घाटकोपर विमान दुर्घटना : विमानमालक दीपक कोठारींवर गुन्हा दाखल करण्याची विखे-पाटील यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 06:50 PM2018-06-29T18:50:17+5:302018-06-29T18:50:42+5:30

घाटकोपर विमान अपघात प्रकरणी विमानमालक दीपक कोठारी यांच्याविरूद्ध निष्काळजीपणा दाखवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे गुन्हे दाखल करण्याची मागणी  विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. 

Ghatkopar plane crash: Vikas-Patil's demand for filing offense against Deepak Kothari | घाटकोपर विमान दुर्घटना : विमानमालक दीपक कोठारींवर गुन्हा दाखल करण्याची विखे-पाटील यांची मागणी

घाटकोपर विमान दुर्घटना : विमानमालक दीपक कोठारींवर गुन्हा दाखल करण्याची विखे-पाटील यांची मागणी

Next

 मुंबई - घाटकोपर विमान अपघात प्रकरणी यु.वाय.एव्हिएशनचे संचालक दीपक कोठारी यांच्याविरूद्ध निष्काळजीपणा दाखवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे गुन्हे दाखल करण्याची मागणी  विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. 

विखे पाटील यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून, त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, अपघात झाला त्या दिवशी हवामान अतिशय प्रतिकूल होते. अशा हवामानामध्ये 'टेस्ट फ्लाईट' करणे अत्यंत जोखमीचे होते. तरीही या विमानाने उड्डाण का केले, याची चौकशी झाली पाहिजे. या अपघातात ठार झालेल्या सहवैमानिक कॅ. मारिया झुबेरी यांचे पती प्रभात कठुरिया यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार,अपघातापूर्वी त्यांचे कॅ. प्रदीप राजपूत आणि कॅ. मारिया झुबेरी दोघांशीही दूरध्वनीवरून संभाषण झाले होते. प्रतिकूल हवामानामुळे उड्डाण शक्य नसल्याचे दोन्ही वैमानिकांचे मत होते. परंतु, यु.वाय. एव्हिएशनच्या व्यवस्थापनाने 'टेस्ट फ्लाईट'साठी दबाव आणल्याचा आरोपही प्रभात कठुरिया यांनी केला आहे. युवाय एव्हिएशनचा'सेफ्टी रेकॉर्ड' अत्यंत खराब आहे. या कंपनीच्या हेलिकॉप्टरर्सची योग्य देखभाल होत नाही व त्यामुळे यापूर्वी देखील अपघाताची परिस्थिती निर्माण होऊन अतिमहत्वाच्या व्यकींच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तींबाबत इतकी हलगर्जी केली जात असेल तर इतरांबाबत किती बेफिकिरीची मानसिकता या कंपनीकडून अवलंबली जात असावी, असा संशय घेण्यास पूर्ण वाव असल्याचे नमूद करून विरोधी पक्षनेत्यांनी संचालक दीपक कोठारी यांच्याविरूद्ध कारवाईची मागणी केली आहे.

'डीजीसीए'ने हे विमान 'टेस्ट फ्लाईट'साठी सक्षम असल्याचे प्रमाणित केले होते. परंतु, 'टेस्ट फ्लाईट' दरम्यानच हा अपघात झाल्याने 'डीजीसीए'ने विमानाला चाचणी उड्डाणासाठी परवानगी देताना पुरेशी दक्षता घेतली नसावी, असे दिसून येते. त्यामुळे सदरहू विमानाला उड्डाणास सक्षम असल्याचे प्रमाणित करणाऱ्या डीजीसीएच्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यासंदर्भात आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: Ghatkopar plane crash: Vikas-Patil's demand for filing offense against Deepak Kothari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.