अखेर दादरचे ‘चित्रा’ बंद; ३६ वर्षे केले प्रेक्षकांचे मनोरंजन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 02:04 AM2019-05-17T02:04:34+5:302019-05-17T02:04:50+5:30

विविध चित्रपट पडद्यावर दाखवत गेल्या ३६ वर्षांपासून चित्रपट रसिकांचे मनोरंजन करणारे दादर पूर्वेकडील चित्रा सिनेमागृह गरुवारी बंद करण्यात आले.

 Finally, 'Chitra' of Dadar was closed; Entertainer entertained 36 years ago | अखेर दादरचे ‘चित्रा’ बंद; ३६ वर्षे केले प्रेक्षकांचे मनोरंजन

अखेर दादरचे ‘चित्रा’ बंद; ३६ वर्षे केले प्रेक्षकांचे मनोरंजन

Next

मुंबई : विविध चित्रपट पडद्यावर दाखवत गेल्या ३६ वर्षांपासून चित्रपट रसिकांचे मनोरंजन करणारे दादर पूर्वेकडील चित्रा सिनेमागृह गरुवारी बंद करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील न्यू एक्सिलयर या सिंगल स्क्रीन सिनेमागृहानंतर बंद होणारे चित्रा हे आणखी एक सिंगल स्क्रीन सिनेमागृह आहे.
एकेकाळी दादरमधील चित्रा सिनेमागृह प्रचंड लोकप्रिय होते. या सिनेमागृहाच्या तिकीटबारीवर अनेकदा हाऊसफुलचा बोर्ड झळकला आहे. सिंगल स्क्रीन सिनेमागृहाच्या काळात तर चित्रा हेच अनेक प्रेक्षकांची पहिली पसंती असायची. ‘अनुराग’, ‘जंगली’ यांसारख्या अनेक बॉलिवूडमधील चित्रपटांची सिल्वर ज्युबली ‘चित्रा’मध्ये झाली. मराठी चित्रपटांचेदेखील शो या सिनेमागृहात व्हायचे.
सिनेमागृह दादरसारख्या मध्यवर्ती भागात असल्याने येथे अनेक मराठी चित्रपटांचे प्रिमियर, फर्स्ट लूकदेखील होत असत. महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटाचा प्रिमियरदेखील येथेच झाला होता. मकरंद देशपांडे यांच्या ‘सॅटर्डे सण्डे’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक आमिर खानच्या उपस्थितीत ‘चित्रा’मध्येच पार पडला होता.
चित्रा हे सिनेमागृह पी. डी. मेहता यांचे पुत्र दारा मेहता सांभाळत होते. पण मल्टीप्लेक्समुळे गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षक खूपच कमी संख्येने या सिनेमागृहाकडे वळत होते आणि त्यामुळे त्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत होता. गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या या आर्थिक तोट्यामुळे अखेर त्यांनी हे सिनेमागृह बंद करण्याचा निर्णय घेतला.
अखेर टायगर श्रॉफच्या ‘स्टुडंट आॅफ द ईयर २’ या चित्रपटाच्या गुरुवारच्या शोनंतर हे सिनेमागृह कायमचे बंद झाले. विशेष म्हणजे टायगरचे वडील जॅकी श्रॉफ यांच्या ‘हीरो’ या चित्रपटासाठी १९८३ साली ‘चित्रा’मध्ये हाऊसफुलचा बोर्ड लागला होता आणि त्यांच्या मुलाच्या चित्रपटाच्या येथील शेवटच्या शोनंतर हे सिनेमागृह काळाच्या पडद्याआड गेले.

Web Title:  Finally, 'Chitra' of Dadar was closed; Entertainer entertained 36 years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.