In five departments in Mumbai, Rubella has been vaccinated | मुंबईतील पाच विभागांमध्ये रुबेला लसीकरणास विरोध
मुंबईतील पाच विभागांमध्ये रुबेला लसीकरणास विरोध

मुंबई : राज्यात रुबेला लसीकरण मोहिमेचे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, शिवाय मुंबई शहर-उपनगरातही ७५ टक्के बालकांना ही लस देण्यात आली आहे. मात्र, तरीही शहर-उपनगरातील काही विभागांमधील बालक या लसीकरणापासून वंचित असून, लसीकरणास विरोध होत आहे. यात प्रमुख पाच विभागांचा समावेश आहे. शहर-उपनगरातील कुर्ला, मानखुर्द, गोवंडी, मालाड आणि डोंगरीचा परिसरातील बालक या लसीकरणापासून अजूनही वंचित असल्याची माहिती पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
गोवर-रुबेला या गंभीर आजारांचे निर्मूलन करण्यासाठी राज्यात ९ महिने ते १५ वर्षांखालील बालकांसाठी २७ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. सांगली, पुणे, उस्मानाबाद या जिल्ह्यातील ग्रामीण भागात १०० टक्क्यांहून अधिक लसीकरण झाले आहे. मात्र, मुंबईतील काही विभागातून या लसीकरणाला अजूनही विरोध असल्याची माहिती पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष रेवणकर यांनी दिली. ते म्हणाले, आतापर्यंत शहर-उपनगरात १९ लाख १० हजार बालकांना लस दिली आहे. मात्र, अजूनही काही शाळा प्रशासनाने लसीकरणाला विरोध केला आहे. वस्ती मोहिमेतही सहभाग न घेतल्याने काही बालके वंचित राहिली आहेत.
वंचित बालकांमुळे लस घेतलेल्या बालकांना या आजाराचा धोका संभवू शकतो. त्यामुळे पुन्हा शाळांना भेटी देऊन त्यांना समजावणे सुरू असल्याचे डॉ. रेवणकर यांनी सांगितले. मात्र यामुळे मोहिमेचा कालावधी वाढत आहे. विविध विभागांतील शाळा, वस्त्यांमध्ये जाऊन पालिकेच्या चमूमार्फत जनजागृतीचा उपक्रम सुरू आहे.


Web Title: In five departments in Mumbai, Rubella has been vaccinated
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.