पुरावे सापडले तर संभाजी भिडेंवर कारवाई - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 03:38 PM2018-04-17T15:38:16+5:302018-04-17T15:38:16+5:30

आजची कारवाई ही एल्गार परिषदेला डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली नव्हती.

Government will take action against Bhide guruji of evidences found connection with Bhima Koregaon riots | पुरावे सापडले तर संभाजी भिडेंवर कारवाई - देवेंद्र फडणवीस

पुरावे सापडले तर संभाजी भिडेंवर कारवाई - देवेंद्र फडणवीस

Next

मुंबई: नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याच्या संशयावरून मंगळवारी मुंबई, पुणे, नागपूर आणि गडचिरोलीत अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. या सगळ्याचा संबंध भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाशी संबंधित असलेल्या एल्गार परिषदेशी असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. 

आजची कारवाई ही एल्गार परिषदेला डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली नव्हती. नक्षली चळवळींशी संबंधित असलेल्या शहरी भागातील लोकांविरूद्ध ही कारवाई करण्यात आली. तसेच ही संपूर्ण कारवाई केंद्रीय यंत्रणांकडून करण्यात आली, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीतही अशाप्रकारचे छापे टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांना संभाजी भिडे यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात आला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात ज्यांच्याविरोधात पुरावे सापडतील त्या सर्वांविरोधात कारवाई केली जाईल. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना संभाजी भिडे यांना क्लीन चीट दिली होती. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडे गुरुजींचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा कुठलाही पुरावा हाती लागलेला नाही. शिवाय, ज्या महिलेने त्यांच्याविरोधात तक्रार केली होती तिनेच आपण भिडे गुरुजींना ओळखत नसल्याची साक्ष दिली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.  तथापि, गुरुजींविरोधात काही नवे पुरावे आले असून त्याचा तपास करून आठ दिवसांत पुढील कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी, जेएनयुचा विद्यार्थी नेता उमर खालीद, माजी न्यायमूर्ती बी़ जी़ कोळसे पाटील आणि प्रकाश आंबेडकर आदि सहभागी झाले होते.  या एल्गार परिषदेच्या सुरुवातीला कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला सादर केलेल्या गीतातून लोकांना चेतवल्याचा आरोप करण्यात आला.  याप्रकरणी ७ जानेवारीला विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या एल्गार परिषदेनंतर दुस-या दिवशी कोरेगाव भीमा येथे दंगल झाली़ ही दंगल घडवून आणण्यात नक्षलवाद्याचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता.  त्यानंतर याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

आज पहाटेपासूनच अतिशय गुप्तपणे पोलिसांनी पुणे, मुंबई, गडचिरोली येथील कार्यकर्त्यांच्या घरावर एकाचवेळी सर्च आॅपरेशन सुरु केले़ पुण्यात कबीर कला मंचचे स्वतंत्र कार्यालय नाही़ येरवडा येथील रमेश गायचूर आणि वाकड येथील सागर बोडके यांच्या घरात तपासणी सुरु आहे. त्याचवेळी नागपूर येथील सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी तपासणी सुरु आहे.

अत्यंत गुप्तपणे सुरु केलेल्या या सर्चमध्ये पोलिसांना कार्यकर्त्यांच्या घरातून कोरेगाव भीमा संबंधी वाटण्यात आलेली पत्रके, पेनड्राईव्ह व अन्य काही साहित्य मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.  याशिवाय मुंबईतही सुधीर ढवळे व अन्य काही कार्यकर्त्यांच्या घरात सर्च सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यास वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी नकार दिला असून कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्याबाबत माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले.  
 

Web Title: Government will take action against Bhide guruji of evidences found connection with Bhima Koregaon riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.