धक्कादायक! तापाचं औषध दिल्यानं तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 10:01 AM2018-10-19T10:01:25+5:302018-10-19T10:02:28+5:30

पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू

Given injection for fever 19 year old dies complaint registered | धक्कादायक! तापाचं औषध दिल्यानं तरुणाचा मृत्यू

धक्कादायक! तापाचं औषध दिल्यानं तरुणाचा मृत्यू

Next

मुंबई: युनानी डॉक्टरनं दिलेल्या चुकीच्या औषधामुळे घाटकोपरमधील 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. कार्तिक डेडा असं या तरुणाचं नाव आहे. आठवड्याभरापूर्वी ताप आल्यानं कार्तिक घाटकोपर पश्चिमेला असणाऱ्या नजमस क्लिनिकमध्ये गेला होता. त्यावेळी डॉक्टर नझामुद्दीन शेख यांनी इंजेक्शनच्या माध्यमातून त्याला औषध दिलं. मात्र यामुळे कार्तिकला होणाऱ्या वेदना कमी होण्याऐवजी वाढल्या, असा आरोप त्याचा भाऊ जयंत डेडा यानं केला आहे.

कार्तिक 13 ऑक्टोबरला क्लिनिकमध्ये गेला होता. तिथे डॉक्टर शेख यांनी त्याला इंजेक्शन दिलं. मात्र त्यामुळे कार्तिकला होत असलेल्या त्रासात वाढ झाली. त्याला चालताही येत नव्हतं. यानंतर तीन दिवसांनी कार्तिक पुन्हा क्लिनिकमध्ये गेला. त्यावेळी डॉक्टर शेख यांनी त्याला पुन्हा इंजेक्शन दिलं. मात्र क्लिनिकमधून घरी येताच कार्तिक कोसळला, अशी माहिती जयंतनं दिली. यानंतर कुटुंबियांनी कार्तिकला राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. तेथील डॉक्टरांनी कार्तिकला चांगल्या उपचारांची गरज आहे, असं सांगत त्याला सायन रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. 

शरीराच्या ज्या भागावर डॉक्टर शेख यांनी कार्तिकला इंजेक्शन दिलं होतं, त्या ठिकाणी सूज आणि फोड आल्याची माहिती सायन रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी दिली. यानंतर फोडाच्या काही भागाची तपासणी करण्यात आली. त्यामधून इंजेक्शन दिलेल्या भागाला गँग्रीन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. सायन रुग्णालयात दाखल केल्यानंतरच्या 12 तासात कार्तिकचा मृत्यू झाला. शेख यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे कार्तिकचा मृत्यू झाल्याचा आरोप सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी केला आहे. 

जीवघेण्या संसर्गामुळे कार्तिकचा मृत्यू झाला असावा, असा संशय सायन रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. राजेश डेरे यांनी व्यक्त केला. कार्तिकच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी त्याच्या व्हिसेराची तपासणी केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रकरणी पार्क साईट पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. शेख यांच्या क्लिनिकमधील सर्व औषधं आणि इंजेक्शन्स ताब्यात घेण्यात आल्याची माहिती प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी दिली. शेख यांच्या क्लिनिकची नोंद प्रशासनाकडे आहे. मात्र तरीही आम्ही त्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करत आहोत, असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र याबद्दल काहीही बोलण्यास शेख यांनी नकार दिला. 
 

Web Title: Given injection for fever 19 year old dies complaint registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.