आजही करावे लागताहेत डोंगरी पोलिसांना ड्रग्ज माफियांशी दोन हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 06:24 AM2018-01-11T06:24:01+5:302018-01-11T06:24:17+5:30

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिम याच्या गुन्हेगारी जगतातील कारकिर्दीच्या सुरुवातीचा एकमेव साक्षीदार असलेला डोंगरी परिसर. आजही डोंगरीचे नाव घेतले, तरी ८०च्या दशकातले अंडरवर्ल्ड डोळ्यासमोर उभे राहते.

Even today, the Dongri police has two hands with drugs mafia | आजही करावे लागताहेत डोंगरी पोलिसांना ड्रग्ज माफियांशी दोन हात

आजही करावे लागताहेत डोंगरी पोलिसांना ड्रग्ज माफियांशी दोन हात

- मनीषा म्हात्रे

मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिम याच्या गुन्हेगारी जगतातील कारकिर्दीच्या सुरुवातीचा एकमेव साक्षीदार असलेला डोंगरी परिसर. आजही डोंगरीचे नाव घेतले, तरी ८०च्या दशकातले अंडरवर्ल्ड डोळ्यासमोर उभे राहते आणि येथील गजबजत्या किचाट गल्ल्यांमध्ये जगणारा रहिवासी, मशिनींमध्ये धडधडणारी उमरखाडी, बालसुधारगृह, बालन्यायालय, डोंगरी मार्केट, नुरबाग, खड्याची वाडी, चार नळ, उमरखाडी, शनी मंदीर, वाडीबंदर जंक्शन, घड्याळ गोदी, काकलीज चौक, इमामवाडा या सर्वांमुळे लक्षात राहणाºया डोंगरी परिसराला वेगळी ओळख मिळाली आहे. गेल्या काही वर्षांत ड्रग्ज तस्करांनी डोके वर काढले. यापूर्वी सँडहर्स्ट रोड रेल्वे यार्डमध्ये नायजेरियनवर कारवाईसाठी आलेल्या पोलिसांवर नायजेरियन ड्रग्ज तस्करांनी दोन वर्षांपूर्वी हल्ला केल्यामुळे, एक वेगळीच भीती पोलिसांमध्ये निर्माण झाली आहे.
वेळ मध्यरात्रीची. सँडहर्स्ट रोड रेल्वे यार्ड परिसरात रुळांमध्ये ड्रग्ज तस्करांचा वाढता लोंढा पळविण्याचा गुन्हे शाखेने निर्णय घेतला. राज्य दहशतवाद विरोधी पथकही यात सहभागी झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोघांनी जॉइंट आॅपरेशन सुरू करत यार्ड गाठले व तेथील नायजेरियन २० फुटी भिंतीवरून पळू लागले. नशेच्या भरात त्यांनीच पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत पळ काढला आणि यामध्ये ७ पोलीस जखमी झाले. यातून स्थानिक पोलिसांनी धडा घेतलेला दिसला. आजही या परिसरात ड्रग्ज तस्करांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जातात. एएनसीकडून करण्यात आलेल्या कारवाईत, डोंगरी परिसरातून अटक करण्यात तस्करांची संख्या अधिक आहे. २०१६ मध्ये तर ४९ तस्करांना या भागातून अटक करण्यात आली होती. या गल्ल्यांआड सुरू असलेली गुन्हेगारी आणि या ड्रग्ज तस्करांवर आवर घालण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी डोंगरी पोलिसांवर आहे.
दक्षिण मुंबईतील महत्त्वाचे, तसेच अतिसंवेदनशील परिसरात असलेले डोंगरी पोलीस ठाणे. स्कॉटलड यार्डच्या धर्तीवर हेरिटेज वास्तूमध्ये हे पोलीस ठाणे उभे राहिले. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या भागांत जवळपास ३ लाख लोकवस्ती आहे. गेल्या काही वर्षांत वेडावाकड्या, चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये व्यापारधंदा आणि वर्कशॉप वाढले आहेत. सद्यस्थितीत ७० टक्के मुस्लीम लोकवस्ती आहे, तर ३० टक्के अन्य भाषिक आहेत. अशात सण-उत्सवाची रेलचेल या भागात अधिक असते. मराठी वस्ती असल्याच्या खुणा सार्वजनिक गणेशोत्सव, गोविंदा पथके यांच्या रूपाने दिसतात. कुठल्याही घटनेचे जलद पडसाद या भागात उमटतात. त्यात राजकीय हालचाली, गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे येथील प्रत्येक हालचालींवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून असतात.
अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमच्या सुरुवातीचा काळ डोंगरीशी जोडला गेल्यामुळे गुन्हेगारीचे वर्चस्व या भागात वाढले, तर १९९२-९३ मध्ये दंगलीचा अतिशय क्रूर चेहरा या भागाने पाहिला. या दंग्यांत आपले कष्टकरी व्यक्तिमत्त्व हा परिसर हरवून बसला आणि राडेबाज अशी त्याची ओळख पक्की होत गेली. आजही याचे अंडरवर्ल्ड कनेक्शन कायम आहे. पोलिसांच्या कारवाईतून ते पाहावयास मिळते.

प्रमुख जबाबदारी
१५ मशिदी, लहान मोठे असे १३ दर्गे, तसेच बुद्धमंदिर, चर्च या भागात आहे. अतिसंवेदनशील असलेल्या या भागात जातीय तणावावर नियंत्रण ठेवत शांतता कायम ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असते. मोहरम, गणपती यांसारख्या सण, उत्सवांची रेलचेल, मिरवणुका या भागात अधिक असल्याने, त्याच्या बंदोबस्ताचा अतिभार पोलिसांवर असतो.

बीट चौकी
नंदलाल जनी मार्ग चौकी, चार नाल चौकी, खडक पोलीस बीट चौकी, विठ्ठल मंदिर चौकी.

२ हजारांमागे १ पोलीस
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ४ पोलीस निरीक्षक, १८ पीएसआय असा एकूण १५० कर्मचारी या पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. अशात २ हजार नागरिकांची सुरक्षा एका पोलिसाच्या खांद्यावर आहे. मात्र, अपुरे मनुष्यबळ असले, तरी येथील कर्मचारी ती जबाबदारी प्रामाणिकपणे निभावत आहे.

टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हलची भर...
या परिसरत मोठ्या प्रमाणात टुर्स
अँड ट्रॅव्हलचा व्यवसायही थाटल्याने त्यांच्या वाहनांचीही यात भर पडलीय. मक्का-मदिनाला जाणाºयांची संख्या अधिक असते.

नागरिकांचे सहकार्य मोलाचे...
नागरिकच आमचे डोळे आणि कान आहेत. त्यामुळे मी आणि माझा कर्मचारी नेहमीचे त्यांच्याशी जास्तीतजास्त घट्ट संवादाची घट्ट नाळ जोडण्याचा प्रयत्न करत असतो. येथील नागरिकांकडूनही आम्हाला चांगले सहकार्य मिळते. असेच सहकार्य करत कायद्याचे पालन करा.
- संदीप भागडीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

येथे करा संपर्क
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
संदीप भागडीकर - ९८२०३७५२१४
- ०२२ -२४६९१९२९
पोलीस ठाणे - ०२२ - २३७५३६७६,
२३७५२४१८

Web Title: Even today, the Dongri police has two hands with drugs mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.