फर्स्ट लेडी पुरस्कार : महाराष्ट्रातील १६ जणींसह ११२ महिलांचा गौरव; राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:58 AM2018-01-21T00:58:53+5:302018-01-21T00:59:02+5:30

विविध क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणा-या महाराष्ट्रातील १६ महिलांसह देशातील ११२ कर्तृत्ववान महिलांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शनिवारी ‘फर्स्ट लेडी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

First Lady Award: Honor of 112 women, including 16 women from Maharashtra; Distribution from the hands of the President at Delhi | फर्स्ट लेडी पुरस्कार : महाराष्ट्रातील १६ जणींसह ११२ महिलांचा गौरव; राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत वितरण

फर्स्ट लेडी पुरस्कार : महाराष्ट्रातील १६ जणींसह ११२ महिलांचा गौरव; राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत वितरण

googlenewsNext

नवी दिल्ली : विविध क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणा-या महाराष्ट्रातील १६ महिलांसह देशातील ११२ कर्तृत्ववान महिलांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शनिवारी ‘फर्स्ट लेडी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनात आयोजित दिमाखदार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी यावेळी उपस्थित होत्या. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने क्रीडा, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणाºया देशातील ११२ महिलांची निवड ‘फर्स्ट लेडी’ पुरस्कारासाठी करण्यात आली होती. सन्मानपत्र हे पुरस्काराचे स्वरूप होते.
भारतात सर्वप्रथम प्रवासी रेल्वे चालविण्याचा विक्रम करण्याºया सातारा येथील सुरेखा यादव यांनी पुरस्कार स्वीकारला. त्यांनी १९८८ मध्ये रेल्वेची पहिली ‘महिला स्पेशल’ लोकल ट्रेन चालवून या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडून काढली. ८ मार्च २०११ ला त्यांनी ‘डेक्कन क्वीन’ ही पुणे ते मुंबई (सीएटी) या कठीण मार्गावरील रेल्वे चालवून असा विक्रम करणारी आशियातील पहिली महिला रेल्वेचालक बनण्याचा मान मिळविला.
देशातील पहिल्या महिला आॅटोरिक्षाचालक परभणी जिल्ह्यातील शीला डावरे यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत त्यांनी १९८८ मध्ये सर्वप्रथम आॅटोरिक्षा चालविला. त्याची नोंद लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली. त्यांनी सतत १३ वर्ष आॅटोरिक्षा चालविला, त्यानंतर महिला आॅटोरिक्षा चालकांसाठी अकादमी सुरू केली. भारतीय महिला क्रिकेट एकदिवसीय संघाच्या पहिल्या कर्णधार पद्मश्री डायना एडलजी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९७५ ते १९९५ पर्यंत त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व करून महिला क्रिकेटला नवी दिशा दिली. महिला जागतिक क्रिकेट स्पर्धेत त्यांनी भारताचे दोन वेळा नेतृत्व केले. भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला तंत्रज्ञ पुण्याच्या अरुणा राजे पाटील यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. १९६९ मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीत प्रवेश करणाºया अरुणा राजे पाटील यांनी पटकथाकार, संपादक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ. चंद्रानी प्रसाद वर्मा या पहिल्या खाण अभियंता आहेत. डॉ. स्वाती पिरामल या प्रथम महिला आहेत ज्या असोचेम या संघटनेच्या अध्यक्षा झाल्या. त्यांनी आरोग्यसेवा, शिक्षण सेवामध्ये आमूलाग्र बदल व्हावा यासाठी प्रयत्न केले. त्या देशातील आघाडीच्या उद्योजक म्हणून गणल्या जातात.
उपासना मकाती यांनी दृष्टिहीनांसासाठी ब्रेललिपीमध्ये देशातील पहिले इंग्रजीमध्ये ‘व्हाईट प्रिंट’ नावाचे मासिक २०१३ पासून प्रकाशित केले आहे. त्यांचे हे मासिक शाळा, महाविद्यालय, वृद्धाश्रम, रुग्णालय, ग्रंथालयात ठेवले जाते. २०१६ च्या फोर्ब्सच्या यादीत स्मार्ट सीईओ म्हणून पहिल्या ३० मध्ये त्यांचे नाव नोंदविले होते.

- देशातील पहिली सॅनिटरी पॅडची बँक सुरू करणा-या आमदार म्हणून वर्सोवा, मुंबई येथील विद्यमान आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी व शाळांमध्ये सॅनिटरी पॅड एटीएम आणि डिस्पोजल मशीन स्थापित केल्या. त्यांनी स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंधासह महिलांच्या आरोग्य, शिक्षणासाठी महत्त्वाचे कार्य केले.

- रजनी पंडित या देशातील पहिल्या नोंदणीकृत खासगी लोकप्रिय गुप्तहेर आहेत. पंडित यांनी आतापर्यंत ७५००० पेक्षा अधिक केसेस सोडविल्या आहेत. त्यांनी या विषयावर डॉक्युमेंट्री तयार केलेली आहे.

- डॉ. इंदिरा हिंदुजा या प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत ज्यांनी पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीची प्रसूती केली आहे. १९८९ मध्ये त्यांनी आयव्हीएफ सेंटरची स्थापना केली आहे. सध्या त्या पी.डी. हिंदुजा राष्ट्रीय रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्रात कार्यरत आहेत.

- जागतिक ग्रँड मास्टर स्पर्धा जिंकणाºया पहिल्या महिला बुद्धिबळपटू मुंबई येथील पद्मश्री भाग्यश्री ठिपसे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी पाच वेळा बुद्धिबळात राष्ट्रीय चॅम्पियनशीपचा खिताब मिळविला आहे. त्या १९९१ मध्ये महिला आशियाई बुध्दिबळाच्या मानकरी ठरल्या. १९९९ च्या राष्ट्रकुल देशांच्या स्पर्धेत त्यांनी सुवर्ण तर तीन वेळा रजत पदकावर मोहर उमटविली आहे.

- पहिली कार ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्था स्थापन करणाºया मुंबई येथील स्नेहा कामत यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिलांसाठी वाहन चालनाचे प्रशिक्षण प्रदान करणाºया स्नेहा कामथ यांनी शी कॅन ड्रॉईव्ह हा उपक्रम सुरू केला आहे.

- डिजिटल आर्टद्वारे भारतातील महिला योद्ध्यांचा परिचय करून देणारी पहिली तरुणी मुंबईची १८ वर्षीय
तारा आनंद.

मरणोत्तर
‘फर्स्ट लेडी’ सन्मान
भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिल्या महिला नायिका दुर्गाबाई कामत व देशातील पहिल्या महिला तबलावादक डॉ.अबन मिस्त्री यांना मरणोत्तर हा सन्मान जाहीर झाला. आज दुर्गाबाई कामत यांच्यावतीने हा पुरस्कार वृषाली गोखले यांनी तर डॉ. अबन मिस्त्री यांच्या वतीने जामिनी जवेरी यांनी स्वीकारला.

 

Web Title: First Lady Award: Honor of 112 women, including 16 women from Maharashtra; Distribution from the hands of the President at Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.