आम्हालाही उत्सवी मुदत द्या!, थर्माकोल विक्रेत्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 06:28 AM2018-07-15T06:28:39+5:302018-07-15T06:29:04+5:30

पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम पाहता मुंबई उच्च न्यायालयाने प्लॅस्टिकनंतर आता थर्माकोलवर बंदी आणली आहे. त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात येईल, असाही आदेश न्यायालयाने दिला आहे.

Give us a festive time !, the demand for thermocol sellers | आम्हालाही उत्सवी मुदत द्या!, थर्माकोल विक्रेत्यांची मागणी

आम्हालाही उत्सवी मुदत द्या!, थर्माकोल विक्रेत्यांची मागणी

googlenewsNext

मुंबई : पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम पाहता मुंबई उच्च न्यायालयाने प्लॅस्टिकनंतर आता थर्माकोलवर बंदी आणली आहे. त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात येईल, असाही आदेश न्यायालयाने दिला आहे. मात्र राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने ज्याप्रमाणे प्लॅस्टिकच्या किरकोळ विक्रेत्यांना तीन महिन्यांची मुदत दिली आहे, त्याचप्रमाणे आम्हालाही यंदाच्या गणेशोत्सवापुरती उत्सवी मुदत द्यावी, अशी मागणी थर्माकोल विक्रेत्यांनी केली आहे.
राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी लागू केली, त्याचवेळी थर्माकोलवरही बंदी लागू करण्यात आली होती. मात्र, याविरोधात काही संघटना उच्च न्यायालयात गेल्या होत्या. त्याबाबत शुक्रवारी निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची थर्माकोलची बंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे आता राज्यात थर्माकोलचा वापर करता येणार नाही. साहजिकच सण-उत्सवात थर्माकोलच्या वापरावर बंधन येणार आहे. गणपती उत्सवासाठी थर्माकोलची घाऊक खरेदी कित्येक महिने आधीच होते. त्यामुळे डेकोरेटर आणि कलाकारांचे मोठे नुकसान होत असल्याने यंदाच्या गणेशोत्सवापुरती थर्माकोल वापरण्याची मुभा द्यावी, अशी थर्माकोल फॅब्रिकेटर अ‍ॅण्ड डेकोरेटर असोसिएशनची विनंती याचिकाही न्यायालयाने फेटाळली आहे.
थर्माकोलच्या वस्तू, मखर आणि सजावटीच्या सर्व साहित्यावरील बंदी उच्च न्यायालयाने शुक्रवारी कायम ठेवल्याने यापूर्वीच तयार झालेली मखर, शिवाय कच्चा माल याची विल्हेवाट कशी लावायची, असा सवाल थर्माकोल विक्रेत्यांसमोर उभा ठाकला आहे. शिवाय, यामुळे किरकोळ विक्रेत्यांनाही लाखो रुपयांच्या घरात नुकसान सहन करावे लागणार आहे. या बंदीने थर्माकोल कारखान्यांतील मजुरांचा रोजगारही जाणार असल्याचे दादर येथील अक्षय डेकोरेटर्सचे अरुण दरेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यामुळे ज्याप्रमाणे प्लॅस्टिक विक्रेत्यांना मुदत दिली, त्याप्रमाणे आम्हालाही द्या, अशी मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
>आर्थिक नुकसान
उत्सवादरम्यान मुंबईतील थर्माकोल उद्योगाचा व्यवसाय कोट्यवधीच्या घरात जातो. एक महिन्यानंतर गणपती आहेत, त्याचे ८०-९० टक्के मखर आता तयार झाले आहेत. त्यामुळे मखर तयार असताना झालेला हा निर्णय विक्रेत्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान करणारा आहे. पर्यावरणाचा विचार करता या निर्णयाचे स्वागत आम्ही करत आहोत. मात्र थोडी मुदत देऊन त्यानंतर याची अंमलबजावणी करण्यात यावी, असे मत लालबाग येथील थर्माकोल विक्रेते किशोर सानप यांनी व्यक्त केले.
>पर्यावरणमंत्र्यांशी चर्चा करणार
थर्माकोलबंदीच्या निर्णयाला विरोध नाही. मात्र, आता मखर तयार झाले आहेत. त्यामुळे विल्हेवाट लावण्यासाठी केवळ गणेशोत्सवापुरती मुदत द्यावी, अशी मागणी आहे. शिवाय, थर्माकोलचा ९० टक्के वापर हा पॅकेजिंग उद्योगात केला जातो आणि केवळ दहा टक्के थर्माकोल डेकोरेशनसाठी वापरले जाते. त्यामुळे पॅकेजिंग उद्योगात वापरल्या जाणाऱ्या थर्माकोलवरही बंदी आणणार याबद्दल स्पष्टता आणावी. या सर्व मुद्द्यांविषयी चर्चा करण्यासाठी अधिवेशन संपल्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची भेट घेणार आहोत. या भेटीत पुन्हा यंदाच्या उत्सवाच्या मुदतीची मागणी करण्यात येईल, असे थर्माकोल फॅब्रिकेटर्स, ट्रेडर्स अ‍ॅण्ड डेकोरेशन असोसिएशनचे सचिव इद्रीस शायर यांनी सांगितले.

Web Title: Give us a festive time !, the demand for thermocol sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई