थरानुसार ठरतो गोविंदाचा डाएट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 05:17 AM2018-09-01T05:17:38+5:302018-09-01T05:18:42+5:30

जेतेपदासाठी मास्टर प्लॅन : सराव अंतिम टप्प्यात; दूध, फळे, प्रमाणशीर आहाराची पथ्ये

Govinda Diet | थरानुसार ठरतो गोविंदाचा डाएट

थरानुसार ठरतो गोविंदाचा डाएट

Next

मुंबई : अवघे दोन दिवस बाकी राहिल्याने मुंबापुरीत दहीहंडीचा ‘माहौल’ तयार झाला आहे. शहर आणि उपनगरातील मंडळांची अंतिम सरावाची लगबग सुरू आहे; तर दुसरीकडे शालेय विद्यार्थी आणि त्यांचे पालकही शाळेतल्या गोकुळ अष्टमीच्या तयारीस लागले आहेत. दहीहंडी पथकांचा सराव अंतिम टप्प्यात आला आहे. हंडीत सहभागी होण्यासाठी अनेक पथकांतील गोविंदांनी आहाराचे विशेष पथ्य पाळले आहे.

कांजूरमार्ग येथील छत्रपती गोविंदा पथकाचे प्रशिक्षक रितेश भाटकर यांनी सांगितले की, गोविंदांनी मागील दोन महिन्यांपासून सरावाची सुरुवात केली आहे. थरानुसार गोविंदाचा डाएट प्लान असतो. खालच्या थरावरील वजनदार गोविंदाचा ‘हेव्ही डाएट’, तर वरील थरावरच्या गोविंदाचा ‘लो डाएट’ आहे. दूध, फळे, प्रमाणशीर आहार असा डाएट सर्वसामान्यपणे पाळला जात आहे. वरच्या थरावरील गोविंदाची उंचीची भीती घालविण्यासाठी एक वर्ष सराव केल्यानंतर तो गोविंदा थरावर चढण्यासाठी तयार होतो. पथकात खेळाडू जास्त असल्याने ताळमेळ योग्यरीत्या जमत असल्याचे त्यांनी सांगितले. जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी सांगितले की, गोविंदा मजबूत डाएट करून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाला आहे.

गोविंदाच्या शरीरयष्टीप्रमाणे तो कोणत्या थरावर जाईल, हे ठरवले आहे. ‘गोविंदा’ डेव्हिड फर्नांडिस यांनी सांगितले की, दहीहंडी जसजशी जवळ येते, तसा अंगात उत्साह संचारतो. प्रत्येकाच्या सोयीप्रमाणे आहार कमी-जास्त केला जातो. मी आता फक्त रात्रीचे जेवण करत असून, दहीहंडीच्या खालून दुसऱ्या थरावर असल्याचे त्यांनी सांगितले.

हंडीचे साहित्य दाखल
बाजारात दहीहंडीनिमित्त बालगोपाळचे टी-शर्ट दिसून येत आहेत. तसेच बाजारपेठांत कृष्णाच्या वस्त्रांसह बासरी, मोरांचे पंख, मुकुट, कंबरपट्टा दाखल झाला आहे. गोविंदासह गोपिकांसाठी डोक्याला बांधण्यासाठी ‘आला रे आला गोविंदा’ अशी पट्टी आहे.

Web Title: Govinda Diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.