अशा हिंदी-मराठी गाण्यांच्या तालावर तरुणाईने गुरुवारी ठेका धरला.

 Holi celebrates eulogy Holi! | मुंबापुरीत पर्यावरणपूरक होळी साजरी!

मुंबापुरीत पर्यावरणपूरक होळी साजरी!

googlenewsNext

मुंबई : रंग बरसे, भिगे चुनरवाली रंग बरसे..., बलम पिचकारी जो तुने मुझे मारी..., आली होळीच्या दिसाला दुपाराला, कुठं निघाली तू आज बाजाराला... अशा हिंदी-मराठी गाण्यांच्या तालावर तरुणाईने गुरुवारी ठेका धरला. होळीला रंगांमध्ये न्हाऊन निघालेल्या तरुणाईला सेल्फी घेण्याचा मोहही आवरता आलेला नाही. मुंबईतील वेसावे कोळीवाडा, वरळी, साकीनाका, घाटकोपर येथील होळ्या सर्वाधिक आकर्षणाच्या केंद्रस्थानी होत्या. तसेच काही ठिकाणी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली.

वेसावे कोळीवाड्यातील कोळी महिलांची बुधवारी रात्री साडेनऊ वाजता निघालेली हावलीची मडकी मिरवणूक नेत्रदीपक ठरली. सुमारे ६०० कोळी महिलांनी पारंपरिक वेषात डोक्यावर रंगीत मडकी घेऊन आणि अटकेपार लोकप्रिय असलेल्या वेसावकरांच्या कोळी गीतांच्या तालावर आणि येथील बँड पथकाच्या निनादात या मडकी मिरवणुकीत उत्साहात सहभाग घेतला होता. वेसावकरांनी आणि येथील परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. परदेशी पाहुणे आणि येथील हावलीचे दृश्य आपल्या कॅमेरात बंदिस्त करण्यासाठी अनेक छायाचित्रकारांनी येथे आवर्जून भेट दिली, तर सेल्फी काढण्यासाठी तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. येथील मडकी मिरवणुकीची एक आगळीवेगळी पुरातन परंपरा आहे, अशी माहिती बाजार गल्ली कोळी जमात संस्थेचे अध्यक्ष पराग भावे यांनी दिली.

अ‍ॅण्टॉप हिल येथील मेहफिल-ए-जहांगिरिया येथे सज्जादा नसीन डॉ. सूफी फैजुल हसन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू बांधवांना होळीच्या शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कव्वालीचा विशेष सूफी संगीतमय कार्यक्रमदेखील संपन्न झाला. कार्यक्रमात अनेक नामांकित सूफी गायकांनी सहभाग घेतला. अल्लाह आणि राम तसेच होळी यांची सांगड घालणाऱ्या काव्यरचनांमुळे प्रेक्षक भारावून गेले.

एक वेगळेच चैतन्य आणि आनंद यानिमित्ताने उपस्थितांनी अनुभवला. दरम्यान, आग्रीपाडा येथील एस.ई.सी.डी. स्कूलमध्ये मंगळवारी पर्यावरणपूरक होळीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दिव्यांग मुलांसह येथील शिक्षकांनी एकत्र येत पर्यावरणपूरक रंगाचा वापर करून रंगोत्सव साजरा केला.

धुळवडीला कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़ त्यामुळे मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही़ तसेच चौपाट्यांवरही पोलिसांची करडी नजर होती़ बंदोबस्तासाठी पोलिसांची अधिक कुमक होती़

होळीला नमन करत व्यसनांचे केले दहन


मुंबई : तंबाखूजन्य पदार्थांच्या राक्षसाच्या प्रतीकृतीचे दहन करत नशाबंदी मंडळाने होळी सण साजरा केला. या वेळी ‘करून होलिकेला नमन, करू या व्यसनांचे दहन’ अशा घोषणा देत बुधवारी दुपारी ३.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाबाहेर नशाबंदी मंडळाने जनजागृतीचे काम केले.
या जनजागृती कार्यक्रमात दारू, गुटखा, सिगारेट, गांजा, अफू, गर्द, ड्रग्ज, चरस यांसारख्या अमलीपदार्थांचा समावेश असलेल्या आठ फुटी राक्षसाचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. अशा प्रकारे समाजातील व्यसनांचा समूळ नाश होईल व निर्व्यसनी मुंबई व राज्याचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी व्यक्त केला.
ठुमकेदार भारुडाने उपस्थित जनसमुदायांत प्रबोधन घडवत आयुष्यावर व्यसनांचा किती घातक परिणाम होतो? व त्यापासून परावृत्त राहून आनंदी जीवन जगण्याचा अनमोल सल्ला या वेळी देण्यात आला.
व्यसन हा मानसिक, शारीरिक व कौटुंबिक आजार असल्याचे मत वर्षा विद्या विलास यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. एखाद्या माणसाला कोणते व्यसन आहे? व ते किती आहे? यावर त्याचे उपचार अवलंबून असतात.

Web Title:  Holi celebrates eulogy Holi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.