'Harafari', Nitesh Ranee Udhivali Uddhav Thackeray | 'हेराफेरी', नितेश राणेंनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

मुंबई - शिवसेना आणि भाजपा गेली तीन वर्ष सत्तेत आहेत.  कोणाला पाठिंबा काढून घ्यायचा असेल तर खुशाल घ्यावा, असं विधान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्ष शिवसेनेला अप्रत्यक्ष इशाराच दिला. शिवसेनेनंही अनेकदा पाठिंबा काढून घेण्याची भाषा केली आहे. राजीनामे खिशात घेऊन फिरत असल्याचे त्यांच्या मंत्र्यांनी अनेकदा सांगितलं होतं.  गेल्या तीन वर्षात दोन्ही पक्षांमध्ये अनेक कारणावरुन कलगीतुरा रंगला होता.  मात्र सरतेशेवटी दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र आहेतच. शिवसेनेला त्रास होत असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे असा सल्ला विरोधकांनीही अनेकदा देऊन झाला.

आता काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातून विस्तव जात नाही हे महाराष्ट्राला ठाऊक आहेच. अशात आता नितेश राणे यांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा राणे विरूद्ध शिवसेना असे ट्विटरवॉर किंवा पोस्टर वॉर बघायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको

राणे यांनी अक्षय कुमार-परेश रावल यांच्या हेराफेरी या हिंदी सिनेमातील एक प्रसंग निवडला आहे. या प्रसंगातील परेश रावल यांच्या चेहऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा, अक्षय कुमारच्या चेहऱ्यावर उद्धव ठाकरेंचा चेहरा आणि सुनील शेट्टीच्या चेहऱ्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा चेहरा लावून हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.  नितेश राणें यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. यामध्ये काहींनी नितेश यांच्या बाजूनं तर काही नेटिझन्सनं उद्धव ठाकरेंच्या बाजूनं आपलं मत मांडलं आहे. 

पाहा व्हिडिओ -  

नितेश राणें यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केल्यानंतर तब्बल दोन तासांनी आणखी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी हा व्हिडिओ आपण बनवला नाही, पण ज्याने कोणी बनवला त्यानं चांगला बनवला असे स्पष्टीकरणही दिले.  


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.