मुंबईतील रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा, सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 07:44 AM2019-02-22T07:44:57+5:302019-02-22T10:08:24+5:30

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतल्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

High alert on railway stations in Mumbai, alert to security forces | मुंबईतील रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा, सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा, सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश

Next

मुंबई- पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतल्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. मुंबईतल्या सर्व रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईच्या लाइफलाइनवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. दहशतवादी मुंबईतल्या रेल्वे स्थानकांना लक्ष्य करू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्यामुळे पोलिसांनीही मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला आहे. सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यासह संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, असे आदेश रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी पुढच्या तीन महिन्यांत मुंबई रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. मुंबई रेल्वे स्थानकांनाही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
तत्पूर्वी मुंबईजवळच्याच कर्जत-आपटा एसटीमध्ये बॉम्ब सापडला होता. बुधवारी रात्री आपटा एसटी डेपोत आली असता, कंडक्टरला बसमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली. ही वस्तू आयईडी बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री हा बॉम्ब निकामी केला. या घटनेनंतर रायगड जिल्ह्यात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला असून, लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कर्जतहून आलेली एसटी क्रमांक एम एच 14, बीटी 1596 आपटा बस डेपोमध्ये थांबली असताना कंडक्टरला पिशवीत बॉम्बसदृश्य वस्तू दिसली. त्याने माहिती देताच रसायनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बॉम्बशोधक पथकाला या घटनेची माहिती दिली. बॉम्ब सापडल्यामुळे आणि येथील वातावरणामुळे नागरिक दिवसभर भीतीच्या सावटाखाली वावरत असल्याचे दिसून आले. मात्र, तरीही एसटी डेपोभोवती असलेला पोलीस बंदोबस्त आणि इतर काय हालचाली सुरू आहेत हे पाहण्याची उत्सुकता नागरिकांना होती. यामुळे दिवसभर येथे गर्दी असलेली पाहावयास मिळाली. तसेच गुरु वारी एकही बस बंदोबस्तामुळे डेपोत न जाता डेपो बाहेरूनच प्रवासी घेऊन जात होती. ज्या कर्जत-आपटा एसटीमध्ये बॉम्ब सापडला ती बस दिवसभर पोलीस संरक्षणात ठेवण्यात आली होती.

जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी आपटा बस डेपो परिसरात गुरु वारी ६ वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यानंतर आपटा बस डेपोतील प्रवेशबंदी व पोलीस बंदोबस्त हटविण्यात आला. कोणत्याही अज्ञात वस्तूला हात न लावता त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. दरम्यान, बुधवारी एसटीमध्ये सापडलेला बॉम्ब निकामी करताना आपटा गावातील वीजपुरवठा 2.45 ते 3.15 या कालावधीत खंडित करण्यात आला होता. या वेळी छोटा स्फोट झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

Web Title: High alert on railway stations in Mumbai, alert to security forces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :localलोकल