मुंबई : राज्यातील विविध गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने ‘जागर दुर्ग इतिहासाचा’ उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील विविध गडकिल्ले आणि दुर्ग संवर्धन मोहिमांचे नियोजन करण्यात आले असून, दुर्गप्रेमींसाठी ही एक मेजवानी असणार आहे.
प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी सांगितले की, अपुºया माहितीमुळे बहुतेक गड-किल्ल्यांवर फिरताना पर्यटक आणि शिवभक्तांना इतिहासापासून वंचित राहावे लागते. दिशादर्शक आणि स्थळदर्शक फलक नसल्याने पर्यटकांना गडावर फिरताना अनेक अडचणी येतात. म्हणूनच राज्य व केंद्र पुरातत्त्व विभाग आणि वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने सर्व मोहिमा पार पडणार आहेत. या वेळी ‘मिशन १०० : जागर दुर्ग इतिहासाचा’ या उपक्रमा अंतर्गत बहुतेक किल्ल्यांवर त्या किल्ल्याचा इतिहास सांगणारा माहिती फलक, सूचना फलक, स्थळदर्शक व दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहे. जेणेकरून पर्यटकांना आणि दुर्गप्रेमींना किल्ल्यांच्या इतिहासाची माहिती मिळेल व गडावर फिरणे सोयीचे होईल. अनेक वन दुर्गांवर जाणाºया वाटा या फसव्या झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटक दिशा भटकतात. अशा ठिकाणी दिशादर्शक अत्यंत आवश्यक असून, सूचना फलकही तेवढेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या मदतीसाठी हे फलक लावताना मद्याच्या पार्ट्या आणि अश्लील चाळे करणाºयांवर बंधन यावे व कारवाई व्हावी म्हणूनही प्रतिष्ठान काम करणार आहे. या वेळी गड-किल्ले प्लास्टीकमुक्त करण्याची मोहीमही राबवण्यात येईल.

१२ नोव्हेंबर रोजी चंद्रपूरच्या भिवापूर येथील ऐतिहासिक ‘रावणमूर्ती स्थळ’ स्वच्छता मोहीम, पुण्यातील मावळ विभागातील तुंग किल्ल्याचे संवर्धन आणि चाळीसगाव येथील मल्हारगडाची स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल. तर १९ नोव्हेंबर रोजी पुण्यातील मावळ विभागातील तुंग किल्ल्याचे संवर्धन केले जाईल. १८ व १९ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर महानगरपालिकेसोबत मिळून महानगरपालिका शाळांमध्ये ‘किल्ले बनवण्याची स्पर्धा’ घेतली जाईल. तर २६ नोव्हेंबर रोजी पुन्हा तुंग किल्ल्यावर संवर्धन मोहीम राबवली जाईल.