शेतकऱ्यांबाबतच्या कोडगेपणाची सरकारला किंमत चुकवावी लागेल- विखे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 06:49 PM2018-06-04T18:49:50+5:302018-06-04T18:49:50+5:30

शेतकऱ्यांबाबत सरकारने कोडगेपणाचा कळस गाठला असून, सरकारला लवकरच याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.

The government will have to pay the cost of farmers' code - Vikhe Patil | शेतकऱ्यांबाबतच्या कोडगेपणाची सरकारला किंमत चुकवावी लागेल- विखे पाटील

शेतकऱ्यांबाबतच्या कोडगेपणाची सरकारला किंमत चुकवावी लागेल- विखे पाटील

Next

मुंबई- शेतकऱ्यांबाबत सरकारने कोडगेपणाचा कळस गाठला असून, सरकारला लवकरच याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. नागपूर येथील आंदोलनात झालेला एका शेतकऱ्याचा मृत्यू आणि अमरावती येथे तुरीचे पैसे मिळण्यासंदर्भात झालेल्या आक्रमक आंदोलनासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते.

शेतकरी संपाचा एक भाग म्हणून नागपूर येथील प्रजापती चौकात आंदोलन करणारे शेतकरी शरद खेडीकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते आहे. त्यामुळे खेडीकर यांच्या मृत्यूसाठी सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे. परंतु खेडीकर यांचे बलिदान व्यर्थ ठरणार नाही. सरतेशेवटी सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकावेच लागेल, असा सूचक इशाराही विरोधी पक्षनेत्यांनी दिला आहे.

दरम्यान, सोमवारी काँग्रेसचे आमदार यशोमतीताई ठाकूर आणि आ. प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली अमरावती येथे तुरीच्या खरेदीचे चुकारे व इतर समस्यांसंदर्भात तीव्र आंदोलन झाले. याबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, मन की बातमधून शेतकऱ्यांना डाळी पिकवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या डाळीचा प्रत्येक दाणा खरेदी केला जाईल, असा शब्द खुद्द पंतप्रधानांनी दिला होता. पण शासकीय खरेदीची मुदत संपल्यावरही महाराष्ट्रात नाफेडकडे नोंदणी केलेल्या 2 लाख 65 हजार शेतकऱ्यांपैकी 1 लाख 92 हजार शेतकऱ्यांची सुमारे 25 लाख क्विंटल तूर अजूनही पडून आहे. नाफेडने 45 लाख क्विंटल तुरीच्या खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते. पण या सरकारने केवळ 33 लाख क्विंटल तुरीची खरेदी केली.

खरेदी केलेल्या तुरीचे पैसे सरकारला अजूनही देता आले नाही. तुरीसह हरभरा, सोयाबीन अशा सर्वच शेतमालाच्या खरेदीमध्ये सरकारने प्रचंड निष्काळजीपणा दाखवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा उघड्यावर असणारा शेतमाल मोठ्या प्रमाणात भिजला आहे. अमरावती येथे आज तीव्र आंदोलन करण्यापूर्वी काँग्रेसने गेल्या आठवड्यात मूक मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले होते व तातडीने उपाययोजना न केल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु, सरकारला शेतकऱ्यांबाबत कोणतीही संवेदनाच शिल्लक राहिलेली नसल्याने वेळीच कोणतेही निर्णय घेण्यात आले नाही व शेवटी शेतकऱ्यांना तीव्र आंदोलन उभारावे लागले. या ठिकाणी एका शेतकऱ्याने आत्मदहनाचाही प्रयत्न केला. परंतु सरकार जागे व्हायला तयार नाही. त्याऐवजी हे सरकार अजूनही सेल्फी विथ फार्मर्ससारखा स्टंट करायला निघाले आहे. या सरकारला शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
 

Web Title: The government will have to pay the cost of farmers' code - Vikhe Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.