तरुणांत वाढतोय उच्च रक्तदाबाचा धोका; उशिराने निदान होत असल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 01:42 AM2019-05-17T01:42:02+5:302019-05-17T01:42:18+5:30

गेल्या वर्षी २०१७-१८ मध्ये राज्यभरात ७४ लाख ७७ हजार १०१ रुग्णांची तपासणी करण्यात आली, त्यातील २ लाख ६ हजार ९४५ रुग्णांना उच्च रक्तदाब असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याचे समजते.

 High blood pressure risks; Obviously, diagnosis is done | तरुणांत वाढतोय उच्च रक्तदाबाचा धोका; उशिराने निदान होत असल्याचे उघड

तरुणांत वाढतोय उच्च रक्तदाबाचा धोका; उशिराने निदान होत असल्याचे उघड

मुंबई : बदलती जीवनशैली, वाढता ताण आणि आहार यांमुळे विविध आजार डोके वर काढत आहेत. परिणामी, जागतिक उच्च रक्तदाब दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज्यात आता तरुण पिढीमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका वाढत असल्याचे समोर आले आहे. मात्र बऱ्याचदा या आजाराविषयी लवकर निदान होत नसल्याचेही समोर आले आहे.
गेल्या वर्षी २०१७-१८ मध्ये राज्यभरात ७४ लाख ७७ हजार १०१ रुग्णांची तपासणी करण्यात आली, त्यातील २ लाख ६ हजार ९४५ रुग्णांना उच्च रक्तदाब असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याचे समजते.
केंद्र शासनाच्या नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेंन्शन अ‍ॅण्ड कंट्रोल आॅफ कॅन्सर, डायबेटीस, सीव्हीडी अ‍ॅण्ड स्ट्रोक यांच्या संस्थेच्या माध्यमातून हे निरीक्षण समोर आले आहे. गेल्या वर्षी संस्थेच्या माध्यमातून ही तपासणी राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आली होती, आता मात्र ती ३४ जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. या अहवालानुसार, तरुण पिढीमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे, ही चिंताजनक स्थिती असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. धावपळीची जीवनशैली, कामाचे वाढलेले तास, धूम्रपानाच्या जोडीला मद्यपान आणि आरोग्याला अपायकारक ठरणाºया खाण्याच्या सवयींमुळे अनेक तरुण-तरुणी उच्च रक्तदाबाच्या समस्येला बळी पडतात. हा आजार अन्य गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे या आजाराची वेळीच माहिती करून घेणे आणि तणावमुक्त स्वस्थ जीवनमान आत्मसात करणे अत्यावश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.
रक्तदाब जितका अधिक तितकीच हृदयविकाराचा झटका किंवा हृदय बंद पडण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक असते. तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका वाढत आहे, अशी माहिती हृदयविकारतज्ज्ञ डॉ. महेश घोगरे यांनी दिली.
छातीत धडधड होणे, सततची डोकेदुखी, डोळ्यांपुढे अंधारी येणे, हातापायाला बधिरता येणे व चक्कर येणे ही उच्च रक्तदाबाची लक्षणे आहेत. परंतु पुष्कळ व्यक्तींमध्ये या आजाराने गंभीर स्वरूप धारण करेपर्यंत कोणतेही लक्षण दिसून येत नाही व लक्षात येते तेव्हा मूत्रपिंड, डोळे व हृदय या नाजूक इंद्रियांवर कायमस्वरूपी दुष्परिणाम झालेले असतात. ते मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकतात.
उच्च रक्तदाबामुळे हृदयावर अधिक ताण येतो आणि अपेक्षित असलेल्या कार्यापेक्षा अधिक कार्य हृदयाला करावे लागते. त्यामुळे हृदयाचा आकार मोठा आणि लहान होण्याची कृती घडत असते. उच्च रक्तदाबामुळे हृदयाला पंप करण्यासाठी अधिक श्रम करावे लागतात. याचा थेट परिणाम हृदयाचे कार्य बंद पडण्यात होतो, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.

कारणे : निष्क्रियता, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, सिगारेट, तंबाखू, दारूचे व्यसन, अति मानसिक ताण, आहारात मिठाचे प्रमाण अधिक, आनुवंशिक कारणे, जसे मधुमेह, थॉयराईड, मूत्रपिंडाचे विकार.

लक्षणे : अंधुक दिसणे, वारंवार चिडचिड होणे, थकवा जाणवणे, चक्कर येणे, नाकातून रक्त येणे, धाप लागणे, छातीत कळ येणे, वारंवार डोके दुखणे, डोके जड होणे.

दुष्परिणाम : अंधत्व येणे, मूत्रपिंड निकामी होणे, मेंदूमध्ये रक्तस्राव होणे, अर्धांगवायू (लकवा), हृदयविकाराचा झटका.

उपाय : नियमित व्यायाम, ताण-तणाव टाळावे, मिठाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे, जीवनशैलीत बदल करणे, सिगारेट, तंबाखू, मद्यपान न करणे, नियमित वैद्यकीय सल्ला घेणे, नियमित ब्लड प्रेशर तपासणे, पुरेशी झोप घेणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे.

Web Title:  High blood pressure risks; Obviously, diagnosis is done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य