एल्फिन्स्टन दुर्घटना : जखमी सावरताहेत!, रविवारी केईएम रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 05:01 AM2017-10-02T05:01:38+5:302017-10-02T05:02:03+5:30

एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या ४८ तासांनंतर रविवारीही केईएम रुग्णालयात जखमींना पाहण्यासाठी नातेवाइकांनी गर्दी केली होती. परळ येथील केईएम रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक २५ मध्ये दोन दिवसांनंतर कुणी आपल्या मुलाला जेवण भरवत होते

Elphinstone accident: Wounded relatives, relatives of KEM hospital on Sunday | एल्फिन्स्टन दुर्घटना : जखमी सावरताहेत!, रविवारी केईएम रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

एल्फिन्स्टन दुर्घटना : जखमी सावरताहेत!, रविवारी केईएम रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या ४८ तासांनंतर रविवारीही केईएम रुग्णालयात जखमींना पाहण्यासाठी नातेवाइकांनी गर्दी केली होती. परळ येथील केईएम रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक २५ मध्ये दोन दिवसांनंतर कुणी आपल्या मुलाला जेवण भरवत होते, काही जण आपल्या मित्राला गमतीशीर किस्से सांगून हसवत होते, तर दुसºया बाजूला कुणी आपल्या वडिलांच्या आधाराने पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करीत होते. दोन दिवसांनंतर वॉर्डमधील या वातावरणाने परिचारिकांच्या चेहºयावर काहीसे समाधान पाहण्यास मिळाले.
केईएम रुग्णालयातून रविवारी १२ रुग्णांना घरी पाठविण्यात आले. त्यात १० पुरुषांचा तर दोन महिलांचा समावेश होता. आता या रुग्णालयात २० रुग्ण दाखल असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.
दिवा येथे राहणाºया रेश्मा कदम व तिची आई या दुर्घटनेत जखमी झाल्या होत्या. केईएम रुग्णालयात रेश्माच्या आईवर प्रथमोपचार करून तिला सोडण्यात आले असून, रेश्माच्या छातीतील दुखणे कायम असल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत, तर उजव्या बाजूच्या खांद्यावर सूज असल्याने, बरे होण्यासाठी आठवडाभर रुग्णालयात उपचार घ्यावे लागतील, असा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचे दुर्घटनेतील जखमी शरयू गावडे
यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
त्याचप्रमाणे, काळाचौकी येथे राहणाºया अर्पणा सावंत यांच्या कमरेला जबर मुकामार लागल्याने त्यांना बसताही येत नाही. दुर्घटनेच्या वेळी अचानक गुडघे दुमडले आणि त्याच अवस्थेत २५-३० माणसे अंगावर आल्याने कमरेला मार बसल्याचे त्या सांगत होत्या. याच वेळी, मोबाइलमधील दुर्घटनेच्या छायाचित्रांमध्ये असलेले आपले छायाचित्र दाखवून, कशा पद्धतीने त्या अडकल्या याचा कटू अनुभवही त्यांनी सांगितला.
याशिवाय, विक्रोळीच्या आकाश परब आणि रोहित परब या दुर्घटनेच्या पीडित भावंडांपैकी, रोहित या लहान भावाचा मृत्यू झाला असून, आकाश अंकुश परब (१९) याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. रोहितच्या मृत्यूचा जबर धक्का पोहोचल्याने त्याचे वडील कोणाशीच काही बोलण्याच्या अवस्थेत नसून, केवळ आकाशच्या उशाशी बसून असतात, अशी माहिती परब यांच्या नातेवाइकांनी दिली. याशिवाय, सोमवारी आकाशच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आॅनलाइन याचिकांचा धडाका; नेटिझन्सचा रोष
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन, राज्य शासन यांच्याविषयी रोष व्यक्त करण्यासाठी मुंबईकरांनी आता आॅनलाइन याचिकांचा धडाका सुरू केला आहे. या याचिकांना देशासह जगभरातील नागरिकांनी पाठिंबा देत त्या-त्या मुद्द्यांचे समर्थन केले आहे. दुर्घटनेचे खापर पावसावर टाकून जबाबदारी नाकारणाºया यंत्रणांविरोधातील हा रोष वाढत असल्याचे या याचिकांमधून दिसत आहे.आम्हाला बुलेट ट्रेन नको, लोकल सेवा सुधारा, असे म्हणत श्रेया चव्हाण यांनी आॅनलाइन याचिका दाखल केली. या याचिकेला अवघ्या दोन दिवसांत ९ हजार १५५ नेटिझन्सनी पाठिंबा दर्शविला आहे. ही याचिका पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आली आहे. तसेच, ऐन गर्दीच्या वेळेस ही दुर्घटना घडल्याने हरीश अनंथारामन यांनी कार्यालयीन वेळा बदलण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना आॅनलाइन याचिकेद्वारे साकडे घातले आहे. या मुद्द्यालाही मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
याचप्रमाणे विपिन विजयन यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा निधी लोकलच्या सेवांसाठी वापरण्यात यावा यासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेला ४ हजार ५९ नेटिझन्सनी पाठिंबा दिला आहे. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, पश्चिम रेल्वे प्रशासन व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निर्णय घेण्यास सांगितले आहे.

मृतांच्या वारसांना रेल्वेत नोकरी द्या-आव्हाड
मुंब्रा : मुंबईतील एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांच्या वारसांना आर्थिक मदतीबरोबरच रेल्वेत नोकरी द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मृतांमध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरील रिजवी बाग गृहसंकुलाच्या एफ विंगमधील रहिवासी मुश्ताक राईन यांचाही समावेश असून, सर्व नातेवाईक मुंबई येथे असल्याने, भायखळा येथील नारियलवाला कब्रस्तानमध्ये त्यांचा मृतदेह दफन करण्यात आल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली. त्यामुळे दुर्घटनेत मृत झालेल्यांमध्ये मुंब्य्रातील रहिवाशांची संख्या तीन झाली आहे. राईनच्या पश्चात त्याची पत्नी आणि दोन मुलींसह एकूण पाच मुले आहेत. यात मोठा मुलगा १५ वार्षांचा तर छोटा मुलगा अडीच वर्षांचा आहे. कपड्यावर करण्यात येणाºया जरीच्या कामासाठी लागणाºया सुट्या भागाचा व्यवसाय राईन करत होता.

एल्फिन्स्टन पादचारी पुलावरील दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रवाशांना भायखळ्यातील घोडपदेव परिरात नवरात्रौत्सव साजरा करणाºया श्रीकृष्ण सेवा मंडळाने रविवारी श्रद्धांजली वाहिली. श्रीकृष्णची अंबेमाता म्हणून नामांकित असलेल्या मंडळाने विसर्जन मिरवणुकीत मृतांबाबत शोक व्यक्त करणारा फलक लावून सर्वांचेच लक्ष वेधले. या वेळी श्रीकृष्ण गोविंदा पथक, ओम साई म्युझिकल ग्रुप, पिंपळेश्वर साई भजन मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाºयांनी शोक व्यक्त केला.

Web Title: Elphinstone accident: Wounded relatives, relatives of KEM hospital on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.