वानखेडेच्या स्टँडला अजित वाडेकरांचे नाव द्या; शिवसेना खासदाराची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 05:14 AM2018-08-20T05:14:47+5:302018-08-20T05:15:12+5:30

सप्टेंबर अखेरपर्यंत पाहावी लागणार वाट

Give the name of Ajit Wadekar to Wankhede's stand; Demand for Shiv Sena MP | वानखेडेच्या स्टँडला अजित वाडेकरांचे नाव द्या; शिवसेना खासदाराची मागणी

वानखेडेच्या स्टँडला अजित वाडेकरांचे नाव द्या; शिवसेना खासदाराची मागणी

Next

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिवंगत अजित वाडेकर यांच्या सन्मानार्थ वानखेडे स्टेडियममधील एका स्टँडला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.
आक्रमक फलंदाज अशी ओळख असणाऱ्या अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात, भारतीय संघाने वेस्ट इंडिज आणि इंग्लडचा परदेशी खेळपट्ट्यांवर पराभव करण्याची किमया पहिल्यांदा साधली होती. आंतराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचा लौकिक वाढविण्यात वाडेकर यांचा मोठा वाटा आहे. ‘पद्मश्री’ आणि ‘अर्जुन’ पुरस्कारांचे मानकरी असणारे वाडेकर यांचे वानखेडे स्टेडियम आणि मुंबई क्रिकेटमध्ये मोठे योगदान राहीले आहे. वानखेडे स्टेडियमच्या एका स्टँडला वाडेकर यांचे नाव देऊन त्यांचा उचित सन्मान करावा, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे. त्यासाठी एमसीएच्या मानद सचिवांना पत्रही पाठविले आहे.
वाडेकर यांचे नाव एखाद्या स्टँडला देण्यात यावे, या मागणीला क्रिकेट जगत, तसेच एमसीएशी संबंधित पदाधिकाºयांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, सध्या एमसीएचा कारभार हा न्यायालयाने नियुक्त केलेल्या निरीक्षकांकडे आहे. त्यामुळे जोपर्यंत निवडणुकीच्या माध्यमातून एमसीएची नवीन कार्यकारणी अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत अशा प्रकारचा कोणताच मोठा निर्णय घेता येणार नसल्याचे, एमसीएचे माजी उपाध्यक्ष विनोद देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. सप्टेंबर अखेरपर्यंत एमसीएची प्रलंबित घटनादुरुस्ती आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच वानखेडेतील एखाद्या स्टँडला अजित वाडेकर यांचे नाव देणे शक्य असल्याचे देशपांडे यांनी स्पष्ट केले.

केवळ दोन स्टँड शिल्लक
वानखेडे स्टेडियमच्या विविध स्टँडना यापूर्वी दिग्गजांची नावे देण्यात आली आहेत. यात माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर, विजय मर्चंट आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावाचे स्वतंत्र स्टँड आहेत, तसेच गरवारे स्टँड, विठ्ठल दिवेचा स्टँड, एमसीए पव्हेलियन आणि नॉर्थ स्टँड अस्तित्वात आहे. याशिवाय वानखेडेच्या ड्रेसिंग रूमला विजय मांजरेकर आणि पत्रकार कक्षाला शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता केवळ एमसीए पव्हेलियन आणि नॉर्थ स्टँड यांच्यापैकी कोणत्या तरी एका स्टँडला अजित वाडेकर यांचे नाव देता येणार आहे. मात्र, असा निर्णय घेण्यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून एमसीएची कार्यकारणी अस्तित्वात येणे आवश्यक आहे.

Web Title: Give the name of Ajit Wadekar to Wankhede's stand; Demand for Shiv Sena MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.