निवडणुकीपूर्वी उडवलेला विकासाचा बार फुसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:31 AM2019-04-24T01:31:20+5:302019-04-24T01:31:29+5:30

ठेकेदारांना कार्यादेश नाहीत; कोट्यवधींची कामे रखडली

Flea's development blow blown ahead of elections | निवडणुकीपूर्वी उडवलेला विकासाचा बार फुसका

निवडणुकीपूर्वी उडवलेला विकासाचा बार फुसका

googlenewsNext

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सत्ताधारी शिवसेनेने कोट्यावधी रूपयांचे विकास कामांचे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये घाईघाईने मंजूर केले. मात्र या कामांचे कार्यदेश ठेकेदारांना त्याचवेळी देण्यात आले नाहीत. त्यामुळे तब्बल दोन हजार कोटी रूपयांची कामे रखडली आहेत. परिणामी निवडणुकीपूर्वी शिवसेनेने उडविलेला विकास कामांचा बार फुसका ठरला आहे.

विलेपार्ले येथील रस्त्यांच्या कामाच्या प्रस्तावांना स्थायी समितीने मंजुरी दिली होती. मात्र ही कामं अद्यापही सुरू झालेले नाहीत, अशी तक्रार भाजप नगरसेवक अभिजीत सामंत यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. गेल्या काही महिन्यांमध्ये प्रशासनाने शाळा, रुग्णालय, पर्जन्य जलवाहिन्यांची दुरुस्ती, रस्ते बांधणी आदी विविध कामांचे प्रस्ताव स्थायी समितीने कोणत्याही चर्चेविना तातडीने मंजूर केले.

मात्र प्रशासनाने ठेकेदारांना वेळेवर कार्यादेश न दिल्याने दोन हजार कोटी रुपयांची विकास कामे रखडली. जूनमध्ये शाळा सुरू होत असल्याने पालिका शाळांची दुरुस्ती मे महिन्याच्या सुट्टीमध्येच करता येते. रस्त्याची कामेही पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे होते. प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना बसण्याची चिन्हे आहेत, असा आरोप सदस्यांनी या बैठकीत केला.

स्थायी समितीने मागितला खुलासा
कोणत्या अधिकाऱ्याकडे कोणकोणत्या कामांच्या फाइल्स धूळ खात पडल्या आहेत? याची माहिती तातडीने स्थायी समितीला सादर करावी. स्थायी समितीच्या मंजुरीनंतरही किती कामांचे कार्यादेश ठेकेदारांना दिलेले नाहीत याचा प्रशासनाने खुलासा करावा, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

प्रशासनाची सारवासारव.....
स्थायी समितीमध्ये विविध विकास कामांचे प्रस्ताव मंजूर झाले. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे पुढील प्रक्रिया पूर्ण करता आली नाही, असे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जºहाड यांनी दिले.

Web Title: Flea's development blow blown ahead of elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.