निवडणुकीचा बिगुल : विकेंद्रीकरणाच्या मार्गावर मराठी नाट्य परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 02:19 AM2017-11-15T02:19:24+5:302017-11-15T02:19:47+5:30

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची गेल्या वेळची निवडणूक विविध कारणांनी गाजली होती. ‘त्या’ प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये; म्हणून नाट्य परिषदेने त्यावर आता तोडगा काढला आहे.

 Elections: The Marathi Natya Parishad on the path of decentralization | निवडणुकीचा बिगुल : विकेंद्रीकरणाच्या मार्गावर मराठी नाट्य परिषद

निवडणुकीचा बिगुल : विकेंद्रीकरणाच्या मार्गावर मराठी नाट्य परिषद

googlenewsNext

राज चिंचणकर 
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची गेल्या वेळची निवडणूक विविध कारणांनी गाजली होती. ‘त्या’ प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये; म्हणून नाट्य परिषदेने त्यावर आता तोडगा काढला आहे. आतापर्यंत टपालाद्वारे पार पाडल्या जाणाºया निवडणूक प्रक्रियेला नाट्य परिषदेने तिलांजली दिली आहे. आता ही निवडणूक थेट मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी नाट्य परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीने नाट्य परिषदेच्या घटनेत आवश्यक ते बदलही केले आहेत.
राज्यात विविध ठिकाणी नाट्य परिषदेचे सदस्य या निवडणुकीत मतदान करणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एक असे या मतदान केंद्रांचे स्वरूप असेल. नाट्य परिषदेने मूलभूत बदल करण्याचा स्वीकारलेला हा दृष्टीकोन लक्षात घेता, एकूणच नाट्य परिषद विकेंद्रीकरणाच्या मार्गावर निघाल्याचे स्पष्ट होत आहे. येत्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. मार्च २०१८मध्ये प्रत्यक्ष निवडणूक पार पडणार आहे. परिणामी, ९८वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पुढे ढकलण्यात आले आहे. निवडणुकीनंतर नाट्य परिषदेचा कार्यभार हाती घेणाºया नव्या कार्यकारिणीकडे या संमेलनाची सूत्रे सोपविली जाणार आहेत. साहजिकच, या संमेलनाच्या आयोजनासाठी पुढील वर्षीचा उन्हाळा किंवा थेट पावसाळा उजाडणार आहे.
नाट्य परिषदेच्या यंदाच्या निवडणुकीसाठी, प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून गुरुनाथ दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्यांची संख्या सध्या ४० असली, तरी निवडणुकीनंतरच्या नियामक मंडळात ही संख्या ७० असेल. नवीन घटना निर्माण केल्याने निवडणूक प्रक्रिया बदलली असून, निवडणुकीत होणाºया गैरप्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी व्यक्त केली आहे.
९८व्या नाट्य संमेलनासाठी नाट्य परिषदेच्या जळगाव, नाशिक व संगमनेर या शाखांकडून नाट्य परिषदेला निमंत्रणे प्राप्त झाली आहेत. या शाखांनी नाट्य संमेलनाच्या आयोजनातून माघार वगैरे घेतली असल्याच्या चर्चेमध्ये तथ्य नसल्याचे दीपक करंजीकर यांनी स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रियेमुळे नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड; तसेच नाट्य संमेलनाच्या स्थळाची निवड प्रलंबित पडल्याची माहितीही त्यांनी दिली. नाट्य संमेलनाध्यक्ष पदासाठी निवडणूक न होता, अध्यक्षांची ‘निवड’ करण्याकडे नाट्य परिषदेचा कल असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title:  Elections: The Marathi Natya Parishad on the path of decentralization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.