गुजरातेत चाललेला ‘नोटाबंदी’चा ‘गरबा’ही ईडीच्या टिपऱ्यांनी घुमवायला नको काय? - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 07:35 AM2017-10-25T07:35:14+5:302017-10-25T07:37:26+5:30

गुजरातमधील पाटीदार नेते नरेंद्र पटेल यांनी गौप्यस्फोट करत भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी मला एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली, असा खळबळजनक खुलासा केला. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला पुन्हा एकदा टार्गेट केले आहे.

Gujarat election and Election commission | गुजरातेत चाललेला ‘नोटाबंदी’चा ‘गरबा’ही ईडीच्या टिपऱ्यांनी घुमवायला नको काय? - उद्धव ठाकरे

गुजरातेत चाललेला ‘नोटाबंदी’चा ‘गरबा’ही ईडीच्या टिपऱ्यांनी घुमवायला नको काय? - उद्धव ठाकरे

Next

मुंबई - गुजरातमधील पाटीदार नेते नरेंद्र पटेल यांनी गौप्यस्फोट करत भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी मला एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली, असा खळबळजनक खुलासा केला. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला पुन्हा एकदा टार्गेट केले आहे. ''सत्ता व पैशांचे राजकारण ज्या पद्धतीने काँग्रेसने केले तोच मार्ग भारतीय जनता पक्षही स्वीकारत असेल तर मग देशात नक्की बदलले काय हा प्रश्नच आहे'', अशी टीका त्यांनी सामना संपादकीयमधून केली आहे.  'पटेल आंदोलकांची बोली लावली जात असल्याचे आरोप हार्दिक पटेल करीत आहेत. एकतर या आरोपांची ‘ईडी’कडून तत्काळ चौकशी व्हायला हवी व मुंबईतील ‘ईडी’ स्पेशालिस्ट भाजप नेत्यांनी गुजरातच्या भूमीवर जाऊन या ५०० कोटींसंदर्भात चौकशीची मागणी करायला हवी. मुंबईत सहा नगरसेवकांचे शिवसेनेत आगमन झाले तो भ्रष्टाचार आहे असे ज्यांना वाटते त्यांनी गुजरातेत चाललेला ‘नोटाबंदी’चा ‘गरबा’ही ईडीच्या टिपऱ्यांनी घुमवायला नको काय? आधी महाराष्ट्रात व आता गुजरातमध्ये पैशांचा ‘राजकीय खेळ’ खेळला जात आहे'', असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

काय आहे आजचे सामना संपादकीय ?
गुजरातमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून सध्या जो धुरळा उडत आहे त्यामुळे देशाची करमणूक होत आहे. एखाद्या राज्यास तेथील राजकारणी कसे बदनाम करतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुजरात. सध्या तिथे जो ‘तीन पत्ती’ जुगाराचा डाव खेळला जात आहे तो पाहता हे राज्य आता महात्मा गांधी व सरदार पटेलांचे राहिले नसून ते पैशांच्या जोरावर राज्य करणाऱ्यांचे झाले आहे. पैशांचे राज्य व पैशांचे राजकारण म्हणजे नक्की काय असते ते गुजरातमधील घडामोडींवरून स्पष्ट दिसते. गुजरातमधील विकास ‘गांडो’ झाल्यानंतर म्हणजे ठार वेडा झाल्यानंतर आता विजय विकत घेण्याच्या हालचाली सत्ताधारी पक्ष करीत आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी आपणांस एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला व त्यातील दहा लाख रुपये ऍडव्हान्स म्हणून देण्यात आले असा आरोप पाटीदार समाजाचे नेते नरेंद्र पटेल यांनी केला आहे. पटेल यांनी भाजपात प्रवेश केला व लगेच त्यांच्यातील सत्यवचनी हरिश्चंद्र जागा झाल्याने ते पुन्हा भाजपातून बाहेर पडले. भारतीय जनता पक्षाने यावर थातूरमातूर उत्तरे देण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यात तो नेहमीचा दम नाही व वृत्तवाहिन्यांवर त्यांच्या प्रवक्त्यांच्या फौजा नामोहरम झाल्या आहेत. नरेंद्र पटेल हे एकमेव उदाहरण नसून पैसे फेकून इतर पक्षांतील वजनदार नेते विकत घेण्यासाठी गुजरातमध्ये बाजार भरवला जात आहे. या बाजाराचे सूत्रधार देशाचे राजकारण याच पद्धतीने आपल्या मुठीत ठेवू इच्छित असतील तर ही बाब चिंताजनक व देशाच्या दृष्टीने घातक आहे. पटेल समाजाचे आंदोलन व त्यांचा नेता हार्दिक पटेल याने भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. 
पंतप्रधान मोदी हे बरेच दिवस परदेश दौऱ्यावर गेलेले नाहीत. अलीकडे त्यांनी जास्तीत जास्त वेळ गुजरातला दिला आहे. म्हणजेच गुजरातमध्ये भाजपला आव्हान आहे व त्या पक्षासाठी विधानसभेचे मैदान सोपे नाही. मोदी म्हणजे गुजरातचे सर्वेसर्वा व हृदयसम्राट असतील आणि त्यांनी गेल्या पंधरा वर्षांत गुजरातचा प्रचंड विकास केला असेल तर मग प्रचाराचा धुरळा न उडवता त्यांना सहज मोठा विजय मिळवता आला असता. मोदी यांनी गुजरात विकासाचे जे ‘मॉडेल’ भाषणबाजी व सोशल मीडियातून समोर आणले ते खरे आहे असे एकवेळ मान्य केले तर मग ऐन निवडणुकीत गुजरातेत बसून त्यांना घोषणांचा पाऊस व धमक्यांचा गडगडाट करावा लागत आहे? पंतप्रधान मोदी यांनी दोन आठवडय़ांत तीनवेळा आणि सप्टेंबरपासून पाचवेळा गुजरातचा दौरा करून अगदी लहान प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण वगैरे कार्यक्रम केले व जे लोक विकासाला विरोध करतील त्यांना एक दमडीही केंद्राकडून मिळणार नसल्याचे बजावले. म्हणजे भाजपला मत दिले नाही तर याद राखा असेच त्यांना सांगायचे आहे. लोकशाहीत असे बोलणे व वागणे योग्य नाही, पण सत्ता व पैशांचे राजकारण ज्या पद्धतीने काँग्रेसने केले तोच मार्ग भारतीय जनता पक्षही स्वीकारत असेल तर मग देशात नक्की बदलले काय हा प्रश्नच आहे. ‘पटेल’ आंदोलकांची बोली लावली जात असल्याचे आरोप हार्दिक पटेल करीत आहेत. पटेल आंदोलकांना विकत घेण्यासाठी ५०० कोटींचे बजेट भाजपने ठेवले असल्याचे विधानही हार्दिकभाईने केले. एकतर या आरोपांची ‘ईडी’कडून तत्काळ चौकशी व्हायला हवी व मुंबईतील ‘ईडी’ स्पेशालिस्ट भाजप नेत्यांनी गुजरातच्या भूमीवर जाऊन या

५०० कोटींसंदर्भात चौकशीची मागणी करायला हवी. मुंबईत सहा नगरसेवकांचे शिवसेनेत आगमन झाले तो भ्रष्टाचार आहे असे ज्यांना वाटते त्यांनी गुजरातेत चाललेला ‘नोटाबंदी’चा ‘गरबा’ ही ईडीच्या टिपऱ्यांनी घुमवायला नको काय? फसवणूक व खोटेपणा करून सदासर्वकाळ लोकांना मूर्ख बनवता येणार नाही. महाराष्ट्रात निवडणुका जिंकण्यासाठी व शिवसेनेचा राजकीय पराभव करण्यासाठी पैशांचा वापर झाला, लोकांना विकत घेतले गेले हे एकवेळ समजू शकतो, पण गुजरात तर तुमचेच आहे ना? पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्या राज्यात ज्या काही सुधारणा केल्या त्यामुळे देशाला नवी दिशा आणि नवा प्रकाश दिल्याचा गवगवा नेहमीच होत असतो. मग आता पैशांचे प्रयोग करून लोक विकत घेण्याचे व विरोधकांची तोंडं बंद करण्याचे प्रकार का सुरू आहेत? गुजरातच्या जनतेचा विश्वास गमावल्यामुळे कालपर्यंतच्या विरोधकांना साडीचोळी देऊन ‘विकासा’च्या लग्नात नाचवायचा कार्यक्रम आता सुरू आहे, असे अलीकडील घडामोडी आणि आरोप-प्रत्यारोपांवरून जनतेला वाटू शकते. हे अधःपतन आहे. आधी महाराष्ट्रात व आता गुजरातमध्ये पैशांचा ‘राजकीय खेळ’ खेळला जात आहे. पंतप्रधानांच्या गृहराज्यात त्यांचा पक्ष अडचणीत येऊ नये अशी आमची इच्छा आहे. त्यामुळेच आम्ही एका तळमळीने हे सगळे सांगत आहोत. सारा देश गरिबी, महागाई, बेरोजगारी व मंदीच्या तिरडीवर तडफडत असताना गुजरातमध्ये पैशांचा पाऊस कसा पडत आहे? लोकांनी हे वैभव आज पाहावे आणि कायमचे डोळे मिटून ‘हे राम’ म्हणावे!

Web Title: Gujarat election and Election commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.