हेरिटेज वास्तूंना मेट्रोच्या कामाची धास्ती; खोदकामामुळे बसत आहेत ऐतिहासिक वास्तूंना हादरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 06:19 AM2017-12-17T06:19:20+5:302017-12-17T06:19:42+5:30

दक्षिण मुंबईत अनेक हेरिटेज वास्तू आहेत. या वास्तुंना कुलाबा-वांद्रे-सीप्झ (मेट्रो ३) या भुयारी मेट्रोच्या कामांचा त्रास होत आहे. भुयारी मार्गासाठीचे खोदकाम दक्षिण मुंंबईत जलद गतीने चालू आहे. या खोदकामासाठी अत्याधुनिक यंत्रे वापरली जात आहेत.

Heritage buildings scared for Metro work; Dugs are being constructed due to historical buildings | हेरिटेज वास्तूंना मेट्रोच्या कामाची धास्ती; खोदकामामुळे बसत आहेत ऐतिहासिक वास्तूंना हादरे

हेरिटेज वास्तूंना मेट्रोच्या कामाची धास्ती; खोदकामामुळे बसत आहेत ऐतिहासिक वास्तूंना हादरे

googlenewsNext

- अक्षय चोरगे

मुंबई : दक्षिण मुंबईत अनेक हेरिटेज वास्तू आहेत. या वास्तुंना कुलाबा-वांद्रे-सीप्झ (मेट्रो ३) या भुयारी मेट्रोच्या कामांचा त्रास होत आहे. भुयारी मार्गासाठीचे खोदकाम दक्षिण मुंंबईत जलद गतीने चालू आहे. या खोदकामासाठी अत्याधुनिक यंत्रे वापरली जात आहेत. खोदकामामुळे आसपासच्या इमारती, घरे आणि ऐतिहासिक वास्तूंना हादरे बसत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने फ्लोरा फाउंटन, भिखा बहराम विहीर, वाडिया अताश बहराम (पारसी अग्यारी ), जे. एन. पेटीट लायब्ररी या वास्तुंचा समावेश आहे.
मुंबईतील येथील हेरिटेज वास्तू शंभर वर्षांहूनही जुन्या आहेत. मुंबईतील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी असल्यामुळे देशासह जगभरातून येणारे पर्यटक मुंबईत आल्यावर या स्थळांना आवर्जून भेटी देतात. प्रशासनाने हा ऐतिहासिक वारसा जपायला हवा. त्याउलट विकासाच्या नावाखाली या वारसा स्थळांचे नुकसान होत आहे, तसेच आसपासच्या रहिवासी इमारतींनाही खोदकामामुळे हादरे बसत असून, इमारतींमध्ये राहणारे लोक दहशतीखाली वावरत आहेत, म्हणत ११९ वर्षे जुन्या जे. एन. पेटीट लायब्ररीच्या संचालक मंडळाने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने काही काळासाठी मेट्रोच्या कामास स्थगिती दिली. त्यानंतर, तीन मुंबई आयआयटीमधील प्राध्यापकांसह तीन तज्ज्ञांची समिती तयार करून, त्यांना मेट्रोच्या कामावर आणि आसपासच्या परिसरावर लक्ष ठेवण्याचे आणि तेथील समस्यांनुसार मेट्रोला निर्देश देण्याचे सुचविले होते. त्या निर्देशानुसारचे मेट्रोचे सध्याचे काम सुरू आहे.
मेट्रोकडून प्रतिक्रिया मिळालीच नाही...
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या जनसंपर्क अधिकारी वर्गाशी या प्रकरणी ‘लोकमत’ प्रतिनिधीने दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी वारंवार संपर्क साधला. मात्र कॉर्पोरेशनच्या जनसंपर्क अधिकारी वर्गाकडून या प्रकरणी काहीच प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

या समितीने महत्त्वाच्या शिफारशी न्यायालयाकडे केल्या. या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन एमएमआरसीने न्यायालयाला दिले. जनहितासाठी मेट्रो ३ हा प्रकल्प अत्यावश्यक असल्याचे म्हणत, न्यायालयाने काहीच दिवसांपूर्वी स्थगिती हटविली. मात्र, या तज्ज्ञांच्या समितीला खोदकामांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

- या मार्गाच्या बांधकामाची उंची, गर्डर याबाबत मी आॅनलाईन तक्रार निवारण विभागाकडे तक्रार केली आहे. त्याबाबतही मला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या तक्रारीची दखल घेण्यात यावी, असे पत्र गृहनिर्माण आणि शहर विभागाचे सचिव अंबुज बाजपाई यांनी एमएमआरडीएला पाठवल्याचे जोशी यांनी सांगितले.
- याबाबतच एमएमआरडीएच्या संबंधित अधिकाºयांशी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

मेट्रो ३च्या भुयाराच्या कामासाठी एमएमआरसीने तज्ज्ञ अभियंत्यांची निवड केली आहे. त्यामुळे अशा तज्ज्ञ अभियंत्यांनी भुयारी मार्गाचा जवळच्या हेरिटेज वास्तुंवर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी माझी भूमिका आहे आणि त्या संदर्भात अभियंत्यांनी काळजी घेतलीच असेल, तसेच हेरिटेज वास्तुंना मेट्रोचा काही धोका असेल, अशा संदर्भातील कोणतीही कागदपत्रे मुंबई हेरिटेज संवर्धन समितीकडे आलेली नाहीत.
- चेतन रायकर, सदस्य,मुंबई हेरिटेज संवर्धन समिती


मेट्रो ३च्या कामामुळे जे. एन. पेटीट लायब्ररीच्या बांधकामाचे नुकसान झाल्यानंतर, त्यांनी याबाबत न्यायालयात दाद मागितली. त्या वेळी न्यायालयात सर्व हेरिटेज वास्तुंची बाजू मांडली होती. त्या संदर्भात त्यांनी मुंबई हेरिटेज कंझर्व्हेशन कमिटीला पत्र लिहिले. आम्ही ते पत्र एमएमआरसीला पाठविले आणि या प्रकरणाकडे लक्ष देत, हेरिटेज वास्तुंची क.ाळजी घ्या, असे सांगितले आहे. एमएमआरसीने आम्हाला याबाबत आश्वासन दिले होते की, मेट्रो ३च्या कामादरम्यान मार्गात येणाºया हेरिटेज वास्तुंची काळजी घेतली जाईल. या हेरिटेज वास्तुंच्या बांधकामाच्या देखभालीची जबाबदारी एमएमआरसीकडे असल्यामुळे मेट्रो ३च्या भुयारी मार्गाच्या कामामुळे जर या वास्तुंना काही धोका निर्माण होत असेल, तर त्याबाबत फक्त एमएमआरसीच माहिती देऊ शकेल.
- उमेश नगरकर, सचिव,
मुंबई हेरिटेज कंझर्व्हेशन कमिटी

सिद्धार्थ महाविद्यालय
(डी. एन. रोड, फोर्ट)
स्थापना - १९५६
हेरिटेज दर्जा - २
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या महाविद्यालयाची स्थापना केली होती. पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही संस्था सध्या हे महाविद्यालय चालविते. मेट्रोच्या कामांमुळे महाविद्यालयाच्या इमारतीला काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत. खोदकामांमुळे इमारतीला हादरे बसतात, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी महाविद्यालयात या प्रकरणी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती.

फ्लोरा फाउंटन
(महात्मा गांधी मार्ग, काळाघोडा)
स्थापना - १८६४

भिका बहराम विहीर
(वीर नरिमन रोड,
मरिन लाइन्स)
स्थापना १७२५
हेरिटेज दर्जा - १
मुंबईत शिल्लक राहिलेल्या आणि दुर्मीळ विहिरींपैकी ही एक विहीर आहे. समुद्राच्या जवळ असूनही विहिरीचे पाणी गोड आहे हे विशेष. त्यामुळे ही विहीर अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरते. मेट्रोसाठी विहिरीच्या जवळच खोदकाम होत आहे, या खोदकामामुळे विहिरीतील पाण्याचा मुख्य स्रोत बंद होऊन विहीर आटेल, अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

जे. एन. पेटीट लायब्ररी
(डी. एन. रोड. फोर्ट)
हेरिटेज दर्जा - २ अ
जे. एन. पेटीट लायब्ररी म्हणजे पुस्तकांचे घर आहे. लायब्ररीची इमारत निओ गोथिक वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे. युनेस्कोने २०१५ साली या इमारतीचा गौरव केला होता. मेट्रो ३च्या भुयारी खोदकामामुळे बसणाºया हादºयांनी २५ आॅगस्ट २०१७ रोजी इमारतीमधील एक शोभेची वस्तू कोसळून नुकसान झाले.

वाडिया अताश बहराम (जगन्नाथ शंकर शेठ रोड,
मरिन लाइन्स)
स्थापना १८३०
हेरिटेज दर्जा - ३
ही जुनी पारसी अग्यारी आहे. या अग्यारीसारख्या जगात ८ अग्यारी आहेत. मेट्रोच्या कामांमुळे इमारतीला हादरे बसत आहेत. मेट्रोचे भुयार हे अग्यारीच्या खालून जाणार आहे, अशी माहिती लोकांना मिळाली होती, तेव्हा शहरातील पारसी समुदायाने विरोध केला. त्यानंतर, एमएमआरसीएलने स्पष्ट केले की, मेट्रोचे भुयार अग्यारी खालून जाणार नाही.

Web Title: Heritage buildings scared for Metro work; Dugs are being constructed due to historical buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.