दहावीच्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांवर तज्ज्ञांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 06:22 AM2019-05-25T06:22:48+5:302019-05-25T06:22:50+5:30

महामंडळाला लिहिले पत्र

Expert's objection to the questions in class X Geography Question paper | दहावीच्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांवर तज्ज्ञांचा आक्षेप

दहावीच्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांवर तज्ज्ञांचा आक्षेप

Next

मुंबई : मार्च, २०१९ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल तोंडावर असताना, इंग्रजी माध्यमाच्या दहावीच्या भूगोलाच्या पेपरमध्ये सात गुणांचे प्रश्न चुकीचे असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात भूगोल विषयाच्या तज्ज्ञांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला पत्र लिहून कळविले आहे. या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली असून, मंडळाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.


मार्च, २०१९ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत इंग्रजी माध्यमाच्या भूगोल २ च्या प्रश्नपत्रिकेत ४० गुणांपैकी तब्ब्बल ७ गुणांचे प्रश्न चुकीचे असल्याची माहिती प्राध्यापक विद्याधर अमृते यांनी दिली. त्यात प्रश्न क्रमांक १/१, प्रश्न क्रमांक ४/ब / ५ व ६, प्रश्न क्रमांक ६/ अ/ १ आणि प्रश्न क्रमांक ६/ ब/ २, ३, ५ व ६ हे चुकीच्या पद्धतीने प्रश्नसंचात दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी या संदर्भात शिक्षण मंडळाला पत्र पाठविले आहे.
दरम्यान, प्राध्यापक अमृते यांच्या पत्राची दखल घेत, चुकीच्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावेत, अशी मागणी मनविसेचे राज्य उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे यांनीही शिक्षण मंडळाकडे पत्राद्वारे केली.


प्रश्नपत्रिकेत त्रुटी नाहीत - महामंडळ
प्राध्यापक अमृते यांच्या पत्राची दखल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतली असून, प्रश्नपत्रिकेत त्रुटी नाही किंवा मंडळाकडे या संदर्भातील कोणतीही तक्रार आली नाही. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच पाठ्यपुस्तकासंदर्भातील आक्षेपाबाबत त्यांचे पत्र पुढील कार्यवाहीसाठी बालभारतीला पाठविल्याची माहितीही दिली. तर चुकीच्या प्रश्नाबाबत उपस्थित केलेल्या आक्षेपांचे स्पष्टीकरण द्या, अशी मागणी अमृते यांनी केली आहे.

Web Title: Expert's objection to the questions in class X Geography Question paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.